केंद्र मदत करेलच पण तुमची जबाबदारी काय ? : फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |
DF_1  H x W: 0

बारामती : केंद्र सरकार तर मदत करेलच मात्र, राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही, स्वतःची जबाबदारी झटकून कसे चालेल, असा जाब विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. पंचनामे झाले पाहिजेत, असा अट्टाहास न करता केवळ मोबाईलवर आधारित फोटोही पंचनाम्याचा पुरावा मानला जावा, ही पद्धत आम्ही आमच्या सरकारमध्ये लागू केली होती, त्याप्रमाणे तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
फडणवीस म्हणाले, "केंद्र सरकार मदत करतेच मात्र ती राज्याला मिळण्यासाठी वेळ लागतो. आमच्या सरकारच्यावेळी आलेल्या पूरस्थितीवेळी दहा हजार कोटींची मदत आम्ही जाहीर केली होती. प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून चालणार नाही. या सरकारने स्वतःची जबाबदारी ओळखून कामाला लागले पाहिजे. शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची वाट न पाहता थेट मदत करा. टोलवाटोलवीचे राजकारण करू नका, केंद्र मदत करेलच पण तुम्हीही सरकार म्हणून जबाबदारी उचला." शरद पवार माजी कृषीमंत्री आहे केंद्राच्या मदतीची पद्धत त्यांना माहिती आहे. मात्र, टोलवाटोलवी करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
 
 
या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत आहे, त्यामुळे रोज उठून सरकारला वाचवणे, त्यासाठी ८० वर्षांच्या पवारांना बांधावर जावे लागत आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शरद पवार बांधावर जात असल्याचे कौतूक अनेक जण करत असताना मुख्यमंत्री इतके दिवस घरात कसे होते, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. सरकारला वाचवण्यासाठी पवारांना या वयात दौरे करावे लागत असल्याचे ते म्हणाले.
 
 
राज्य सरकारने राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हे वाद घालायची ही वेळ आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. आधी शेतकऱ्यांना मदत करा, वादासाठी तुम्हाला पुरेसा वेळ शिल्लक आहे, शेतकऱ्यांकडे पहा, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी भाजप किंवा विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे लागले की सरकारचे पालक मंत्री आपापल्या जिल्ह्यात जातात, ही वस्तूस्थिती आहे, असेही फडणवीस म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@