रुग्णसेवा : ईश्वरी कार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |

mansa_1  H x W:

‘आरोग्यसेवा’ हे ईश्वरी कार्य असून, प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, या विचारांनी आरोग्यसेवा कार्य करणारे ‘कोविड योद्धा’ डॉ. शैलेश भानुशाली यांच्याविषयी..
.


कोरोनाची आपात स्थिती आली. कोरोनाच्या भीतीमुळे भलेभले घरी ‘लॉकडाऊन’ झाले. विक्रोळीतही तीच स्थिती होती. परिसरातील सर्वच व्यवस्था बंद होत्या, त्यात दवाखानेही आलेच. मात्र, ‘बीएचएमएस, एमडी अशा पदवी असलेल्या डॉ. शैलेश भानुशाली यांचे छोटे क्लिनिक मात्र सुरूच होते. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत या क्लिनिकमध्ये दहा हजारांच्या वर रुग्णांनी उपचार घेतले. त्यापैकी ८०टक्के रुग्ण कोरोनासदृश होते. तसेच, विक्रोळीतील सेवावस्तीतील अशी कितीतरी कुटुंबं आहेत की, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ झाली. त्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना साहजिकच भीती वाटू लागली. अशावेळी डॉ. शैलेश यांनी या संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्यांना धीर दिला. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला की, कोरोना न होण्यासाठी त्याचे नियम पाळा, जर कोरोना झालाच, तर मुळीच घाबरू नका, उपचार घ्या, पथ्य पाळा. डॉ. शैलेश यांनी हजारो लोकांना अशा प्रकारे समुपदेशन, उपचार करून कोरोना भयग्रस्त स्थितीतून बाहेर काढले आहे. डॉ. शैलेश यांचा दवाखानाही एका सेवावस्तीतच आहे. विक्रोळीतील जनता डॉ. शैलेश यांचे कोरोनाकाळातील सेवाकार्य कधीही विसरणार नाहीत. तरुण आणि तितकेच संवेदनशील असणार्‍या डॉ. शैलेश यांचे सेवाकार्य पाहून मनात आले की, विक्रोळीतील नव्हे, तर देशभरातील अनेक डॉक्टर कोरोनाकाळात घरी बसले, मग डॉ. शैलेश यांनी त्यांचा दवाखाना सुरू ठेवण्याचे प्रयोजन काय? डॉ. शैलेश यांच्या जीवनाचा मागोवा घेतला आणि वाटले की, डॉ. शैलेशसारखे लोकच निःस्वार्थीपणे सेवाकार्य करू शकतात.

विक्रोळीतील एका सेवावस्तीतच राहणार्‍या रावजी भानुशाली आणि मनीबेन यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक शैलेश. रावजी यांचे छोटेसे किराणा मालाचे दुकान. जेमतेम उदरनिर्वाह होई. परिस्थिती आर्थिक बेताची. त्यातच आजूबाजूचे वातावरणही तितकेसे अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीमध्ये रावजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत. ते पहाटे उठत, सगळे आटपून सूर्य उजाडत असतानाच किराणा मालाचे दुकान उघडत ते रात्री १२ वाजेपर्यंत कामच करत. दुकानात ते एकटेच. शैलेश शाळा सुटली की, रावजींसाठी जेवणाचा डबा घेऊन जात. दुकानात गेल्यावर शैलेश वडिलांचे कष्ट पाहत, पै-पै जोडण्यासाठी केलेली मेहनत पाहत. रावजी आणि मनीबेन यांनी मुलांचे कधीही फालतू लाड केले नाहीत. गरजेच्या सर्व वस्तू मुलांना वेळेवर मिळतील याचा मात्र कटाक्ष असे. मनीबेन ‘स्वाध्याय परिवारा’च्या सदस्य होत्या. तिथे शैलेशही जात. प.पू. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलेला एक विचार लहाणपणीच त्यांनी ऐकलेला आणि त्याचा अर्थही स्वीकारलेला. ते वचन होते, ‘सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो.’ अर्थात, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी राहिलो आहे. पुढच्या काळात जातपात, लिंगभेद विसरून सेवाकार्य करण्यासाठी हा विचार म्हणजे शैलेश यांच्यासाठी एक शिदोरीच होती.
शैलेश यांना लहाणपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते. कारण, त्यांचे मामा डॉक्टर होते. दुसरे असे की, एकदा त्यांचे आजोबा खूप आजारी पडले. क्षयरोगामुळे त्यांच्या छातीत पाणी झाले. रावजी यांनी उपचारांसाठी वडिलांना मुंबईत आणले. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरने सांगितले, उपचाराचे, शस्त्रक्रियेचे पैसे आधी भरा, मगच रुग्णाची शस्त्रक्रिया केली जाईल. सगळे घर हवालदिल झाले. रावजी पैशांची व्यवस्था करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वणवण फिरले. शेवटी उशिरा रात्री पैशाची व्यवस्था झाली. त्यावेळी शैलेश दहा वर्षांचे होते. पैशांसाठी आजोबांची शस्त्रक्रिया नाकारली गेली, बाबांना कष्ट झाले. बाबांनी पैशांची व्यवस्था करेपर्यंत आजी आणि आईच्या चेहर्‍यावरची व्याकुळता हे सारे शैलेश यांनी पाहिले. त्यांनी त्याचवेळी ठरवले की, आपण डॉक्टर व्हायचे आणि गरजू गरिबांसाठीच आरोग्यसेवा द्यायची. या एका ध्यासाने शैलेश यांचे जीवन पालटले. नकारात्मक परिस्थिती, आर्थिक हलाखीत केवळ आणि केवळ शिक्षण याकडेच त्यांनी लक्ष दिले. पुढे ते ‘बीएएमएच’ झाले.
‘एमडी’चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते विदर्भामधील एका दवाखान्यात काम करू लागले. त्यावेळी त्यांचे शिक्षक डॉ. कवीश्वर होते. डॉ. कवीश्वर यांनी शैलेश यांना गुरुमंत्रच दिला की, रुग्णाच्या उपचारासाठी पूर्ण प्रयत्न करायचे; पण ज्या क्षणी कळेल की, आपल्याकडून रुग्ण बरा होऊ शकत नाही, त्यावेळी रुग्णाला तसे स्पष्ट सांगायचे. दररोज त्या रुग्णाला बोलावून उपचाराचे नाटक करून पाप करू नये. ही शिकवण डॉ. शैलेश यांनी जीवनात उतरवली. कोरोनाकाळात हजारो रुग्णांचे उपचार करणार्‍या शैलेश यांचे म्हणणे की, “होमियोपथीचे जनक डॉ. सॅम्युअल यांचे म्हणणे होते की, “आरोग्यसेवा करताना भीती वाटत असणार्‍यांसाठी हे क्षेत्र नाही.” तसेच मलाही वाटते की, आरोग्यसेवा हे ईश्वरी कार्य आहे, त्यामुळे ईश्वरकार्यात भीती कसली? तसेच पैसे नाहीत म्हणून रुग्णाला आरोग्यसेवा नाकारणे पाप आहे. वैद्यकीय पेशा संवेदनशील माणूसपणाचा आहे. ते माणूसपण मी जपतो.” खरेच डॉ. शैलेश भानुशालींसारखे निर्भीड सेवाकर्मी हेच भारतमातेचे आणि समाजाचेही वैभव आहेत.
@@AUTHORINFO_V1@@