आईच्या तेराव्यानंतर आंदोलन करणाऱ्या मुलासह पतीला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |
Shital Dama_1  


आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांनाही अटक


मुंबई : हाजीअलीजवळ मृतदेह आढळलेल्या शीतल दामा यांच्या मृत्यू प्रकरणात गूढ कायम आहे. असल्फा येथील लहान नाल्यात पडल्यानंतर मानवी मृतदेह वरळी-हाजीअलीपर्यंत वाहून येऊ शकत नाही, असे निरिक्षण पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आपल्या आईला न्याय मिळावा यासाठी एफआयआर दाखल करून घेण्याचा आग्रह त्यांचा ११ वर्षीय मुलगा व पती जितेश यांनी केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलीसांनी सोमय्या यांच्यासह शीतल यांच्या ११ वर्षाच्या मुलासह पतीला अटक केली.
 
 
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणाले, " शीतल दामा  प्रकरणाला १३ दिवस उलटून गेले आहेत. दामा यांना न्याय मिळावा यासाठी FIR रजिस्टर करण्याचा आग्रह करणाऱ्या शीतल दामा यांचा ११ वर्षांचा मुलगा जय, पती जितेश व मला आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. १०० निदर्शकांच्या उपस्थितीत पोलिस आणि महापालिकेला प्रश्न विचारत आहोत. शीतल दामाच्या मृत्यूला १३ दिवस झाले तरी FIR का नोंदविली गेली नाही?"
 
 
नेमके प्रकरण काय ?
 
असल्फा गावात राहणाऱ्या शीतल दामा (३२) या १३ दिवसांपूर्वी गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. पण एक तास होऊन गेला तरी त्या न परतल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. शीतल यांनी पिठासाठी नेलेली पिशवी कुटुंबाला आढळली. त्याजवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. मुंबईत तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. नाल्यावर असलेले झाकण उघडे असल्याने त्या तिथे पडल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
 
 
 
सर्वप्रथम समुद्र-खाडी किनाऱ्या लगतच्या माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, ताडदेव आदी पोलीस ठाण्यांनी शोधाशोध केली. ताडदेव पोलिसांना सोमवारी मध्यरात्री हाजीअली किनाऱ्याजवळ शीतल दामा यांचा मृतदेह आढळला. त्यानुसार ताडदेव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली. पालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्याप पोलीसांनी FIR नोंदवला नसल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे.
 
 
या परिसराचे सीसीटीव्ही तपासण्याचे कामही सुरू आहे. उपयुक्त माहिती शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शीतल यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, शीतल ज्या ठिकाणी पडल्या असाव्यात त्या जागेवरून मृतदेह हाजीअलीपर्यंत जाणे शक्य नसल्याची नोंद पालिका अधिकाऱ्यांनी केली आहे.
 
 
घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्याकडे हे प्रकरण आहे. आम्ही चौकशी करत आहोत, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. शीतल जिथे पडल्याचे म्हटले जात आहे तो नाला फक्त अडीच ते तीन फूट खोल आहे. मोठी पर्जन्य जलवाहिनीच नाही. त्यामुळे यातून मानवी मृतदेह वाहून जाण्याची शक्यता नाही.
 
 
तसेच तीन ते चार ठिकाणी असलेल्या अडथळ्यांमुळे जरीही मृतदेह वाहून गेला तरीही तो हाजीअली किनाऱ्यावर वाहून जाऊ शकेल हे ही अशक्य मानले जात आहे. घाटकोपर भागातील पर्जन्य जलवाहिन्या मीठी नदीला मिळतात, त्यामुळे मृतदेह माहिम किनाऱ्यावर मिळणे अपेक्षित होते, त्यामुळे हा घातपात असावा, अशी शक्यता कुटूंबियांनी व्यक्त केली आहे. १३ दिवस उलटूनही FIR का नोंदवली नाही, असा जाब आता कुटूंबियांनी विचारला आहे.





@@AUTHORINFO_V1@@