मुंबई मेट्रो आली कुठवरी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020   
Total Views |

mumbai metro_1  


आजपासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी सरकारने खुले, तर मोेनो रेल्वे १८ ऑक्टोबरला आणि मेट्रो १९ ऑक्टोबरला रुळावर आली खरी. पण, या ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईतील लोकलला पर्याय ठरु शकणार्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील विविध मेट्रो मार्गांची प्रगती कुठवर आली आहे, त्याचा घेतलेला हा आढावा...


मुंबईतील ज्या प्रस्तावित १४ मेट्रो रेल्वे मार्गिकांच्या कामाला सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, अशापैकी अनेकांचे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे व उर्वरित मेट्रो प्रकल्प नियोजनाच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे सर्व प्रकल्पांचे नियोजित वेळापत्रकानुसार काम झाल्यास २०२६ पर्यंत मुंबईतील वाहतुकीचे चित्र पूर्णत: पालटलेले असेल.


सहा चिनी कंत्राटदारांना मेट्रोची कामे

मुंबईतील पायाभूत प्रकल्पांची कामे अनेक चिनी कंपन्यांना एमएमआरडीएकडून देण्यात आली होत. आता ती कंत्राटे रद्द करायची का, या विचारात सरकार सापडले असताना, किमान मेट्रोच्या कामामधील मार्ग २ अ, ३, ४, ६ व मोनो रेल्वेची कामे रखडणार नाहीत, याची काळजी सरकारने घेतली आहे.

मेट्रो भवन

मेट्रो भवनासाठी प्रस्तावित असलेली जागा सरकारने वनासाठी राखीव ठेवलेल्या आरे कॉलनीतील ६०० एकरच्या बाहेर आहे, तसेच मेट्रो भवनाकरिता जो भूखंड घ्यावा लागणार आहे, तेथील वृक्षतोडही मर्यादित आहे. गोरेगाव आरेच्या हद्दीत हरित क्षेत्रातील २.०३ हेक्टर जागेवर २७ मजली मेट्रो भवन बांधण्यास काही अडचण येणार नाही, असे संकेत सध्या तरी मिळत आहेत. परिचलनाचे नियंत्रण केंद्र (२४२८३ चौ.मी.), मेट्रो संबंधित कार्यालये (८०१७१ चौ.मी.) आणि मेट्रो निगडित प्रशिक्षण संस्था (९६२४ चौ.मी.) याच क्षेत्रात असणार आहे.

मेट्रो कारशेड

मेट्रोपैकी मार्ग २-अ ची कारशेड चारकोपमध्ये, मार्ग २-ब चीमंडालेमध्ये असेल. पण, मार्ग ३-आरेमध्ये फडणवीस सरकारने नक्की केलेली आरे कॉलनी येथील कारशेडची जागा विद्यमान ठाकरे सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे मेट्रो मार्ग ३ च्या टप्पा १ चे (सीप्झ ते वांद्रे) काम वेळेवर २०२१ मध्येे पूर्ण होऊ शकणार नाही. ही मेट्रो शेड कांजुरमार्गाला मेट्रो-६ बरोबर होईल, असे दिसते. पण, या निर्णयामुळे मेट्रो-३ चे काम काही काळ रखडले जाणार व त्याच्या खर्चात काही कोटींची भर पडणार आहे, हे निश्चित. मेट्रो मार्ग-४च्या कारशेडची जागा अजून निश्चित झालेले नाही. मोगरपाडा येथील सरकारी २०० एकर जागेपैकी काही ८०-८५ एकर जागा शिल्लक आहे, त्यातील ४५ एकर जागा मेट्रो कारशेडसाठी विचाराधीन असल्याचे समजते. तसेच मार्ग ५- कल्याण एपीएमसी, मार्ग ६-कांजूरमार्ग, मार्ग ७-दहिसरची कारशेडची जागा अजून ताब्यात मिळालेली नाही, त्यामुळे तात्पुरती सोय चारकोपला होऊ शकते.


मेट्रो डब्यांची निर्मिती


मार्ग २ अ, मार्ग २ ब, मार्ग ७ व मार्ग ३ व आणखी थोड्या जास्त अशा ८४ गाड्यांसाठी ५०४ डब्यांच्या निर्मितीला ‘मेक इन इंडिया’नुसार निर्मितीला सुरुवात झाली आहे. हे डबे पुरविण्याचे काम (कंत्राट रु ३,०१५ कोटी) बीईएमएल करत आहे. सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असून त्यांची रुंदी ३.२ मी. आहे. एका डब्यात ३३४ या हिशोबाने सहा डब्यांच्या गाडीची २,०२२ इतकी प्रवासी क्षमता असेल. ही गाडी चालकविरहित स्वयंचलित राहणार व सुरक्षित आरामदायी व सीसीटीव्हीयुक्त असणार. त्यात अग्निशमन, धूर व अग्निरोधक यंत्रणा, वातानुकूलता व आर्द्रता नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित असतील.

पाणी तुंबू नये म्हणून विशेष खबरदारी

मेट्रोच्या प्रकल्प स्थळावर पालिका व मेट्रोचे काम पाहणार्यास एमएमआरडीए अशा दोन्ही संस्थांनी खड्ड्यात पाणी तुंबू नये म्हणून करडी नजर ठेवली आहे. त्यांनी अडचणीच्या व सपाट प्रदेशात पाण्याचा उपसा करण्यासाठी १२ डिवॉटरिंगसाठी पंपांची व्यवस्था केली आहे. मेट्रोची कामे कोरोनाकाळात पुरेशा मजुरांभावी रखडू नयेत, म्हणून मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुढाकार घेतला आहे. कंत्राटदारांची जबाबदारी स्वत:वर ओढून घेतली आणि मनुष्यबळ पुरविण्यासाठी जाहिरात दिली आहे.वर दर्शविलेल्या अडचणी बघितल्यावर आपण मेट्रोची सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल बांधकामाची काय प्रगती आहे याची माहिती घेऊया.

मेट्रो मार्ग कामाचे वर्णन लांबी प्रकल्प खर्च (कोटी रु.) अपेक्षित सेवाकाल

मेट्रो २ अ. दहिसर-डीएननगर उन्नत १८.६ किमी ६,४१० मे २०२१
मेट्रो २ ब. डीएननगर-मंडाला उन्नत २३.६ किमी १०,९८६ डिसेंबर २०२२
मेट्रो ३. कुलाबा-सीप्झ भूमिगत ३३.५ किमी २३,१३६ २०२४/२५
मेट्रो ४. वडाळा-कासारवडवली उन्नत ३२.३ किमी १४,५४९ २०२२
मेट्रो ४ अ. कासारवडवली-गायमुख उन्नत २.७ किमी ९४९ २०२२
मेट्रो ५. ठाणे-भिवंडी-कल्याण उन्नत २४.९ किमी ८,४१७ टप्पा १ चे काम २०२४
मेट्रो ६. लोखंडवाला-विक्रोळी उन्नत १४.५ किमी ६,७१६ २०२२
मेट्रो ७. दहिसर-अंधेरी (पूर्व) उन्नत १६.५ किमी ६,२०८ मे २०२१
मेट्रो ८. विमानतळे जोड उन्नत- ३५ किमी १५,००० नियोजनात
मेट्रो ९. अंधेरी-विमानतळ उन्नत १३.५ किमी ६,६०७ नियोजनात
मेट्रो १०. गायमुख-शिवाजी चौक उन्नत ९.२ किमी ४,४७६ नियोजनात
मेट्रो ११. वडाळा-जीपीओ उन्नत-१२.७ किमी ८,७३९ नियोजनात
मेट्रो १२. कल्याण-तळोजा उन्नत २०.७ किमी ५,८६५ नियोजनात
मेट्रो १३. शिवाजी चौक-विरार उन्नत २३ किमी ६,९०० नियोजनात
मेट्रो १४. कांजुरमार्ग-बदलापूर उन्नत ४५ किमी १३,५०० नियोजनात

मेट्रोमार्गांची अधिक माहिती

मेट्रो मार्ग २ अ -
या दहिसर (प)-डीएननगर मार्गाचे ८५ टक्के बांधकाम पुरे झाले आहे. १७ पैकी १५ स्थानके पुरी झाली आहेत. डबे आणण्यात थोडा विलंब झाला व ही सेवा जानेवारीच्या चाचणीनंतर मे २०२१ मध्ये सुरू होईल. दहिसर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे ट्रॅक ओलांडून स्टील गर्डर टाकण्याचे अवघड काम दोन महिने आधीच यशस्वीपणे पुरे करण्यात आले. मार्ग २ अ व ७ करिता चाचण्या घेण्यात आता अडचण पडणार नाही.


मेट्रो मार्ग २ ब -
एमएमआरडीएने प्रकल्पासंबंधित आयकॉनिक पुलांच्या तीन निविदा रद्द केल्या आहेत. या निर्णयामागचे कारण कळले नाही. प्रकल्प कामाला त्यामुळे थोडा फटका बसला आहे. पाच स्थानकांचे फाऊंडेशन व पायलिंगचे १५ टक्के काम व एक हजार १२ पिलरपैकी ६३ पिलर पुरे झाले आहेत. या कामाची डिसेंबर २०२२ ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. ८६ तिवरांची झाडे तोडण्याची न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. या कामातील काही अडचणींमुळे एमएमआरडीए व कुर्ला प. ही दोन स्थानके रद्द केली आहेत.


मेट्रो मार्ग ३ -
कुलाबा ते सीप्झ मेट्रो कारशेड आता आरे कॉलनीऐवजी कांजुरमार्गला होण्याची शक्यता आहे. मेट्रो टनेलिंगचे काम २०२१ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. ३२ बोगद्यांपैकी ८७ टक्के बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. ही मेट्रो २०२२ लवकरात लवकर सुरू करण्याचे एमएमआरसीएलचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोचे अत्याधुनिक रूळ दाखल झाले आहेत. ही रूळ यंत्रणा उच्च प्रतीची व अत्यल्प कंपने करणारी यंत्रणा देशात प्रथमच वापरण्यात येणार आहे.


मेट्रो मार्ग ४ -
वडाळा-कासारवडवली मार्गासाठी ३५७ खारफुटींची झाडे तोडावी लागत होती, त्याकरिता न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. दहापट रोपटी लावायची आहेत.

मेट्रो मार्ग ६ - लोखंडवाला-विक्रोळी मार्गाकरिता ७७८ पैकी ८८ पिलर उभारणी पूर्ण. स्थानकांचे व पायलिंगचे ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची डेडलाईन डिसेंबर २०२२ अशी निश्चित करण्यात आली आहे.


मेट्रो मार्ग ७ -
दहिसर-अंधेरी पूर्व मार्गाकरिता ९० टक्क्यांहून जास्त काम पूर्ण झाले आहे. जानेवारीच्या चाचणीनंतर मे २०२१ मध्ये सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो स्थानकातून डायरेक्ट ओबेरॉय मॉल व सरोवा प्रॉपर्टीपर्यंत पोहोचण्यासाठी सव्वा किमीचा पादचारी पूलही असेल.तेव्हा, एकूणच मेट्रो रेल्वेमार्गांच्या या जाळ्यामुळे मुंबईची गती आगामी काळात अधिकच वाढेल, यात शंका नाही. परंतु, यासाठी चालू प्रकल्पांची जलद अंमलबजावणी आणि प्रस्तावित प्रकल्पांचे सुयोग्य नियोजनही तितकेच आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@