देवीच्या ९ रूपांतील कर्तृत्वाचे स्मरण करूया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

shweta unde_1  


प्रत्येक रूपात देवीने विविध कर्तव्य आणि जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आधुनिक काळातली स्त्री ही तर अष्टभुजा मातेचे वास्तविक रूपच. घरदार, कुटुंब, नोकरी-व्यवसाय या रामरगाड्यातही तिचे माणूसपण संपले नाही. पुण्याच्या उद्योजिका श्वेता हरहरे-उंडे या मूळच्या शिक्षिका, पण ध्यानीमनी नसताना त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि आज त्या यशस्वी उद्योजिका आहेत. सगळ्याच आघाड्यांवर यशस्वी होण्याचे कारण काय? तर श्वेता सांगतात की, “आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मला आत्मशक्ती आणि आत्मतेज देतो.”नवरात्रीचा जागर करताना देवीच्या नऊ रूपांचे स्मरण करूया.

मी श्वेता राहुल उंडे, पूर्वाश्रमीची श्वेता हेमंत हरहरे. आई आणि वडील दोघेही धार्मिक. आई तुळजाभवानीचे सूक्त लहानपणापासूनच आवडीने म्हणत असे. घरी लाड असले तरी संस्करांशी कुठलीही तडजोड नाही. माझी आई स्मिता, ही भारतीय संस्कृती जपणार्‍या गृहिणीचे परिपूर्ण रूपच! देवी तिच्या प्रत्येक रूपात वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडते. आपल्या स्त्रियांचेही असेच आहे. आपल्याला विविध नात्यांचे आधार पदर जपायचे असतात. जबाबदार्‍या पार पाडायच्या असतात. मात्र, हे करत असताना आपले आत्मभान, आपले अस्तित्व आपण अबाधित राखायलाच हवे, असे आईने शिकवलेले. बाबा विचारवंतच. जगभरात काय चालले, काय नाही, समाज आणि देश याबद्दल आपले काय योगदान आहे, हे पाहणे आणि करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे बाबांनी शिकवले. तर असो, थोडक्यात माहेरी आजी-आई-काकूअसे मोठे कुटुंब असल्याने माझ्यावर जबाबदारी येतच नसे. त्यामुळे एकप्रकारे सगळे ऐषारामीच होते...

पुढे सासरी परिस्थिती अर्थातच बदलली. सासरी आम्ही पाचजणंच होतो. सासुबाई अकाली गेल्यामुळे लगेचच मोठी सून म्हणून सगळ्याच जबाबदार्‍या पदरी आल्या. थोडीशी गडबडले, पण घरचे सगळे सासरे, दीर, नणंद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन, मदत केली आणि मुळातला माझा हौशी स्वभाव यामुळे सणवार व्रत-वैकल्ये, नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरे करायला सुरुवात केली. लग्नानंतर तीनच वर्षांनी मुलगी झाली. ती लहान असताना मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीही केली. नोकरीला सगळ्यांचा पाठिंबा होता. मुलीच्या आयुष्यातले महत्त्वाचे लहानपणीचे क्षण अनुभवण्यासाठी आणि तिची ‘आईची सोबत’ असण्याची गरज ओळखून मी नोकरी सोडली. आईचे शब्द आठवले, ‘प्रत्येक नात्याचे आधार आणि पदर जपले पाहिजेत, तेही आपले अस्तित्व राखून.’

त्या काळात रेणुका प्रशालेचा बालवाडीचा शिक्षिका कोर्स पूर्ण केला. त्यानंतर मुलगी पाचवीत गेली आणि मी ‘पुनश्च हरिऽओम’म्हणत शिक्षिकेची नोकरी सुरु केली. सगळ्या गोष्टी छान चालू होत्या. एका वर्षाने माझ्या नणंदेच्या ओळखीने दाण्याच्या कुटाची तीळवडीची संक्रातीला ऑर्डर आली. गंमत म्हणून आणि तिला मदत म्हणून मीही हातभार लावला. पुढील वर्षी खूपच ऑर्डर आल्या. अगदी माझ्या पणजीनेसुद्धा वड्या थापून दिल्या. ओल्या नारळाची बर्फी आणि करंजी यांना खूप मागणी येऊ लागली. ओळखीचे लोक विचारणा करत असत की, आम्हाला करंजी आणि बर्फी बनवून द्याल का? शाळा सांभाळून सुरू केलेल्या या व्यवसायाने चांगले बाळसे धरले. मागील नऊ वर्षे शाळा आणि आठ वर्षे व्यवसाय जोरात दणक्यात चालू आहे. ‘प्रार्थना महिला गृहउद्योग’ या नावाने करंजी सर्व बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. पुण्यातील, नामांकित केटरर्स आवर्जून ओल्या नारळाची करंजी जेवणात शिफारस करुन देतात. काही होतकरु मंडळी आमच्याकडून विकत घेऊन इतर दुकानदार घरगुती पुरवठा करुन पैसे कमावतात. कामासाठी पाच ते सहा महिलांना रोजगार दिला आहे. एकही पदार्थ मशीनवर केला जात नाही. चव आईच्या हाताची!

या कामात मला सासरे, दीर, पुतण्या, मुलगी, नवरा सगळेच मदत करतात. घरचांच्या संपूर्ण पाठिंब्याशिवाय हे शक्यच झाले नसते. दिवाळीच्या काळात खूप घाईगडबड असते. तेव्हा मुलगी, नवरा, सासरे अगदी स्वयंपाकसुद्धा करतात.योग्यवेळी योग्य डिलिव्हरी देण्यासाठी रिक्षावाले काकासुद्धा धडपड करतात.सगळ्यांनी साथ असल्यानेच हे यश मिळते, असे मला नेहमीच वाटते. आज असे लिहिताना हे सगळे सोपे वाटते, पण ही वाटचाल अवघड होती, हे स्मरते. सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम, पाठिंबा या याशिवाय काहीच शक्य नाही, हे माहीत होतेच आणि राहणार आहे. या व्यवसायात नावारुपात येण्यासाठी असंख्य लोकांनी ग्राहकांनी वेगवेगळी मदत, सूचना, शाबासकी याद्वारे आमची पाठराखण केली. त्यांची मी नेहमीच आभारी असेन. देवीमातेने आपल्या प्रत्येक रूपात आपले अस्तित्व राखले आणि कर्तव्यपरायणता दाखवली, तिचे स्मरण मी नेहमीच करते. देवीमातेच्या नवरूपांचे भाव आणि कर्तव्यच मला प्रेरणा देतात.


-श्वेता हरहरे-उंडे
@@AUTHORINFO_V1@@