यशाच्या ‘शिखरा’वर पोहोचणारा ‘गब्बर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
Shikhar_Dhawan_1 &nb
 
 
 
 

आपल्या ताबडतोब फलंदाजीने सर्व क्रिकेटप्रेमींना खूश करणार्‍या शिखर धवन अर्थात ‘गब्बर’च्या  आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
 
 
भारतीय संघ हा क्रिकेटविश्वातील प्रमुख संघांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी आणि टी-२० क्रमवारीत भारत सध्या तिसर्‍या तर एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे. प्रमुख संघांपैकी एक असणार्‍या या भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते.
 
 
केवळ दोन देशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यानच नाही, तर ‘इंडियन प्रीमिअर लीग’सारख्या (आयपीएल) जगप्रसिद्ध स्पर्धांदरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीकडे अख्ख्या जगाच्या नजरा एकवटलेल्या असतात. सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’स्पर्धेदरम्यान एका भारतीय खेळाडूने सलग दोन शतक ठोकत एका नव्या इतिहासाला गवसणी घातली आहे.
 
 
क्रिकेटविश्वात सध्या सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा सुरू असून, सर्वत्र त्याच्या कामगिरीबाबत कौतुकाचे गोडवे गायले जात आहेत. सलग दोन शतक ठोकणारा हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यानेच ‘आयपीएल’मध्ये एक नवा इतिहास रचला आहे. जे कुणाला जमले नाही, ते शिखर धवनने करून दाखवले. एकापाठोपाठ एक अशी सलग दोन तडाखेबाज शतके ठोकत शिखर धवनने आपण पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या फॉर्मात आल्याचे सिद्ध केले
आहे.
 
 
शिखर धवन याने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ‘आयपीएल’मधील कामगिरीप्रमाणेच भारतीय संघातील त्याच्या कामगिरीचा यशाचा शिखरही असाच उंचावत जावा, अशी आशा क्रिकेटचाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिखर धवन हा मूळचा दिल्लीतील रहिवासी. ५ डिसेंबर, १९८५ साली त्याचा जन्म राजधानी दिल्लीत एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील महेंद्र पाल धवन आणि आई सुनैना धवन या दोघांनीही शिखरला उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न बाळगले होते.
 
 
 
मात्र, शिखर धवन याला लहानपणापासूनच विविध खेळांची आवड. अभ्यासात त्याचे मन कधी रमलेच नाही, त्यामुळे आपल्याला मोठे होऊन खेळामध्येच करिअर करायचे असल्याचे त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. शिखरला अभ्यासात फारशी रुची नसल्याने धवन कुटुंबीयांनी त्याला क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील एका नामांकित क्रिकेट क्लबमध्ये नोंदणी झाल्यानंतर धवन नित्यनियमाने क्रिकेटचे धडे गिरवू लागला. शालेय अभ्यासापेक्षाही क्रिकेट प्रशिक्षणाकडे धवनने अधिक लक्ष केंद्रित केले.
 
 
सेंट मार्क सिनियर सेकेंडरी पब्लिक स्कूलमधून आपले दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धवन दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर क्रिकेट प्रशिक्षणासाठी जाऊ लागला. जेमतेम बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने यापुढे आपल्याला आयुष्यात क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रित करायचे ठरवले आणि शिक्षणाला रामराम ठोकला. वयाच्या १७व्या वर्षी दिल्ली संघाकडून जिल्हास्तरीय सामन्यादरम्यान ताबडतोब फलंदाजी करत शिखर धवन याने सर्वांवर आपली छाप पाडली. शिखरची फलंदाजी पाहून दिल्लीच्या ‘रणजी’ संघाच्या प्रशिक्षकांनी शिखरला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली.
 
 
 
‘रणजी’ संघातून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर शिखरने आणखी कसून सराव करण्यास सुरुवात केली. २००४ सालापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीतील ‘रणजी’ संघात शिखर धवनने सलामीला येऊन ताबडतोब फलंदाजी करत प्रशिक्षकांसमोर आपले कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर धवनला २००८ साली ‘आयपीएल’मधून खेळण्याची संधी मिळाली. तत्कालीन डेक्कन चार्जर या संघाने धवनला आपल्या संघातून खेळण्याची संधी दिली. येथेही धवनच्या चांगल्या कामगिरीचा धडाका सुरूच राहिला. त्यानंतर २०१० साली मुंबई इंडियन्स संघाने ‘आयपीएल’साठी निवड केली.
 
 
 
मुंबईच्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत सलामीला येण्याची संधी धवनला मिळाली. या संधीचे सोने करत त्याने अनेक सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली. सचिनसोबत सलामी केल्याचा फायदा धवनला झाला. त्याला त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली. भारताचा तडाखेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागची उणीव भरून काढण्याचे आवाहन त्याच्यासमोर होते. धवनने हे आव्हान स्वीकारत सलामीला येत फलंदाजी केली. सेहवागप्रमाणेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करण्यात धवनने यश मिळविल्यानंतर कर्णधार धोनीने मुंबईकर रोहित शर्माच्या जोडीला सलामीचा फलंदाज म्हणून त्याचे स्थान पक्के केले.
 
 
 
धवनने ४४.५०च्या सरासरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक धावा काढल्या असून, यामध्ये १९ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. अशा या गब्बरने ‘आयपीएल’मध्येही सलग दोन शतके ठोकत एक नवा विक्रम रचला आहे. त्याच्या विक्रमाचे शिखर असेच उंचावत जावो, अशी आशा तमाम भारतीयांना असून पुढील वाटचालीसाठी त्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!
 
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@