राधानगरी अभयारण्याच्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ची घोषणा; व्याघ्र भ्रमणार्गाला सुरक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |

radhanagari _1  
छायाचित्र - सचिन धायगुड


अभयारण्याभोवतीचे २५०.६ चौ.किमीचे क्षेत्र संरक्षित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्याच्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ची (ईएसझेड) घोषणा केली आहे. अभयारण्याच्या सीमेपासून २०० मीटर ते सहा किलोमीटरपर्यतच्या क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. यामाध्यमातून २५०.६ चौ.किमीचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सह्याद्रीमधील व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यास मदत झाली आहे. 
 
 
 
 
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे ३५१.१६ चौ.किमी क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हा संपूर्ण परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. २०१९ मध्ये राधानगरी अभयरण्यामधून वाघाचे छायाचित्रही 'कॅमेरा ट्रॅप'च्या माध्यमातून टिपण्यात आले होते. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून अभयारण्याचे 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र' घोषित (ईएसझेड) करण्याचा निर्णय रखडलेल्या अवस्थेत होता. महाराष्ट्र सरकारने अभयरण्याच्या 'ईएसझेड' क्षेत्राचा प्रस्ताव २०१९ मध्ये केंद्राला पाठवला होता. हा प्रस्ताव केंद्राने १५ आॅक्टोबर रोजी मान्य करुन तो अधिकृतरित्या प्रसिद्ध केला आहे. 

radhanagari _1   
 
 
या निर्णयानुसार राधानगरी अभयारण्याच्या अवतीभोवतीचे २५०.६ चौ.किमी क्षेत्र 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे. अभयरण्याच्या सीमेपासून काही ठिकाणी २०० मीटर, तर काही ठिकाणी सहा किलोमीटरपर्यत हे क्षेत्र विस्तारलेले आहे. या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, गगनबावडा तालुक्यातील २६ गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ची घोषणा झाल्याने यापुढे या संपूर्ण परिसरात मायनिंग, उद्योगांची उभारणी आणि झाडे कापण्यास बंदी असणार आहे. 
 

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित 
राधानगरी अभयारण्याचे 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र' घोषित झाल्याने याठिकाणी यापुढे मायनिंग आणि तत्सम उद्योगांना बंदी असेल. सद्यस्थितीत या परिसरात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या उद्योगांना कालांतराने बंदी घालण्यात येईल. गगनबावडा, भुदरगड आणि आजरा परिसरात वाघांचा वावर आहे. 'पर्यावरणीय संवदेनशील क्षेत्रा'च्या घोषणेमुळे हा परिसर सुरक्षित झाल्याने 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'ला दक्षिणेकडून जोडणारा व्याघ्र भ्रमणमार्ग संरक्षित झाला आहे. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम. 
 
 

@@AUTHORINFO_V1@@