चिनी स्वातंत्र्यदिनाचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020   
Total Views |


China_1  H x W:


चीनच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कॅनडामध्ये चिनी दूतावासाबाहेर हाँगकाँग, तिबेट, व्हिएतनाम, मंगोलियन, तैवान या देशांतील सदस्यांनी आंदोलन केले. चीनच्या अतिविस्तारवादी अणि दडपशाहीचा निषेध केला. यात हाँगकाँगमधल्या काही लोकांनी तर भारताचा तिरंगाही हातात घेतला होता. ‘चिनी ड्रॅगन’ म्हणून आशिया खंडात मुजोरी करणार्‍या चीनला यामुळे बराच शह बसला आहे.



दि. १ ऑक्टोबर हा दिवस चीन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. तसे पाहायला गेले तर १६ लाख वर्षांचे मानवी अस्तित्व असलेले आणि पाच हजार वर्षांपासूनचा लिखित इतिहास असलेला चीन हा देश आज जगभरात बदनामच झालेला आहे. पण, ‘बदनाम हुये तो क्या, नाम तो हुआ’ अशी बेदरकार वृत्तीने चीन आजूबाजूच्या छोट्या राष्ट्रांवर हल्ले करत आहे, भूभाग बळकावत आहे. काहीच जमले नाही तर कर्ज देऊन त्या राष्ट्रांना मिंधे करत आहे. हाँगकाँग म्हणा, तैवान म्हणा, तिबेट म्हणा, या तिघांनीही कधीच चीनचे सार्वभौमत्व मान्य केले नाही. उलट तिघांनीही चीनला कायमच विरोध केला. मात्र, तरीही चीन या तिन्ही भूभागांवर अतिक्रमण आणि अतिविस्तारवादी वृत्तीचे जोखड बांधू पाहतोय. दुसरीकडे नेपाळ आणि पाकिस्तानसारखी छोटी राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांना कायमच चीन कर्जरूपी मदत करतो. त्या कर्जाच्या बदल्यात चीन हा देश पाकिस्तान आणि नेपाळमध्ये आपले हातपाय पसरतोय. आता राहता राहिला भारत देश, तर भारताचा भूभाग जबरदस्तीने बळकावू शकत नाही किंवा कर्ज देऊन भारताला आर्थिक गुलाम बनवू शकत नाही म्हणून चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांना; अर्थात पाकिस्तान आणि नेपाळला हाताशी धरत आहे. पण, सार्‍या जगाने पाहिले की, नेहरूंच्या काळातला भारत आता बदलला आहे. त्यामुळे चीनला जशास तसे उत्तर मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीनच्या आशियायी महासत्तेच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे.


असो, तर १ ऑक्टोबर हा चीनचा स्वातंत्र्य दिन. चीनमध्ये साम्यवादी नेते आणि तत्कालीन प्रशासक कुओमिन्तांग यांच्यात गृहयुद्ध झाले. साम्यवादीही चिनी आणि कुओमिन्तांग ही चिनीच. चीनमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक अधिष्ठान असलेली समाजरचना. मात्र, या समाजव्यवस्थेमध्ये साम्यवादाचा शिरकाव झाला. जगभरात न्याय, मानवतावादाचे मुखवटे घालणारे साम्यवादी चीनमध्येही घुसले. त्यांनी कुओमिन्तांग याच्या विरोधात युद्धच पुकारले. साम्यवादी जिंकले. कुओमिन्तांग आपल्या लवाजम्यासह तैवानमध्ये गेले, तर आपल्याच देशातील आपल्याच माणसाला हरवून चीनने म्हणजे साम्यवादी नेत्यांनी चीनला स्वतंत्र घोषित केले. तो दिवस होता १ ऑक्टोबर, १९४९. त्या दिवसापासून चीन साम्यवादाच्या कराल पाशातच आहे. बौद्ध किंवा इतर धर्मीय आहेत. मात्र, असे असतानाही ते शरण जातात ते ताओवादाला आणि कन्फ्युशियानिज्मला. बौद्ध धर्माचा प्रसार होण्याआधी चिनी आकाशाला, आपल्या पूर्वजांना आणि स्वर्गाला देव मानायचे. हळूहळू तिथे दार्शनिक विचारांना सुरुवात झाली. ताओवाद आला. ताओवादाचे सार होते कोणत्याही इच्छा जबरदस्तीने पूर्ण करू नयेत, तर समजदारीने कुणाचेही नुकसान न होता त्या पूर्ण कराव्यात, तर कन्फ्युशियानिज्मचे सार होते, आपल्या नेत्यांचे अनुसरण करा, कर्तव्याचे पालन करा आणि देवावर श्रद्धा ठेवा. त्यानंतर करुणा आणि शांतीचा संदेश देणारा बौद्धधर्मही तिथे प्रमुख धर्म बनला. आपण म्हणतो, युद्ध नको बुद्ध हवा. पण, चीन बुद्धाला मानणारा मोठा देश असतानाही त्याच्या मनात सदैव युद्धाचेच विचार असतात. ताओवादने सांगितले की, जबरदस्तीने इच्छा पूर्ण करू नका, तर चीनने आजूबाजूच्या राष्ट्रांवर या न त्या कारणाने दडपशाहीच अवलंबली आहे.

चीनच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कॅनडामध्ये चिनी दूतावासाबाहेर हाँगकाँग, तिबेट, व्हिएतनाम, मंगोलियन, तैवान या देशांतील सदस्यांनी आंदोलन केले. चीनच्या अतिविस्तारवादी अणि दडपशाहीचा निषेध केला. यात हाँगकाँगमधल्या काही लोकांनी तर भारताचा तिरंगाही हातात घेतला होता. ‘चिनी ड्रॅगन’ म्हणून आशिया खंडात मुजोरी करणार्‍या चीनला यामुळे बराच शह बसला आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या कल्पना या साम्यवादीच आहेत. त्यामुळे चिनी प्रशासनाला प्रश्न विचारणार्‍यांना तुरुंगात टाकणे, गायब करणे वगैरे प्रकार चीनच्या हातचा मळ आहे. स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवस आधीच चीनने हाँगकाँगमधील ६९ आंदोलकांना तुरुंगात डांबले आहे. उघूर मुस्लिमांच्याबाबत चीनचे अमानवीय कृत्य तर जगाला माहिती आहे. थोडक्यात, अमानवतेचे घृणास्पद कृत्य करणार्‍या चीनच्या स्वातंत्र्याचा निषेधच!

@@AUTHORINFO_V1@@