बदलापूर : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच प्रवाश्यांच्या उपस्थितीमध्ये बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या बदलापूर राणीचे रल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेतर्फे स्वागत करण्याबरोबरच दरवर्षीची परंपरा कायम राखली. .
मागील १५ वर्षांपासून प्रवासी मित्रमंडळ संघातर्फे दसऱ्याच्या आदल्या दिवशी अष्टमीला बदलापूर रेल्वे फलाटावर प्रवाश्याच्या उत्साहाला उधाण येते. महिला प्रवासी फलाटावर रांगोळ्या रेखाटतात, याशिवाय भोंडला, गरब्यावर ठेका धरतात, पुरुष प्रवासी गाडीला हार -फुलांनी सजवतात, एकमेकांना मिठाई वाटली जाते , प्रवासी संघटनेतर्फे सकाळी ६-५९ वाजता मुंबईला रवाना होणाऱ्या लोकलचे मोटरमन आणि गार्ड ,यांचा सत्काराने सुरुवात होते , दरवर्षी ८-३० पर्यंत लोकल येऊन सुटण्याच्या कालावधीपर्यंत कार्यक्रम चालतो. तसेच स्टेशनमास्तर फलाटावरील पोलीस अधिकारी, रेल्वे कर्मचारी यांचे स्वागत झाल्यानंतर लोकल प्रवाश्याना घेऊन दिमाखात मुंबईच्या दिशेने रवाना होते .
यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनामुळे असलेल्या सर्व नियमांचे पालन करून मोजक्याच प्रवाश्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश महाजन , त्यांचे सहकारी दिलीप राजे, आनंद नारायणे, तेजश्री रांजाकर आदींनी आज रविवारी विजयादशमीला रेल्वे स्थानकात येऊन सकाळी ८:४५ वाजता सुटणाऱ्या बदलापूर -दादर या बदलापूर राणीला फुलांनी सजवून, मोटरमन पी. के. मीना यांचा सन्मान करण्याबरोबरच दरवर्षीची परंपरा कायम राखली .