अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारचे पॅकेज जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

cmo_1  H x W: 0



मुंबई :
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते. साधारणपणे ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना ३० हजार ८००कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. ९ हजार ८०० कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.पिकं, रस्ते, वीजेचे खांब, खरडून गेलेली जमीन अशा सगळ्यांसाठी ही मदत आहे.दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. सध्या परिस्थिती कठीण, राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचेही म्हटलं आहे.

केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये दिले जात आहेत. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही.
@@AUTHORINFO_V1@@