'लोकल' सुरू झाली आता दोन घास सुखानं खाऊ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
Mumbai Local_1  

(प्रातिनिधीक छायाचित्र)

हातावर पोट असणाऱ्या महिलांनी व्यक्त केले समाधान 


मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सात महिन्यांनंतर प्रथमच मुंबई लोकलमध्ये पाऊल ठेवायला मिळाल्यानंतर महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ऑफिसमध्ये जाणाऱ्या गृहिणींसह फुल आणि भाजी विक्रेत्या महिलांच्याही डोळ्यात आनंद तरळत होता. लोकल सुरू झाल्याने दररोज मालाची ने-आण करण्यासाठी रिक्षा टॅक्सीला द्यावे लागणारे दोनशे ते तीनशे रुपये आता वाचणार आहेत. त्यामुळे समाधान आहे, अशी प्रतिक्रीया फळ, फूल आणि भाजी विक्रेत्या महिलांनी दिली.
 
 
 
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मिळून १४०६ फेऱ्या होत आहेत. मात्र या रेल्वेमधून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळत आहे. सामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वेत प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यांची फारच कुचंबना होत होती. रस्ते वाहतुकीतून चारचार तास प्रवास करून त्यांना कार्यालय अथवा घर गाठण्याचे दिव्य महिलांना पार पाडावे लागत होते. हातावर पोट असणाऱ्या लोकांची तर फारच पंचाईत होत होती. मात्र राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्राने महिला प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना हायसे वाटले.
 
 
सकाळी गर्दीच्या वेळेत सर्वसामान्य महिला प्रवाशांना रेल्वेत प्रवेश न देता सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर रात्री गाड्या बंद होइपर्यंत त्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांना महिलांना याचा उपयोग होणार आहे. रेल्वेत प्रवेश मिळाल्याने फूल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना जास्त आनंद झाला. दादरसारख्या फुलबाजारात जाण्यासाठी ३०० ते ५०० रुपये टॅक्सीला मोजावे लागत होते. त्यामुळे फुले अथवा हार आणि गजरे-वेण्यांचे दरही वाढले होते.
 
 
गिऱ्हाईक तुटल्याने उपासमारीची पाळी आली होती. मात्र आता रेल्वेत प्रवेश मिळू लागल्याने फुले आणि आवश्यक साहित्य रेल्वेने दुपारपर्यंत आणता येईल. वेळ पडल्यास रात्रीही आणता येईल. त्यामुळे होणारा अवाढव्य खर्च वाचेल. हार, वेण्या, गजऱ्यांचे दरही कमी होतील. गिऱ्हाइकांना बरे वाटेल आणि आमच्या गाठीला चार पैसे येतील, असे फुलविक्रेत्या महिला प्रवाशाने बोलून दाखविले. रेल्वेत महिला प्रवाशांना मुभा मिळाली असली तरी कार्यालयीन काम करणाऱ्या महिला प्रवाशांना सोईची वेळ नाही. पण रेल्वेचे दरवाजे खुले झाले, हेही कमी नाही, असे समाधानही काही प्रवाशांनी व्यक्त केले.



Mumbai Local_1  
@@AUTHORINFO_V1@@