ग्रामोदयाची आस असणारे कुलगुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020   
Total Views |

mansa _1  H x W


कौशल्याधारित आणि ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याकामी आग्रही असणारे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याविषयी...


“शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास सहज शक्य आहे. भारताला ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘स्मार्ट व्हिलेज’ या कार्यक्रमाची आवश्यकता आहे,” असे स्पष्ट मत नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन व्यक्त करतात. ‘लोकप्रशासन शास्त्र’ या विषयात विद्यावाचस्पती असणारे डॉ. ई. वायुनंदन हे मूळचे आंध्र प्रदेशातील. त्यांचे शालेय शिक्षण तेथील विद्यारण्या शाळेत झाले. त्यांनतर उस्मानिया विद्यापीठात त्यांनी पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वायुनंदन यांचे बहुतांश आयुष्य हे शहरी भागात व्यतीत झाले. मात्र, विद्यापीठात शिक्षण घेत असताना तेथील इतर विद्यार्थ्यांमुळे त्यांना ग्रामीण भागाचा खरा परिचय झाला. त्यामुळे शहरी भागात वास्तव्य करूनदेखील त्यांची नाळ ग्रामीण भागाशी भावनिकरीत्याही जोडली गेली.


विद्यार्थीदशेत विद्यार्थी युनियनचे नेतृत्व त्यांनी केले. त्यामुळे भविष्यात राजकारणात दाखल होण्याचा त्यांचा त्यावेळी मानस होता. मात्र, एम.फील करत असताना त्यांना प्रसिद्ध निजाम महाविद्यालयात अध्यापन करण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी विद्यार्थी हितगुज आणि नवनवीन विषयावर मांडणी करण्याचे काम त्यांनी शिक्षक म्हणून केले. त्यामुळे अध्यापन क्षेत्रात त्यांची रुची अधिकच वाढत गेली. राजकारणातदेखील हितगुज आणि मांडणी हे कार्य केले जात असते. मात्र, शिक्षणक्षेत्रात गाभा हा विस्तृत असतो. तसेच, ज्ञान समृद्ध होण्याचीदेखील संधी वारंवार प्राप्त होत असते, हे त्यांनी जाणले. त्यामुळे आपले पुढील आयुष्य शिक्षण क्षेत्रात व्यतीत करण्याचे त्यांनी मनाशी निश्चित केले.विद्यापीठात शिक्षण घेत असताना तेथे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील होते. त्यांचा जीवनसंघर्ष, शिक्षणाप्रति असणारी त्यांची तळमळ यामुळे वायुनंदन यांचा सामाजिक स्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खर्‍या अर्थाने बदलला. या विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवनमान ते त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे वायुनंदन यांना खर्‍या अर्थाने प्रेरणा मिळाली.अनेक वर्षांपासून ते शिक्षणक्षेत्राशी प्रत्यक्षरीत्या जोडले गेलेले आहेत. १९८७मध्ये त्यांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात अध्यापनाचे कार्य सुरू केले. मार्च २०१७पासून ते नाशिक येथील मुक्त विद्यापीठात कुलगुरू या पदावर विराजमान आहेत.“शिक्षण आणि आरोग्य हे समाजाचे महत्त्वाचे अंग असून, राज्याची या दोन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रविकासासाठी या दोन क्षेत्रांत अविरत कार्य होणे आवश्यक आहे,” असे ते आवर्जून नमूद करतात. या दोन क्षेत्रांचे खासगीकरण होणे, हे समाजव्यवस्थेसाठी धोक्याचे असल्याचे ते म्हणतात.


मुक्त विद्यापीठातील शिक्षक आणि कुलगुरू म्हणून समाजाच्या अंतिम घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्याकामी मुक्त विद्यापीठ हा सक्षम पर्याय असल्याचे त्यांचे मत आहे. समाजातील सर्वच पातळीवर मुक्त शिक्षण हे आवश्यक असून, मुक्त शिक्षण हे ‘सेकंड क्लास’ नसून, तो ‘सेकंड चान्स’ असल्याची वायुनंदन यांची धारणा आहे.नवीन शैक्षणिक धोरण हे भारताच्या भविष्यासाठी पोषक आहे. नैसर्गिक पद्धतीने आणि मातृभाषेतून प्राप्त होणारे शिक्षण हे योग्यच असल्याची स्पष्ट भूमिका ते मांडतात. कुलगुरू म्हणून ते आजच्या काळात सुरू असणारे ऑनलाईन शिक्षण हे जरी योग्य असले तरी तो एक पर्याय असल्याचे ते नमूद करतात. प्रचलित आणि ऑनलाईन यांचा संगम शिक्षण पद्धतीत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण हे पर्यात्मक असावे, अनिवार्य नसावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. तसेच, भारतीय समाजात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारी संसाधने सरकारने आधी उपलब्ध करून देणे आवश्यक असून, नंतरच भारतीय समाजात ते शिक्षण खर्‍या अर्थाने रुजेल, अशी भूमिका वायुनंदन मांडतात.

भारतीय समाजमन आणि भारताचा खरा उत्कर्ष हा ग्रामीण भागाच्या विकासात आहे. याची पक्की खात्री असल्याने वायुनंदन हे आगामी काळात मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तालुकापातळीपर्यंत कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या गौरवशाली प्रवासाचे श्रेय ते प्रथम कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना देतात. नाशिक येथील मुक्त विद्यापीठाने ई. वायुनंदन यांच्या नेतृत्वात २०१९ मध्ये ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सिलन्स फॉर इन्स्टिट्यूशनल अचिव्हमेंट’ हा पुरस्कार दुसर्‍यांदा प्राप्त केला आहे. यापूर्वी सन २००२ मध्ये हा पुरस्कार विद्यापीठाला प्राप्त झाला होता. राष्ट्रकूल राष्ट्रात आणि भारतात अशाप्रकारे दोनदा पुरस्कार मिळविणारे हे पहिले मुक्त विद्यापीठ आहे, हे विशेष.बदलती सामाजिक परिस्थिती आणि होणारा विकास हा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ औपचारिक शिक्षण न घेता कौशल्याधारित शिक्षण घ्यावे, असा संदेश ते देतात.विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून केवळ घनपाठी असणे किंवा थेअरी आधारित नियोजन नसावे, अशी सामान्य अपेक्षा असते. यासाठी स्वतः विद्यार्थी, प्राध्यापक आणि कुलगुरू हा प्रवास जगणे आणि तो समजून घेणे आवश्यक असते. हेच डॉ. वायुनंदन खर्‍या अर्थाने जगत असल्याचे दिसून येते.शाश्वत राष्ट्रविकास व्हावा, यासाठी वायुनंदन हे ग्रामीण विकासाचा आग्रह धरतात. त्यांच्या आगामी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.

@@AUTHORINFO_V1@@