खानदेशातील खानदानी निसर्गचित्रकार : पी. एम.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020
Total Views |


Pundalik Mahajan _1 

विविध प्रदर्शने, विविध पुरस्कार आणि अनेक नामवंत संग्राहकांनी निसर्गचित्रकार पुंडलिक महाजन यांच्या निसर्गचित्रणांना, त्यांच्या संग्रहात सन्मानाने स्थान दिलेले आहे.


औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाचे सध्या सुरु असलेले वर्ष म्हणजे २०२०-२१ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. माझाही खारीच्या वाट्याप्रमाणे एक छोट्यासा वाटा आपल्या मातृसंस्थेसाठी सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु आहे आणि काल पी. एम. महाजन यांचा फोन आला. नंबर जरी माझ्या फोनच्या यादीत नव्हता तरी आवाज मात्र डाव्या मेंदूत कायम ध्यानात होता व आहे. मी म्हटलं, “बोल रे!” तो म्हणाला, “अरे गजानन, मी पुंडलिक महाजन!” बरंच बोलणं झाल्यानंतर त्याला म्हणालो, “मला तुझ्या कामाच्या अर्थात कलाकृतींच्या इमेजेस पाठव.” कदाचित हा लेख वाचल्यावर त्याला कळेल की, मी त्याच्या कलाकृतींच्या इमेजेस का मागितल्या होत्या! आमचं बोलणं पूर्ण झालं. ‘टेककेअर’ म्हणून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.


१९८८-८९च्या दरम्यानचे दिवस आठवले. पी. एम. मला सिनिअर होता कॉलेजमध्ये. आमच्या ‘शाकम’त ‘रंगरेखा’ हॉल होता. तेथे पेंटिंग्जचे वर्ग सुरु असायचे. आम्ही सप्ताहाच्या प्रत्येक शनिवारी ‘आऊट डोअर’ला जायचो आणि एका सोमवारी ‘स्केचक्लब’ नावाने या ‘आऊट डोअर’च्या माध्यमातून जे जे काम विद्यार्थी करायचे, त्यापैकी निवडक काम हे या ‘स्केचक्लब’ प्रदर्शनात मांडले जायचे. मग, प्रा. नीलकंठ कुंभार, प्रा. धर्मराज भोईर यांची अभ्यासपूर्ण परंतु, निरीक्षणांवर आधारित भाषणे नव्हे, तर व्याख्याने व्हायची आणि पारितोषिकांच्या यादीत पी. एम. महाजनला प्रथम क्रमांकाने पारितोषिक असायचे. ‘पुंडलिक’ हा नावाप्रमाणेच विद्यार्थीदशेपासून आहे. हरिने पुंडलिकाला वर द्यावा, म्हणून सारा वारकरी संप्रदाय ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’ म्हणून जयघोष करतो. या आमच्या ‘शाकम’च्या पुंडलिकाला, निसर्गातील रंगदेवतेने कदाचित त्याच्या बालपणापासूनच वर दिलेला असावा, असे वाटते!


जगद्विख्यात निसर्गचित्रकार आणि पेंटर पॉलक्ली यांचं एक विधान आठवतं मला! ते म्हणायचे, “तुम्ही जेव्हा निसर्गचित्रण करता, तेव्हा ते अशाच वेळी निसर्गाचा भाग बनतं जेव्हा तुम्ही स्वत:चं निसर्ग बनता!” परमोच्च आशय असलेलं हे विधान मला पुंडलिक महाजन यांच्या निसर्गचित्रणाबद्दल लागू पडताना वाटतं. जगप्रसिद्ध निसर्गचित्रकार टर्नर यांची ‘लॅण्डस्केप्स’ म्हणजे निसर्गचित्रणे पाहिली की, अक्षरक्षः अंगावर रोमांच उठतात. प्रतिनिसर्ग कॅनव्हासवर निर्माण करण्याचं दिहीमान कौशल्य टर्नर यांच्या निसर्गचित्रणांवरुन दिसतं. मला आमचा पुंडलिक येथेही कुठे कमी पडताना दिसत नाही. ‘टिका आणि टीका’ यांची पार्श्वभूमी इतर क्षेत्रात असतेच! तशीच आमच्या कलाक्षेत्रातही असेल तर त्यात नवीन का? मग अचानक एखादा गट वा समूह असेही म्हणून उठले की, ‘इतक्या महान चित्रकारांच्या नावाबरोबर पुंडलिकच्या नावाची तुलना कशी काय होऊ शकते? ’ तर कृपया ध्यानी घ्यायलाच हवं की, ही तुलना नसून ‘आठवण’ आहे. संदर्भीय चित्रकारांनी त्यांच्या कलाकृती निर्माण करताना जी तादात्म्यता, जी एकात्मता किंवा जी समाधीअवस्था अनुभवली असेल, आमचा पुंडलिक महाजन, या अवस्थेला निश्चितपणे जात असणार म्हणूनच त्याची प्रत्येक कलाकृती ही कलारसिक मनाचा ठाव घेते आणि हे विशद करायला कुठल्याही ज्योतिष्यकाराची आवश्यकता नाही.


पुंडलिक महाजन यांच्या कलाकृतीतील एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची ‘कलर पॅलेट’ ही स्वयंभू आहे. इतर कुणा चित्रकारांच्या ‘पॅलेट’चा त्यांच्या ‘पॅलेट’वर प्रभाव दिसत नाही. लहान लहान रंगांचे पॅच कुठे कुठे विषयानुरुप रंगांचे ‘फ्लो’ आणि तपशीलांच्या मांडणीचा सुयोग्य मेळ घालत, पुंडलिक यांची कलाकृती निर्माण होते. वास्तववादी शैलीपासून तर कल्पनारम्य (क्रिएटिव्ह) शैली तंत्रांचा चपखल वापर करुन पुंडलिक यांच्या निसर्गचित्रणाचा कलाप्रवास इतका सार्वभौमपणे रंगीत बनलेला आहे की, त्यांच्या कलाकृती या जीवनातील सात स्तरांचे वर्णन केलेल्या, शेक्सपिअर यांच्या कवितेची आठवण करुन देतात. 
 
 
विविध प्रदर्शने, विविध पुरस्कार आणि अनेक नामवंत संग्राहकांनी निसर्गचित्रकार पुंडलिक महाजन यांच्या निसर्गचित्रणांना, त्यांच्या संग्रहात सन्मानाने स्थान दिलेले आहे. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते त्यांच्या मनोगताच्या भाषणात बोलले होते की, “ ‘एखादी’ कलाकृती आपल्याला का आवडते? ती कलाकृती आपल्या स्मरणात का राहते? तर आपण जसे त्या कलाकृतीला पाहत असतो, तद्वतचं ती कलाकृतीही आपल्याला पाहत असते, म्हणून ती आपल्याला आवडत असते.” पुंडलिक महाजन यांच्या कलाप्रवासात जन्मलेले वास्तववादी शैलींपासून तर आधुनिक शैलीतंत्रांतील प्रत्येक निसर्गचित्रण हे श्रीमंतच असते. स्मृतिप्रवणच असते. कारण कोलते सर म्हणाले त्याप्रमाणे त्यांची प्रत्येक कलाकृती जणू आपल्याला प्रतिनिसर्ग दाखवतच असते आणि म्हणून ती रसिक मनाचा ठाव घेते. निसर्गचित्रकार पुंडलिक महाजन उर्फ ‘पी. एम’ यांच्या कलाप्रवासाला सुदृढ शुभेच्छा...!
  

- प्रा. गजानन शेपाळ

 
 
@@AUTHORINFO_V1@@