एका अवलियाचे जाणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |
Kaustubh_4  H x


मनुष्य निर्माण आणि त्यातून समाज निर्माण हे कायमच संघाचे महत्त्वाचे कार्य राहिले आहे. शहरांमध्ये, गावोगावी संघाने अनेक कार्यकर्ते घडवले. समर्पित वृत्तीने हे कार्यकर्ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, नागरिकांसाठी काम करत असतात. जीवित असेपर्यंत समाजहित हेच त्यांचे प्राधान्य असते. अशा कार्यकर्त्यांचे अकाली निधन होणे हे संघाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत दु:खदायक असते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहकार्यवाह कौस्तुभ सोहोनी याचे गेल्या शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी दु:खद निधन झाले. अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्याचे जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक होते. अत्यंत धडाडीचा, समर्पित कार्यकर्ता अशी त्याची ख्याती होती.समाजाला गरज असलेली, समाजाचे स्वास्थ्य टिकून राहावे, समाजात सद्गुण व नीती-धर्माचे काम वाढावे यासाठी काम करणारी माणसे जाताना पाहिली की मनात कृष्णछाया व्यापून राहतात. कौस्तुभच्या जाण्याने केवळ कार्यकर्ताच नव्हे तर एक जवळचा मित्र गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
 
 
रोह्याच्या शाखेतील स्वयंसेवक म्हणून सुरु झालेला त्याचा प्रवास हा पुढे तालुका कार्यकर्ता, जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख आणि जिल्हा सहकार्यवाह अशा जबाबदाऱ्या पूर्ण करीत सुरूच राहिला. अत्यंत तेजस्वी, प्रभावी आणि तितक्याच नम्र अशा आपल्या स्वभावाने त्याने अनेकांना आकृष्ट करून घेतले व संघकार्याशी जोडले. कष्टपूर्वक अनेक नवे स्वयंसेवक, कार्यकर्ते संघाला दिले. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी कौस्तुभचे बोलण्याचे कौशल्य केवळ अफाट होते.समोरच्याचे विधायक गुण हेरून तुम्ही करत आहात ते संघाचेच काम आहे,वाह छान आहे, करत रहा ! संघ पण हेच काम करतो असं बोलून आपलंसं करण्याची त्याची खासियत होती.
 
 
रायगड जिल्ह्यात संघ कार्याचा विस्तार करण्यात कौस्तुभ याचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे घरात संघाची फारशी पार्श्वभूमी नसताना केवळ शाखेत यायला लागलेला एक स्वयंसेवक ते प्रचारक हा त्याचा प्रवास कोणाही संघ कार्यकर्त्यासाठी पथदर्शी आणि कौतुकास्पद असाच आहे. अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या कौस्तुभ सोहोनीने आपल्या स्वभावाने अनेकांना आपलेसे करून घेतले. एखाद्या तरुणाशी संवाद साधताना त्याचा जेवढा मोकळेपणा असे तेवढीच सहजता ज्येष्ठाशी संवाद साधण्यातही होती.झापड लावून काम करायचे नाही व संघाची शिस्त ही मोडायची नाही,अशी त्याची कार्यपद्धती होती.
 
 

Kaustubh_3  H x 
 
 
 
अरे होईल की काम ! फार चिंता करू नकोस-आपण करू रे-तू जे करशील ते चांगलच करशील असं उत्साहवर्धक बोलणं. एखाद्याला तुझं वक्तृत्व चांगले आहे,आपल्याला त्याचा आपल्या कार्यात उपयोग करायचा आहे, त्यामुळे तू सुद्धा व्याख्यानं कर म्हणून व्यासपीठावर उभं करणारा. कार्यकर्त्यांची काळजी करणारा,आपले म्हणणे सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांना पटवून देणे, त्यांच्या पचनी पाडणे हे त्याला सहजसाध्य होते. जेवढे निरपेक्षपण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात होते तेवढेच संघकार्यातही होते. तृतीय वर्ष शिक्षित झाल्यानंतर तो प्रचारक निघाला आणि जिल्ह्याच्या सर्वदूर क्षेत्रांत संघाचे काम पोहोचविण्यासाठी अविरत कष्ट घेतले.
 
 
 
 
 
संघाचा प्रचारक हे आगळीवेगळे रसायन असते.एखादा तरूण शिक्षण पूर्ण करून प्रचारक निघतो,काही काळ आपल्या जीवनातील वर्षे समाजासाठी देऊन जेव्हा थांबण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याचं आयुष्य फार वेगळं असतं. त्याला काळाशी संघर्ष करत पुढे जायचं असतं. नोकरी-उद्योग लगेच स्थिरस्थावर होईल याची शाश्वती नसते.पण लाथ मारेन तिथं पाणी काढीन अशी हिम्मत असल्यावर काय बिशाद ? प्रचारक म्हणून थांबल्यानंतरही आपला व्यवसाय सांभाळत आपले संघकार्य त्याने अविरत सुरूच ठेवले होते. शालोपयोगी वस्तुविक्रीचा व्यवसाय कौस्तुभ करत असे.त्यात चांगला जम त्याने बसवला होता. जोडीला अधूनमधून निर्लेप वृत्तीने पौरोहित्य सुद्धा करत असे.अशातच दोनाचे चार हात झाले आणि आत्ता गाडी पूर्ण रूळावर येईल असे सर्वांना वाटले.
 
 


Kaustubh_1  H x 
 
 
गेल्या ऑक्टोबर अखेरीस पोलादपूर येथे पहिल्यांदाच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या तयारीसाठी अगोदर येऊन सर्व व्यवस्था काटेकोर कशा लागतील याची चोख तयारी त्याने सर्वांच्या मदतीने करून घेतली.शिबीरे,वर्ग, सहल हे त्याचे आवडीचे विषय. शारीरिक-बौद्धिक या दोन्ही क्षेत्रात त्याची उत्तम तयारी होती. जिल्हा बैठक घेताना मुद्द्यांवर सर्वस्पर्शी चर्चा करणे व सर्वांना त्यात सामावून घेणे ही त्याची खासियत होती. जेवढ्या आत्मीयतेने कौस्तुभ यांनी संघकार्य पुढे नेले तेवढ्याच आत्मीयतेने आणखी एक कार्य अनेक वर्षे केले ते म्हणजे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समितीद्वारे दरवर्षी रायगडावर शिवपुण्यतिथीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तिथला त्याचा सहभाग ! या सोहळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थेत कौस्तुभ याचा मोलाचा सहभाग असे,हजारो लोक या सोहळ्याला दरवर्षी उपस्थित राहतात. मुख्यत्वे या सर्वांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्याच्याकडे असे. त्याच्यावर जबाबदारी सोपविली की ते काम हमखास आणि व्यवस्थित होणार याची सर्वांना खात्री असे.इतर सर्व तालुका कार्यकर्ते इथे मालक व मी कामगार अशी भावना तो बोलून दाखवी. गेला महिनाभर तो आजारी होता. तात्पुरते आजारपण असावे असे वाटून आपल्या दुखण्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
 
 
 
अशक्तपणा,पायावरील सूज, सततचा खोकला या लक्षणांना कौस्तुभने गांभीर्याने घेतलं नाही. शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी अलिबागच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. त्यावेळी रक्तातील क्रियेटनीन वाढून किडनी नादुरुस्त झाल्याचे लक्षात आले. मंगळवारी १३ ऑक्टोबरला त्याला कळंबोलीच्या महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर दोन वेळा त्याचे डायलिसीस यशस्वी झाले आणि आशा पल्लवित झाल्या. शनिवारी सकाळी अतिदक्षता विभागातून बाहेर काढल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले परंतु दुपारी एकच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.सकाळी साडेनऊ ला स्वतःहून फोन करून विविध व्यक्तिगत वस्तूंची मागणी करणारा कौस्तुभ दुपारी चिरशांत झाला.
 
 
 
कौस्तुभ याच्या निधनानंतर समाजमाध्यमाद्वारे अनेकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यात एक सामान्य प्रतिक्रिया होती ती जिवलग मित्र गमावल्याची. कार्यकर्त्यांशीच मैत्री नव्हे तर कार्यकर्त्यांच्या पत्नीला बहिणाबाई म्हणून हक्काने मन मोकळं करणारा, त्याच्या जाण्यानेआपला एक सुहृद गमावल्याची प्रत्येकाची भावना आहे.अनपेक्षित मळभ सर्वांच्या मनावर दाटून राहिलं आहे. हिंदुत्वासाठी, संघासाठी, समाजासाठी झटणाऱ्या तरुणांचा कौस्तुभ सोहोनी हा आदर्श होता. त्याच्या जाण्याने रायगड जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण संघ परिवाराची अपरिमित हानी झाली आहे. आधीच संघकामात कार्यकर्ते येणं दुर्मिळ. अनेक कार्यकर्ते होऊन गेले, आता आहेत, या पुढेही तयार होतील पण कौस्तुभ सोहोनी यांच्यासारखा एखादा समर्पित पण कलंदर माणूस विरळाच. उत्साह, नवोन्मेष, नवजागराच्या घटस्थापनेदिनी हे बावनकशी सोनं आम्हाला पारखं झालं. त्याची कामाची तडफ व ध्यास आपल्यात उतरवून संघकार्य पुढे नेणे हीच त्याला यथोचित श्रद्धांजली ठरेल.
 

 
 
- डॉ समीर साळुंखे,पोलादपूर.





Kaustubh_2  H x
@@AUTHORINFO_V1@@