आम्ही कधीही रडीचा डाव खेळलो नाही : राऊत

    25-Oct-2020
Total Views |
Sanjay Raut_1  



मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला संबोधित करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा ऑनलाईन पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हा सोहळा पार पडत आहे, तत्पूर्वी व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. आम्ही कधीची रडीचा डाव खेळत नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केले. पुढील पंचवीस वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
राऊत म्हणाले, या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अनेकांनी हे सरकार पडेल, म्हणून तारीख पे तारीख देत आहेत. परंतू शिवसेना पक्षप्रमुखांनी हे सगळे वार झेलून दाखवले आहेत. यापुढे शिवसेनेचे जे काही असेल ते महा असेल, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथं होणार नसून शिवाजी पार्क इथंच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभाग़ृहात संध्याकाळी सात वाजता होत आहे.
 
 
 
या मेळाव्याला केवळ ५० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यात काही मंत्री आणि नेत्यांचा समावेश असेल. पक्षाच्या सामाजिक प्रसारमाध्यमातून या मेळाव्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. १९६६ सालापासून या दसऱ्या मेळाव्याला विशेष महत्व आहे. गेल्या वर्षीच्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक विधान केले होते. त्या विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊत यांनी 'करून दाखवलं', असे म्हणत शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवला, असे म्हटले आहेत.
 
 
 
राऊत म्हणाले होते, पुढील दसरा मेळाव्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेला पाहायला मिळेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या सूचना वजा आदेशाने मुख्यमंत्री व्हावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून आज काय बोलणार याकडे साऱ्या महाराष्ट्रीतील राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून आहे. संजय राऊत यांनी दिवाळीत राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.