सक्षमीकरणाच्या वाटेवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
Asmita _1  H x
 
 
महिला ही शक्तीची प्रतीक आहे. तिच्यात अनेक गुणांचा संगम आहे. मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व यांनी ती ओतप्रोत आहे. आज ती उत्तम शिक्षिका, डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ, इंजिनिअर, गायिका, अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट उद्योजिका, अंतराळयात्री, व्यवस्थापक आणि प्रशासक आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात तिचे पाऊल तिने घट्ट रोवले आहे. या सर्व क्षेत्रांना जवळ करताना तिचा संघर्ष सतत चालू होता आणि आजही चालू आहे. दुर्गाशक्ती संदर्भात मनोगत व्यक्त करत आहेत नाशिकच्या न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य.
 
 
 
माझ्या आयुष्यात खरा संघर्ष सुरू झाला तो लग्नानंतर! पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम आल्याने नागपूरला नोकरी लगेच मिळाली होती, पण लग्नानंतर गोंदियाला आल्यावर माझे पंख कापल्यासारखे झाले. ना नोकरी, ना पुढील शिक्षण! काय करावे हा प्रश्न! मनात सारखे यायचे, आपल्या वडिलांनी लग्नाची घाई केली आणि तालुक्याच्या ठिकाणी मला दिली. शिकायची आवड, आयुष्यात पायावर उभे राहण्याची मनातील इच्छा, त्यामुळे मानसिक त्रास व्हायला लागला. मनाची घुसमट नुसती. त्यात पहिल्या मुलीचा जन्म आणि त्यात अजून भर की काय म्हणून इतर कौटुंबिक समस्या! या सगळ्यामुळे जरा नाराज राहू लागले. पण, पुन्हा मनाने उचल घेतली आणि प्रवेश परीक्षा पास करून ‘एमबीए’ या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. सोबतच नागपूरच्या विधी महाविद्यालयात केवळ ५०  रुपये प्रति तासिका तत्त्वावर व्याख्याता म्हणून काम सुरू केले. गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवास करून लहान मुलीला सोबत घेऊन माझे करिअर सुरू केले. त्यावेळी कुठून सारे बळ येत होते माहिती नाही, पण सारेच आत्मविश्वासाने करीत गेले. याआधी कधीही एकटीने प्रवास केलेला नव्हता. पण, हिंमत करुन शिक्षण घेत नोकरी केली. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल पाच वर्षं! या आयुष्याच्या प्रवासात अनेक प्रसंगांना धीराने सामोरे जात गेले.
 
 
 
 
एकदा आमची गाडी भंडारा जवळच्या स्थानकावर थांबली आणि विद्युतप्रवाहात अडचण आल्याने संध्याकाळी 8 वाजता पोहोचणारी गाडी रात्री १२ वाजता गोंदियाला पोहोचली. रेल्वे स्थानकापासून आमचे घर चार किलोमीटरवर आणि तेही नवीन वस्तीत. रस्ता एकदम एकटा. अनोखळी. त्यावेळी आजच्यासारखा मोबाईलही नव्हता मिनिटा-मिनिटांचा अहवाल द्यायला. मग सारा धीर एकवटला. हिंमत धरली आणि एका सायकल रिक्षावाल्याला घरी पोहोचवण्याची विनंती केली. तो कसाबसा तयार झाला आणि माँ दुर्गेचे नाव घेत मी सुखरूप घरी पोहोचले. ५० रुपये प्रति तासिका तत्त्वावर सुरू केलेला प्रवास आज प्राचार्य म्हणून स्थिरस्थावर झाला. इच्छाशक्ती, आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न आणि ध्यास यामुळेच एकेक आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होत गेले आणि एकेक पायरी वर चढत गेले. या आयुष्याच्या प्रवासात मला प्रकर्षाने जाणवलं की, सामान्य स्त्रीला तिच्या अधिकारांची मुळीच जाणीव नाही आणि नसते. हे चालीरितीप्रमाणे पुढे पुढे जात राहते. अनेक वेळा तिच्यावर होणार्‍या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी ती तयारच नसते. केवळ यामुळे अत्याचार सहन करत राहते. म्हणूनच कायदेविषयक जागृती महिलांमध्ये करण्याचे ध्येय मनाशी मनात ठरवले.
 
 
आजची महिला ही खरोखरीच दुर्गेचा अवतार आहे. अनेक आघाड्यांवर आज ती एकटीच लढते आहे. तिच्यासमोर असणार्‍या समस्यांना अंत नाही. सुरुवातीला म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी शिक्षण घेण्यासाठी धडपडणारी ‘ती’ आज बहुतांशी शिक्षित झाली आहे. पण, त्याबरोबरच अनेक समस्यांचे दालन तिच्या समोर उभे ठाकले आहे. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था, लिंगभेद, सामाजिक भेदाभेद, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि राजकीय परंपरेचे अवजड आवरण, निसर्गाने तिच्यावर टाकलेली मातृत्वाची जबाबदारी, सामाजिक असुरक्षितता, आर्थिक दुर्बलता, अशिक्षितता, धार्मिक प्रतिबंध आणि पुरुषांची मानसिकता या कारणांमुळे तिला पावलोपावली संघर्ष करावा लागला आणि अजूनही हा संघर्ष संपलेला नाही.
 
 
तिला आजही कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, गर्भपात यांंसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात नवनवीन समाजनिर्मित समस्याही तिच्यापुढे येऊन उभ्या ठाकल्या आहेत. सायबर गुन्हे, कामाच्या जागी लैंगिक छळ, अ‍ॅसिड हल्ले, ऑनर किलिंग, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्काराचे वाढते प्रमाण, मुलींची तसेच महिलांची तस्करी, गर्भाशयाचे बाजारीकरण, ‘ती’चे वस्तुकरण आणि लिव्ह-इन-रिलेशनशिप यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तिच्या नैसर्गिक अधिकारांसाठी आणि मानवी अधिकारांसाठी झुंजावे लागते. महिलांना असलेल्या अधिकारांची जाणीव जोपर्यंत तिला होणार नाही, तोपर्यंत ती अशीच राहील हे जाणून घेऊन, तिला तिच्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे व्रत मी हाती घेतले.
 
 
 
विधी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांविषयक कायदे जागृती करून जवळपास पाच हजारांच्यावर महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. विधी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण गुणवत्ता यादीत पहिले येऊन आणि सुवर्णपदक मिळवून पूर्ण केले. विधी विषयात विद्यावाचस्पती तसेच, विद्यापीठ क्रमांकाने उत्तीर्ण करून आणि सोबतच संगीत विशारद महाराष्ट्रात प्रथम येऊन पूर्ण केले. नागपूर दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवर सात वर्षे निवेदिकेचे काम केले. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी ‘तेजस्विनी’, ‘नवदुर्गा’ आणि ‘सुपर वुमन २०२०’ अशा पुरस्कारांनी सन्मानित, शंभरच्यावर वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाले. आकाशवाणीवरून महिलांना कायदेविषयक माहिती, तसेच अनेक कायदा जागृती शिबिरे आयोजित केली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, आठ पुस्तके आणि 40च्या वर माझे संशोधन लेखही प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर मी विद्यापीठ स्तरावर अनेक समित्यांवर असून पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहे. गेले 25 वर्षं विधी शिक्षणक्षेत्रात कार्यरत असून २००९ पासून न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात प्राचार्या म्हणून कार्यरत आहे. शिक्षणात भारतीयत्व आणण्यासाठी मी प्रयत्नशील असते. भारतीय शिक्षण मंडळ, नाशिक शहर अध्यक्षा म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्था आणि विशाखा समिती सदस्य म्हणूनही काम सुरू आहे. हे सर्व करताना मी व्यावसायिक अडचणींवरदेखील मात केली.
 
 
विविध वृत्तपत्रांतून सातत्याने महिलांविषयक कायद्यांवरील लेखनाबरोबरच अनेक परिषदांमधून महिलांच्या अधिकारांबद्दलची जाणीव आणि आकाशवाणीच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्कांची माहिती करून देण्याचा माझा प्रयत्न सातत्याने सुरूच आहे. त्याचप्रमाणे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन आम्ही कायदे जागृती शिबिरेही आयोजित करतो. अनेक महिलांना आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देतो. अनेकांना मोफत कायदेविषयक सल्ला देऊन त्यांच्या समस्येवर तोडगा काढतो. यामध्ये विवाहामुळे मिळणारे अधिकार, दत्तक ग्रहण आणि त्या अनुषंगाने मिळणारे अधिकार, पोटगीचा अधिकार, प्रसुती सुविधा कायदा, गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रतिबंधक कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा, विधवा विवाह, बालविवाह, विदेश विवाह, विशेष विवाह, वारसा हक्क, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, त्यात दिलेले संरक्षण तसेच तिचे आर्थिक अधिकार सामाजिक, संविधानिक, राजकीय आणि कौटुंबिक अधिकारांची ओळख करून देण्याचे काम सतत सुरू आहे. यातून महिला सबलीकरणाचे काम, महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरू आहे.
 
 
 
प्रत्येक महिला, आपली प्रत्येक भगिनी सक्षम, सबळ सुशिक्षित, सुलक्षणी, सुभाषिणी, सुगरण, सुस्वभावी, सुशील, सुमाता, सुकन्या, सुभगिनी, सुजला, सुफला, सुवचनी, सत्यवचनी, सुविचारी, सुसंस्कारी असेल, यासाठी तिला अंतरंगी सशक्त करण्याचे आणि स्वयंसिद्धा तयार करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यातूनच सुविचारी समाज निर्माण होणार आहे. सुसंस्कृत समाज घडविण्याची ताकद आजच्या नवदुर्गेत आहे. ती अष्टभुजा आहे. ती शक्तीचे रूप आहे. ऊर्जेचा स्त्रोत आहे. जननी आहे आणि म्हणूनच तिला अधिक तेजस्वी बनविण्यासाठी तिला कायद्याने दिलेल्या अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे. पुस्तकी शिक्षणासोबत तिला व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अधिक जागृत केले, तर ते तिच्या अधिक फायद्याचे ठरेल. तिची सांस्कृतिक आणि संस्कार प्रगती तिच्या व्यक्तिमत्त्वात भर घालेल, हे जाणून आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करतो.
 
 
 
खरं तर हे स्त्री सबलीकरणाचे बाळकडू मला माझ्या आईकडूनच मिळाले. कारण, ती अतिशय सहजतेने अनेक महिलांच्या समस्या समजून घेऊन तोडगा सुचवीत असे. महिलांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व विकासाच्या वाटा दाखवून वर्षानुवर्षे तिच्यावर असणार्‍या कुप्रथांचा प्रभाव मिटवणे आणि तिची मानसिकता बदलणे आज आवश्यक आहे. तसेच तिच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, तिला आत्मसन्मानाची जाणीव करून देणे, तिचे आत्मज्ञान वाढवणे, तिची आत्मशक्ती वाढवणे, निर्णय क्षमता वाढवणे, तिला आत्मपरीक्षण करण्याची सवय लावणे, तिने आत्मभान ठेवणे आणि आत्मजागृती करणे यातूनच स्त्रीशक्ती जागृत राहू शकते, असे माझे ठाम मत झाले. यातूनच समाजकार्य शिक्षण आणि कायदा जागृती यांची गुंफण करून स्त्रीशक्तीचा जागर करण्याचे सत्कार्य सुरू आहे.
 
 
 
तपस्विनी, तेजस्विनी, सौदामिनी, रागिणी, दामिनी, कामिनी, स्वामिनी आणि मानिनी असलेल्या मातृशक्तीला शत् शत् नमन!



- प्रा. डॉ. अस्मिता वैद्य
@@AUTHORINFO_V1@@