‘ज्ञानी’ आणि ‘उदास’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
dasbodh_1  H x


आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने आध्यात्मिक स्थिर अवस्था प्राप्त होते हे तर खरेच, पण जाता जाता हे अप्रत्यक्ष फायदे साधकाला मिळतात व त्यातून वैयक्तिक, सामाजिक समस्या सोडवता येतात. यामुळेच समर्थांचा आत्मज्ञानासाठी आग्रह आहे.
 
 
‘आत्मस्वरुप’, ‘ब्रह्मज्ञान’ या विषयावर दासबोधाच्या सातव्या दशकापर्यंत बरेच काही सांगून झाले, तरी तो विषय समर्थांनी पुन्हा दहाव्या दशकात चर्चेला घेतला आहे. परंतु, या दशकात त्या विषयाकडे स्वामींनी वेगळ्या दृष्टीने पाहिले आहे. या दहाव्या दशकात स्वामींनी इतर प्रचलित समजुतींचा उल्लेख करुन त्या तुलनेत आत्मज्ञानाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे. समाजात अनेक समजुती प्रचलित असून लोक त्यांना उपासना पद्धतींचा मान देतात. त्याने देव प्रसन्न होईल, असे त्यांना वाटत असते.
 
 
या पद्धती क्वचितप्रसंगी भीतीपोटी अथवा आशा-आकांक्षा यांच्या पूर्ततेसाठी आचरण्याची प्रथा आहे. त्याने मनाचा निग्रह वाढू शकेल, पण आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याचा फारसा उपयोग नाही. या तथाकथित उपासना पद्धतीत साधारणपणे व्रत-वैकल्ये, भोळ्या भावाने केलेल्या तीर्थयात्रा इत्यादीकांचा समावेश असतो. काही भाविक पवित्र क्षेत्रांना भेटी देऊन तेथे क्षौरकर्म करुन घेतात. ही प्रथा तिरुपतीच्या बालाजी यात्रेत दिसते. तेथे आंध्र प्रदेशातून येणार्‍या स्त्रियासुद्धा मुंडण करुन घेतात. काही लोक तीर्थयात्रा करताना देहाला कष्ट देतात. कोणी लोटांगण घालत देवालयाला आवारातून किंवा बाहेरुन प्रदक्षिणा घालतात, तर कोणी रस्त्याने दंडवत घालत जातात. हे भक्त नाना प्रकारचे निग्रह करुन देहाला कष्टवित असतात, पण त्याने देह पवित्र होत नाही. या देहाला मातीने खसाखसा घासले किंवा त्याला तप्त मुद्रांनी डाग दिले, अगदी त्याला तासून काढले, तरी तो शुद्ध होणार नाही.
 
 

नाना मृत्तिकेने घासिले। अथवा तप्त मुद्रेने लासिलें।
जरी हे वरी वरी तासिलें। तरी शुद्ध नव्हे॥
 
 
बरं याला आतून शुद्ध करावा म्हणून शेणाचे, गोमयाचे गोळे गिळले किंवा गोमूत्राचे गडवेच्या गडवे पिऊन पाहिले, तरी काहीही फरक पडणार नाही. रुद्राक्ष किंवा तुळशीच्या मण्यांच्या माळा गळ्यात घालून देखावा केला, तरी त्याने आत भरलेले दोष थोडेच नाहीसे होणार? त्यासाठी आत्मज्ञानच पाहिजे.
 

वेष वरी वरी केला। परी अंतरी दोष भरला।
त्या दोषाच्या दहनाला। आत्मज्ञान पाहिजे॥
 
 
लोक अनेक प्रकारची व्रत-वैकल्ये करतात, दाने-उद्यापने करतात. तसेच, योगसाधना करतात, तीर्थांना भेटी देतात, त्याने पुण्य संपादन करतात. हे सर्व एकत्र केले, तरी त्याला आत्मज्ञानाची सर येणार नाही. त्यांच्या कोटीपटीने आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, असे समर्थ म्हणतात.
 
 
नाना व्रतें नाना दानें। नाना योग तीर्थाटणें।
सर्वांहुनी कोटी गुणें। महिमा आत्मज्ञानाचा॥ (दा. १०.१०.६४)
 
 
आत्मज्ञानात परमात्मवस्तू आपण स्वत: सिद्ध आहोत, याची अनुभूती आल्याने साधकाची खात्री होते की, आता देहाचा आणि दृश्य इंद्रियज्ञानाचा संबंध संपला आहे. म्हणून आता इतर साधनांचे प्रयोग करण्याचे प्रयोजन उरले नाही. परंपरागत साधनांच्या आचरणाने फुकट क्षीण मात्र होणार आहे. देहबुद्धीच्या आचरणाने जी पापांची बाधा झाली होती, ती आता ज्ञानाने नाहीशी झाली आहे. अध्यात्मशास्त्राचा महिमा समजल्यावर साधक मीपणा, अहंकार, अहंभाव सोडून खर्‍या अर्थाने आत्मज्ञानाकडे वळतो. आत्मज्ञान तसेच आत्मवस्तू प्राप्तीसाठी वाटचाल करताना काय काय करायला हवे, याची चर्चा या पूर्वीच्या लेखांतून झाली आहे, तरी ते येथे थोडक्यात पाहू.
 
 
१) देहबुद्धी जाणीवपूर्वक बाजूला सारून अभ्यासाने आत्मबुद्धीचा आश्रय करावा.
 

२) ज्याच्या वाचनाने धैर्य उत्पन्न होते आणि विषयवासना मोडून पडते, अशा अध्यात्म ग्रंथांचे वाचन, मनन करावे.
 
 
३) अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने विरक्ती व भक्ती वाढली पाहिजे.

४) समाजातील, कुटुंबातील मानसन्मान, मानापमान, कुलाभिमान, जात्याभिमान, लोकाभिमान यांचा मनातून त्याग करुन सर्वार्थाने 
अभिमानरहित झाले पाहिजे.

५) संशय, शंका हे तसे हानिकारकच. मनाची संशय घेण्याची वृत्ती कमी करण्यासाठी सज्जनांची संगत धरावी.

६) आत्मज्ञानाविषयी कसलाही संदेह मनात न बाळगता आपली उपासना व साधना चालू ठेवावी. साधना करीत असताना मीपणा, 
अहंकार, अहंभाव, द्वेष, मत्सर, लोभ, स्वार्थ यांना जवळपास फिरकू देऊ नये.

७) अभ्यासाने व वैराग्याने चंचल मन वश होते, असे भगवद्गीता सांगते. त्याचा प्रत्यय पाहावा.

८) सद्गुरुच्या अथवा जाणत्याच्या मुखातून निघालेले आत्मज्ञान श्रवण करावे आणि त्यानुसार साधना करावी.

९) आत्मज्ञान प्राप्त होऊन आपण सिद्धावस्था मिळवली असे वाटले, तरी आपली साधना सोडू नये. याबाबतीत भगवान शंकरांचा आदर्श समोर ठेवावा.




ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मवस्तू यासंबंधी दासबोधातील विचारांंचा ऊहापोह करीत असताना वाचकांच्या मनात पुढील श्लोक उद्भवतात. ‘या आत्मवस्तू ज्ञानाचा फायदा काय? आत्मसाक्षात्कार झाल्यावरही आमचे वैयक्तिक, सामाजिक प्रश्न तसेच राहतील. असे असूनही स्वामी आत्मज्ञानाचा आग्रह का धरतात?’ या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. दासबोधात असे सांगितले आहे की, ब्रह्मज्ञान होणे किंवा आत्मवस्तूचा साक्षात्कार होणे, हे आपणच आपल्याला पाहण्यासारखेच आहे. आत्मवस्तू आपलेच स्वरुप असल्याने ते नित्यप्राप्त आहे. त्यामुळे त्याला वेगळे करुन पाहता येत नाही.



ही तत्त्वज्ञानाची भाषा ऐकली की, हा एक शाब्दिक कसरतीचा खेळ आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मग दासबोधातील ही भाषा ऐकून केवळ बौद्धिक आनंद मिळतो का, पण तसे नाही. केवळ शाब्दिक कसरत अनुभवायची तर वृत्तपत्रातील शब्दकोडे सोडवणे पुरेसे आहे. त्यासाठी तत्त्वज्ञानाचा खटाटोप कशाला? म्हणजे दासबोधातील आत्मवस्तूचे वर्णनही शाब्दिक कसरत नाही. आज सभोवतालचे वातावरण आशादायी नाही. अनेक गोष्टींसाठी कराव्या लागणार्‍या संघर्षामुळे आज प्रत्येक जण त्रस्त आहे, यात शंका नाही. वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेने नीच्चांक गाठला आहे. आपापसातील हेवेदावे, द्वेष, मत्सर, स्वार्थ, अहंभाव, भ्रष्टाचार इ. अवगुणांनी समाजमन व्यापले आहे. ते काम अध्यात्मशास्त्र नकळत करीत असते. यासाठी लोभ, मोह, आसक्ती, स्वार्थ सोडून समुदायासाठी काम करणारे समर्थांसारखे चारित्र्यसंपन्न संत हे आधार वाटतात, त्यांचे विचार समाजाला अध:पतनापासून वाचवू शकतात.



अध्यात्मज्ञानाच्या अभ्यासाने आत्मसंतुलन साधले जाऊन मन निराश न होता, कोणत्याही कठीण कार्यासाठी तयार होते. दासबोधासारख्या आध्यात्मिक ग्रंथ अभ्यासाने चारित्र्यज्ञानाच्या प्राप्तीसाठी जे नऊ उपाय वर थोडक्यात सांगितले आहेत, त्या मार्गाने जाणार्‍यांचे मन चारित्र्यसंपन्न नीतिमान होईल, याची कल्पना करता येेते. आत्मवस्तूला समजण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो, त्यातून ‘मीपणा’, ‘मीच सर्वात श्रेष्ठ’ अशा अहंभावाला आळा बसतो. त्याने अनेक प्रश्न सामंजस्याने सुटतात, मनाने संतुलन साधल्याने ते समाधानी होते आणि समाधानी मन यशस्वीरित्या काम करते.


 
 
आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने आध्यात्मिक स्थिर अवस्था प्राप्त होते हे तर खरेच, पण जाता जाता हे अप्रत्यक्ष फायदे साधकाला मिळतात व त्यातून वैयक्तिक, सामाजिक समस्या सोडवता येतात. यामुळेच समर्थांचा आत्मज्ञानासाठी आग्रह आहे, समर्थांनी त्यांच्यासाठी असे आत्मनिर्भर शिष्य तयार केले, त्यांना ते ‘महंत’ म्हणत असे िन:स्पृह महंत तयार करुन स्वामींनी त्यांना हिंदुस्थानावर ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यासाठी पाठवून दिले. हिंदू संस्कृतीच्या पडत्या काळात सुमारे ३५० वर्षांपूर्वी या महंतांनी कुठलाही राजाश्रय न घेता, जे काम केले त्याची कुठे नोंद नाही, आपण फक्त त्यांची कल्पना करु शकतो इतकेच. असे कार्य करण्यासाठी समर्थांसारखा विवेकी, नि:स्पृह, लोकस्थितीबद्दल आस्था असणारा आणि एकांतात राहून प्रचंड कार्य करणारा, लंगोटी, पादुका, कुबडी आणि काखेला झोळी एवढीच मालमत्ता असणारा असा संत हवा. समर्थांचे थोडक्यात वर्णन करायचे तर त्यांच्यात पुढील ओवीच्या आधारे करता येईल-
 
 
ज्ञानी आणि उदास। समुदायाचा हव्यास॥
तेणे अखंड सावकास। एकांत सेवावा।
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@