मुंबई महापालिकेत चोरांचे राज्य : मंगलप्रभात लोढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2020
Total Views |
BJP Mumbai_1  H



मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या चोरांचे राज्य असून भाजपवर एकामागोमाग एक अशा पद्धतीने आक्रमण केले जात आहे. पण आम्ही डरणारे नाही. आम्ही योध्ये आहोत. शिवसेनेचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे करून २०२२ च्या निवडणुकीत निश्चितच भाजपची सत्ता आणू, असा आत्मविश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
 
 
 
बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचा प्रथम वर्ष कार्यसंकल्प अहवालाचे शनिवारी प्रकाशन झाले. पोयसर येथे रघुलीला मॉलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर आमदार योगेश सागर, आमदार नितेश राणे, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, माजी आमदार हेमेन्द्र मेहता सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी लोढा बोलत होते.
 
 
ते म्हणाले की, सध्या भाजपवर आक्रमणाचे धोरण शिवसेनेने अवलंबले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमण करण्यात येत आहे, मुंबई महापालिकेतही भाजपवर आक्रमण होत आहे. पण भाजप आक्रमणाला घाबरणारा पक्ष नाही. सात दिवसात तीन वेळा भाजपने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. लाबडीचे कारस्थान करून भाजपला हैराण करण्याचा डाव आहे. पण भाजप सत्याची चाल करत लढणारा पक्ष आहे. महापालिकेत अधर्माविरोधात धर्माची लढाई चालू आहे. महापालिकेच्या २०२२ च्या या लढाईत भाजपचा निश्चित विजय होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.
 
 
मुंबई महापालिकेत चोरांचे राज्य आहे. मुंबईकरांसाठी त्यांनी काय काम केले असे विचारत, पापी शिवसेनेला मुंबई महापालिकेतून सत्ताभ्रष्ट करा, असे आवाहन त्यांनी केले. भले शिवसेनेकडे सत्ता आहे, पण भाजपकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. त्या बळावर हे निश्चितच शक्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
त्यापूर्वी चारकोपचे आमदार योगेश सागर म्हणाले की, शिवसेना संख्येने जास्त असतील, पण भाजप मतांनी भारी आहे. ही मते वाढून २०२२ मध्ये महापालिकेत एकहाती सत्ता आली पाहिजे आणि ती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजूनपर्यंत शिवसेना भारी आहे असे वाटत होते, पण स्वतंत्र लढल्यानंतर भाजप भारी ठरला आहे. उत्तर मुंबईत भाजपचे चार आमदार आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. भाजपचे २५ नगरसेवक, तर शिवसेनेचे १७ नगरसेवक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांनी भाजप अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे २०२२ मध्ये महापालिकेत कमळ फुलेल असा विश्वास योगेश सागर यांनी व्यक्त केला.
 
 
कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी सुनील राणे यांच्या कार्याचा गौरव करताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सुनील राणे यांनी वरळीत काम केले, त्याची फळे त्यांना बोरिवलीत मिळाली. मात्र सुनील राणे यांनी वरळीची पकड सोडू नये. तेथल्या बेबी पेंग्विनला संपवण्यासाठी तुमच्या कामाची भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराला मदत होईल. भाजपने देशातून माय-लेकाचे राज्य खालसा केले. राज्यातून बाप-बेट्याचे सरकार घालवून टाकू, असा निर्धार केला पाहिजे. शिवसेनेने काय केले मुंबईकरांसाठी? त्यामुळे मुंबई महापालिकेत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा निर्धार करून आतापासूनच कामाला लागा, असा मंत्रही त्यांनी दिला.
 
 
उत्सवमूर्ती सुनील राणे म्हणाले की, केवळ पदाची अभिलाषा ठेवून काम करू नका. पक्षाशी निष्ठा ठेवून काम करा, पद आलोआप चालत येईल. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, २००९ पासून आमदारकीसाठी पक्षाने मुलाखती घेतल्या. पण संधी मिळाली नाही. पण पक्षनिष्ठा सोडली नाही. म्हणून पक्षाने स्वतःहून बोरिवलीतून उमेदवारी दिली. २००४ पासून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा मजबूत करून ठेवला आहे. लढणे हे राणेंच्या रक्तातच आहे. सुनील राणे, नितेश राणे, नारायण राणे, दत्ताजी राणे सातत्याने लढत राहिले.
 
 
बोरिवली ही संतांची भूमी आहे. येथे रामभाऊ नाईक, गोपाळ शेट्टी, हेमेन्द्र मेहता यांनी लोकसेवेचे सिंचन केले आहे. तीच लोकसेवेची परंपरा पुढे चालवीत आहे. त्यामुळे बोरिवलीत लोकांत राहून असे काम करीन की येणाऱ्या काळात लोक सातत्याने भारतीय जनता पक्षालाच आठवत राहतील. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीचा गड निश्चितच मजबूत करिन, असा विश्वास राणे यांनी दिला.
 
 
शिवसेनेच्या पालिकेतील कारभारावर टीका करताना राणे म्हणाले की, आरोग्य खात्याचे वार्षिक बजेट साडेचार हजार कोटींचे आहे. दहा वर्षांच्या काळात ४५ हजार कोटी रुपये झाले. तरीही आरोग्य खात्याची अशी अवस्था का? शिक्षण खात्यासाठी तरतूद साडेतीन हजार कोटी रुपयांची आहे. १० वर्षात ३५ हजार कोटी रुपये होतात.पण ती रक्कम योग्य कारणांसाठी खर्ची पडत नाही. त्यामुळेच शिक्षण खात्याची दयनीय अवस्था आहे.
 
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या हिताचे सर्वसमावेशक असे शिक्षण विधेयक आणले, कृषी विधेयक आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली देश सध्या मजबूत अवस्थेत आहे. त्यामुळे जनतेच्या कल्याणच्या लहान सहान गोष्टींचा गांभिर्याने विचार करणाऱ्या पंतप्रधानांमुळे भारतीय जनता पक्ष सध्यापेक्षाही अधिक बलवान होईल, असा विश्वास सुनील राणे यांनी व्यक्त केला.
 
 
खासदार गोपाळ शेट्टी यांनी सुनील राणे यांच्या कार्याचा गौरव केला. राणे यांच्या सारखा जनतेच्या कल्याणासाठी दिवसरात्र धावणार लोकप्रतिनिधी मिळणे म्हणजे येथील जनतेचे भाग्य आहे, असे शेट्टी म्हणाले. अनेक लोकप्रतिनिधी स्वतःचे जनसंपर्क कार्यालय थाटतात. मात्र त्यांची कारकीर्द संपताच कार्यालय नाहीसे होते. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या प्रभागात पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारावे. त्यासाठी आमदार-खासदारही मदत करतील, असे आश्वासन शेट्टी यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@