स्वत:मधील ‘दुर्गा’ ओळखून प्रत्येकाने वागावे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020
Total Views |

Dr Medha Somaiya_1 &




परिस्थितीवर मात करण्यासाठी पहाडाचे काळीज असणारी आणि तितकीच संवेदनशील असणारी शक्ती म्हणजे दुर्गाशक्ती. महिला शक्तीच्या आयामांचा मागोवा घेताना, समान स्तर एकच जाणवतो तो म्हणजे, तिच्या ठायी असलेली देवीमातेची करूणा, सहनशीलता आणि देवीमातेचेच शौर्य आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चा अमूल्य ठसा उमटवणार्याण प्रा. डॉ. मेधा सोमय्या यांनी नवदुर्गेच्या स्वरूपासंबंधी व्यक्त केलेले हे विचार...




दुर्गे दुर्घट भारी, तुजवीण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी॥

 
 
 
जेव्हा धड बोलताही येत नव्हतं, तेव्हापासूनच आरती करताना दुर्गा देवीची झालेली ही ओळख. नंतर बालपणी नवरात्रात गावाबाहेरच्या टेकडीवरच महालक्ष्मी मंदिर, त्याच्या पुढची जत्रा. नाही म्हटलं तरी पाच किमी जायचं आणि तेवढंच यायचं. उत्साह होता. नेहमी न मिळणार्या् गोष्टी मिळायच्या. शाळेत जायला लागल्यावर छोट्या-मोठ्या मैत्रिणींसह जाण्यात खूपच ‘थ्रील’, स्वातंत्र्य वाटायचं. शाळेत आमच्या वर्गातील मुलींच्या डोक्यातील फुलाच्या वेण्यांची चुरस असायची. लांब आणि दाट केस.
 
 
 
दोन वेण्यात काळ्या रिबिनीने गच्च दुपदरी, तीनपदरी बांधलेल्या, त्यावर एक तरी वेणी हवीच. कुणी कुणी दोन्ही वेण्यांवर दोन पण माळायचं. त्यात पण किती प्रकार, पांढरी, पिवळी शेवंती तर हवीच. त्यावर हिरवी पाने आणि कलाबूत. कधी अबोली तर कधी चाफा. वरणभाताची, सिंगल डेकर, डबल डेकर. गजरे इतर वेळी पण वेण्या नवरात्रीत खास, त्यातून देवीवरून काढलेली प्रसादाची वेणी म्हणजे कोडकौतुक. चौल भागात देव्यांची देवळे भरपूर. नवरात्रात नऊ देवळे करायची. शीतलादेवी, पद्मावती, इ. कोकणस्थांकडील दुर्गाष्टमीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मी. ते रात्रभर घागरी फुंकणे. तेव्हा अनेक रूपे म्हणजे मैत्रिणीसारखी भासायची. कधी देवीला ‘अहो-जाहो’ केलेलं आठवत नाही.
 
 
शाळेत देवीची आरती मराठीत अभ्यासाला होती तेव्हा आणि जेव्हा राष्ट्र सेविका समितीत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणायचो तेव्हा ‘दुर्गा दशप्रहरणधारिणी’चा अर्थ कळला, तेव्हा दुर्गा म्हणजे काय, राष्ट्राला मातृभूमी का म्हणतात, याचे आकलन झाले. मातेप्रमाणेच मातृभूमीसुद्धा आपल्या दहा हातात दहा शस्त्रे घेऊन लेकरांच्या रक्षणार्थ दुष्टांचा नाश करण्यास सिद्ध आहे. तेव्हा कळले की, प्रत्येक स्त्री आई बनते, तेव्हाच दुर्गा बनलेली असते. जशी जाणती झाले तसे वाईट गोष्टींचे पारिपत्य करायला, दुर्गा बनण्यासाठी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे गरजेचे नसते. परिस्थितीवर मात करण्यासाठी पहाडाच्या काळजाने उभी असलेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे दुर्गा.
 
 
गुंडांशी लढताना दोन पाय गमावून बसलेली, तरी एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी अरुणिमा सिन्हा, नृत्यांगना सुधा चंद्रन, पद्मश्री डॉ. दीपा मलिक, रेल्वे अपघातात पाय गमावलेली तरीही डॉक्टर होण्यासाठी सरकारी व्यवस्थेशी दोन हात करून नियम बदलायला लावून डॉक्टर झालेली रोशन शेख, अशा कितीतरी जणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. समाजातील अन्याय दूर व्हावा म्हणून ‘दशप्रहरिणी’ झालेल्या दुर्गा तर गावोगावी सापडतील. काही प्रकाशात येतात, तर काही नाही एवढाच काय तो फरक. हा लेख लिहिण्यासाठी जेव्हा विचारणा झाली, तेव्हा माझ्या आयुष्यातील अशा काही गोष्टी अधोरेखित कराव्यात, असे सांगितले गेले.
 
 
खरंतर तो माझा संस्कारित स्वभाव नाही. म्हणजे काम करताना गोड बोलून अधिक कामे होतात. सत्ता धारण करणार्या अधिकार्याापेक्षा त्याच्या हाताखालील व्यक्तीकडून कामे करवून घेणे, मला जास्त जमते. कुणी कामात अडथळा आणायचा प्रयत्न केला, तर तो दगड आहे, असे समजून वळसा घालून काम करते. कारण, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा फक्त एकच मार्ग नसून बरेच मार्ग असतात, यावर माझा विश्वास आहे. असे असूनही अनेकदा नाईलाजाने पंगा घ्यावा लागतो. सर्वात ठळक आठवण आणीबाणीमध्ये केलेल्या सत्याग्रहाची. वयवर्ष १६. अंधाराशी लढणं होतं ते पण ठामपणे निभावले. १९८४-८५ ला ‘बेस्ट’ बसने प्रवास करताना एका चालकाने पैशाचा दुर्व्यवहार केला होता, त्याच्या विरुद्ध व्यवस्थापनाकडे लिखित तक्रार दाखल करून, सुनावणीच्या वेळी एकटी जाऊन त्याच्या विरुद्धचा गुन्हा पुराव्यासह सिद्ध केलेला आठवतोय.
 
 
जाणूनबुजून कायदे मोडणार्यां विरुद्ध मूळ स्वभावानुसार उद्भवलेल्या संतापावर मात्र अजूनही काबू ठेवू शकत नाही. लाच खाणे, सुट्टे पैसे परत न करणे, रांग मोडून पुढे घुसणे, रस्त्यावर कचरा टाकणे अशा बाबींमध्ये मी बहुधा दोषींना धडा शिकवतेच. एका पोलिसाचा लाच खातानाचा व्हिडिओ काढून मी तक्रार केली होती. कुणी मला विकृत शारीरिक स्पर्श केला, तर त्याची कॉलर पकडून दोन मुस्काटात मारायला पण मी कमी केलेले नाही. आता याला ‘दुर्गाभाव’ म्हणायचे की समाजातील वंचित आणि शोषित घटकांसाठी झटणार्याि माझ्या कामांना?
 
झोपडपट्टीतील महिलांसाठी आत्मनिर्भरता, मुलांसाठी शिक्षण-प्रशिक्षण, रुग्णसेवेची तळमळ, ग्रामीण तरुणींसाठी उपजीविका, मुलीचे कन्यादान करू नये, नेत्रदान, अवयवदान करावे यासाठी जनजागृती याला ‘दुर्गाभाव’ म्हणायचे ते आपण पाहा. माझ्या दृष्टीने, पहाडासारख्या काळजाने घेतलेला योग्य असा ठाम निर्णय, त्याच्यावर अंमलबजावणीची किल्ले बांधणी आणि पाठपुराव्याची अभेद्य अशी तटबंदी, तसेच कुठे दगाफटका होणार नाही, याची घेतलेली दक्षता म्हणजे ‘दुर्गाभाव.’ तो प्रत्येक व्यक्तीतच असतो. त्याला लिंग, पंथ असं काही नसतं. फक्त स्वत:तली ‘दुर्गा’ ओळखून प्रत्येकाने वागावे म्हणून तर नवरात्रीचे जागरण!
 
- प्रा. डॉ. मेधा सोमय्या
@@AUTHORINFO_V1@@