संघगीतांचे मर्म!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

sangh geet_1  H



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज दसर्‍याला ९५ वर्षे पूर्ण होतील. संघाचा गणवेश, संघाचे बौद्धिक वर्ग, संघाचे पथसंचलन, संघाची शाखा ही जशी संघाची खास वैशिष्ट्ये तद्वत संघगीते हेदेखील संघाचे खास वैशिष्ट्य. गेली अनेक दशके संघाचे स्वयंसेवक ही गीते म्हणत आली आहेत. विविध भाषांतील या गीतांनी प्रदेशाच्या आणि भाषेच्या सीमा ओलांडल्या आहेत आणि आपल्या प्रांताच्या भाषेपलीकडे जाऊन स्वयंसेवक विविध भाषांतील गीते प्रसांगानुरूप म्हणत आली आहेत. अर्थात संघगीते म्हणजे केवळ गाणी नव्हेत आणि स्वान्तसुखाय ती गुणगुणावी हे त्या गीतांचे प्रयोजन नाही. संघ गीतांचे प्रयोजन हे संघाचा विचार त्या गीतांतून व्यक्त आणि प्रकट व्हावा हा आहे. त्यामुळेच संघ गीतांकडे केवळ गीते म्हणून न पाहता त्याकडे एकूण संघाच्या विचारसरणीच्या आणि कार्यप्रणालीच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे.



संघाची शाखा असो किंवा संघाचा उत्सव किंवा संघ शिक्षा वर्ग असोत किंवा संघाचे शिबीर असो, वैयक्तिक आणि सांघिक गीत हा या सर्वांमधील अविभाज्य भाग. मात्र, संघाची गीते पाहिली तर त्यात संघाची जी व्यक्तीपेक्षा विचार मोठा आणि व्यक्तिपूजा त्याज्य ही विचारसरणी आहे, त्याचेच प्रतिबिंब पडलेले दिसेल. हे केवळ गीतांमधील आशयाच्या बाबतीत खरे नाही, तर त्या गीताचे लेखन करणार्‍याच्या आणि त्या गीताची चाल बांधण्यापर्यंत सर्व बाबतीत लागू आहे. संघाची स्थापना केलेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा गौरव करणारी किंवा दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांचा गौरव करणारी गीते अगदी अल्प प्रमाणात सापडतील. मराठीतील ‘क्रांतदर्शी केशवानी दिव्य स्वप्ना पाहिले’ सारखे गीत असो किंवा हिंदीतील ‘चाहिये आशिष माधव’ सारखे गीत असो किंवा अशी गीते ज्यांत संघाच्या कोणा व्यक्तीचे नाव आहे, अशी गीते फारशी सापडणार नाहीत. मात्र, संघाला अभिप्रेत हिंदुत्व, समरसता, संघटन, शाखेचे महत्त्व, भगवा ध्वज, अशा विषयांवर विपुल गीते- म्हणजे अक्षरशः शेकडो संघगीते सापडतील. याचे कारण बहुधा संघाच्या विचारसरणीत दडलेले असावे. ‘व्यक्तिस्तोम’ हा संघाचा पहिल्यापासून स्वभाव नाही, किंबहुना कोणत्याही व्यक्तिला गुरु न मानता भगव्या ध्वजाला गुरु मानण्याची डॉ. हेडगेवार यांची जी दूरदृष्टी होती ती दुर्मीळ अशीच.

वास्तविक संघाचा विस्तार होण्यासाठी अनेकानेक कार्यकर्त्यांनी अक्षरशः जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत संघ वाढवला. मात्र, त्यांच्यावर देखील गीते संघात रचली गेलेली नाहीत. गीते रचली आहेत ती मूल्यांवर आणि तत्त्वांवर. संघातील सहा उत्सव आणि त्या उत्सवांच्या आशयाला अनुरूप अशी गीते असंख्य आढळतील; ‘गुरु वंद्य महान’ सारखे गुरुपौर्णिमेला हमखास म्हटले जाणारे गीत असो; किंवा ‘करि बांधूया पवित्र कंकण’ सारखे रक्षाबंधनाला आवर्जून म्हटले जाणारे गीत असो, यात कुठेही व्यक्तीचा उल्लेख आढळणार नाही. अर्थात, इतिहासात ज्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर देशकार्य केले, त्यांचा गौरव किंवा स्मरण गीतांमध्ये अवश्य आढळेल. मात्र, अशा गीतांमुळे ती म्हणणार्‍यांना त्या गौरवशाली इतिहासाची ओळख होते, हे त्या गीतांचे आगळेपण. एक खरे या सगळ्या गीतांचे रचयिता कोण आणि त्या गीतांना चाल कोण बांधते, हे गुलदस्त्यातच राहते आणि तरीही ते गीत शेकडो-हजारोंच्या ओठांवर रुळते. प्रसिद्धीपासून दूर राहायचे हा संघाचा प्रथमपासून प्रघात राहिला आहे. तेव्हा संघ गीताचे रचयिता माहीत नसावे हेही याच धारणेला धरून झाले.

मात्र, काही गीतांचे रचयिता आणि संगीतकार सर्वांना माहीत झाले आणि त्याचे कारण ते गीत रचणार्‍याने स्वतःची प्रसिद्धी केली किंवा संगीत देणार्‍याने स्वतःची जाहिरात केली म्हणून नव्हे. ती माहिती आपसूक सगळ्यांना झाली एवढेच त्याचे कारण. १९८३मध्ये तळजाईला जे प्रांत शिबीर झाले, त्या शिबिरासाठी ‘हिंदू सारा एक मंत्र हा दही दिशांना घुमवू या’ हे गीत ३०हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी शिबिरात एकाच वेळी म्हटले. ते गीत डॉ. अरविंद लेले यांनी लिहिले होते आणि सुधीर फडके यांनी त्याला चाल लावली होती किंवा ‘चाहिये आशिष माधव’ हे गीत परशुराम गोसावी यांनी रचले आणि सुधीर फडके यांनी त्याची चाल बांधली किंवा ‘चला निघूया सरसावोनि देशाच्या उद्धरणी’ हे गीत नाना पालकरांनी रचले, अशी तुरळक माहिती उपलब्ध असली तरीही एवढी शेकडो-हजारो गीते नक्की कोण लिहितो, हे रहस्यच आहे. त्या पलीकडील अप्रूप त्या गीताचे शब्द आणि चाल सगळीकडे कशी पोहोचते याचे. दुसरे म्हणजे, ती चाल सहज कोणत्याही स्वयंसेवकाला म्हणता येईल अशी असते. याचा अर्थ त्या चालीत अतिसुलभता असते किंवा चालीत दुय्यमता असते असे मानण्याचे कारण नाही. गीतात शब्द महत्त्वाचे यात शंका नाही, पण त्या शब्दांचे वहन चाल करीत असते आणि जर त्या चाली निकृष्ट असत्या तर दीर्घ काळ ही संघगीते स्वयंसेवकांच्या ओठांवर रेंगाळली नसती. तेव्हा संघ गीतांचे प्रयोजन लक्षात घेऊन त्या चाली लावलेल्या असतात याचे स्मरण ठेवावयास हवे.


आता ध्वनिमुद्रण, डिजिटल व्यवस्था आल्या असल्या तरीही जेव्हा हे काहीही तंत्रज्ञान नव्हते, तेव्हाही गीत आणि चाल सर्वत्र पोहोचत असे. येथे एक नमूद केले पाहिजे की, मुळात कंपूशाही हा संघाचा मूळ विचार नसल्याने आणि सर्वसमावेशकता ही संघाची मूळ धारणा असल्याने संघाचे गीत केवळ संघातीलच कोणी तरी लिहायला हवे, असे कुंपण संघाने कधी घालून घेतले नाही. त्यामुळे अगदी विरोधी विचारधारेतून देखील काही प्रेरणादायी आले, तर त्याचा सहज स्वीकार संघाने केला. साने गुरुजी यांच्या ‘बलसागर भारत होवो’ या गीताला अव्हेरावे असे संघाला कधी वाटले नाही. कारण, त्या गीतामध्ये संघाला अभिप्रेत असाच विचार होता. वि. स. खांडेकर यांचे ‘रणी फडकती लाखो झेंडे’ हे गीत संघाच्या स्फूर्तिगानमध्ये सहज समाविष्ट झाले. ‘डमडमत डमरु ये, खण्खणत शूल ये’ या भा. रा. तांबे यांच्या कवितेला संघ गीतांमध्ये स्थान मिळाले. तेव्हा जे जे उत्तम ते ते महन्मधुर मानून संघाने आपल्या गीतांमध्ये अंतर्भूत केले.

या संघ गीतांविषयी झालेल्या काही नोंदी अवश्य उल्लेख कराव्यात अशा. ‘द्रष्टा नेता-कुशल संघटक’ या बाळासाहेब देवरस यांच्यावरील ‘भारतीय विचार साधना’ने १९९६ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत उल्लेख आहे तो असा- संघ गीतांची प्रथा बाळासाहेब देवरस यांनी सुरु केली. प्रारंभी विजयादशमीच्या उत्सवात समूहगीते म्हणण्याची प्रथा सुरु झाली. पहिल्याच वर्षी पाच गीते निवडण्यात आली. नागपूरचा विजयादशमी महोत्सव दोन दिवस साजरा होत असे. नवमीला शस्त्रपूजन व अध्यक्ष आणि पूजनीय सरसंघचालक यांची भाषणे होत, दशमीला सीमोल्लंघन, पथसंचलन व लष्करी कार्यक्रम आणि अध्यक्ष आणि पूजनीय सरसंघचालक यांची भाषणे होत. त्या वर्षी नवमीच्या दिवशी दोन व दशमीला तीन गीते म्हटली गेली. गीते सर्वांना उत्तम प्रकारे पाठ झाली. तो कार्यक्रम फारच अप्रतिम झाला. बाळासाहेबांनी गीतांची योजनापूर्वक निवड केली होती. सोपी परंतु अर्थवाही शब्दरचना ही त्या गीतांची वैशिष्ट्ये होती. दोन हजार स्वयंसेवकांनी मोकळ्या आवाजात एका लयीत व सुरात म्हटलेली ती गीते ऐकून सर्व श्रोते रोमांचित झाले होते.’ माणिकराव पाटील यांनी आपल्या ‘दुःशासन पर्व’ या पुस्तकात आणिबाणीदरम्यान तुरुंगातील आठवणी लिहिताना लिहिले आहे.


१५ऑगस्ट १९७५. कारागृहात दुपारी २ तास करमणुकीचे व पद्य गायनाचे कार्यक्रम झाले. स्थानबद्धांनी नाट्यछटा करून दाखविल्या आणि काहींनी पद्ये म्हटली. त्या पद्य गायकांपैकी एक गणपतराव गुरव, नंदुरबार यांनी काही पद्ये म्हटली. मोकळा आणि पहाडी आवाज. त्या पद्यांमध्ये एक पद्य त्यांनी गायले ते मोठे समर्पक होते. ‘काळ चालला पुढे कुणाचे कुणावाचुनी न अडे’ आमची सर्वांची मने त्याने भरून गेली. त्या पद्याने तो कार्यक्रम संपला. गीतांमध्ये काय सामर्थ्य असते, हे उलगडून दाखवण्यास ही आठवण पुरेशी आहे. एक वैयक्तिक आठवणदेखील नमूद करण्यासारखी. आता विश्व संघची धुरा सांभाळणारे सौमित्र गोखले जेव्हा प्रचारक म्हणून निघाले, तेव्हा काही मोजक्या स्वयंसेवकांनी पुण्यातील प्राध्यापक शरद वाघ यांच्या घरी सौमित्र यांना एक छोटेखानी निरोप समारंभ योजला होता आणि अनंतराव देवकुळे हे अचानक त्या छोटेखानी कार्यक्रमाला आले. सगळ्यांनी एक एक गीत म्हणावे, असे ठरले आणि अनंतराव देवकुळे यांनाही उपस्थितांनी आग्रह केला. तेव्हा त्यांनी ‘मन होवो ज्वालाग्राही’ हे पद्य म्हटले. त्यानंतर काहीच महिन्यांत अनंतराव निवर्तले आणि त्यांच्या शरीराला ज्वालांनी ग्रहण केल्याचे पाहिले, तेव्हा त्या ‘मन होवो ज्वालाग्राही’ या त्यांनी म्हटलेल्या पद्याची आठवण झाली.


‘तुमच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी रेंगाळतात हे मला सांगा, मी तुमच्या देशाचे भवितव्य काय हे सांगतो’ असे एक वचन आहे. संघाच्या स्वयंसेवकांच्या ओठांवर जी गीते असतात, त्यावरून त्यांच्या मनात देशभक्तीचा जाज्वल्य भाव आहे याचा प्रत्यय येतो, तद्वत समरसतेचा, बंधुत्वाचा, सेवावृत्तीचा, समर्पणाचा, संघटनेचा, समूहशक्तीचा, भावदेखील जागृत असतो याची साक्ष पटते. अखेर गीताचे प्रयोजन मुळी मनात अपेक्षित भाव उत्पन्न करणे हाच असतो. सांघिक गीत म्हणताना जो सामूहिक हुंकार प्रकट होतो; त्या प्रकटीकरणातूनच संघ जवळपास शतकी वाटचाल प्रतिकूल परिस्थितीतदेखील का करू शकला, याचे रहस्य उलगडू शकते. संघगीतांचे मर्मदेखील त्यातच अनुस्यूत आहे.
- राहुल गोखले
@@AUTHORINFO_V1@@