अखेर उंबरठा ओलांडला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2020
Total Views |

agralekh_1  H x


इतके दिवस कोरोनाच्या की, आणखी कसल्याशा भीतीने घरातच बसून राहिलेल्या उद्धव ठाकरेंना शेत-शिवारातही त्याचीच भीती वाटत असावी. मात्र, आता फडणवीस व दरेकरांच्या शेतकरी भेटीमुळे व भाजपच्या टीकेनंतर लाजेकाजेस्तव उद्धव ठाकरेंनी घराचा उंबरठा ओलांडला. पण, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्राकडे पैसे मागत आपली जबाबदारीही झटकली.


तीन पक्षांची विचित्र आघाडी करून सत्तेवर आलेले मुंबईचे की महाराष्ट्राचे, अनमोल रत्न उद्धव ठाकरे अखेर उंबरठा ओलांडून घराबाहेर पडले. मात्र, पंतप्रधानपदाच्या मुंडावळ्या बांधण्यासाठी आतुर असलेल्या सहकार्‍यांच्या कोंडाळ्यात राहणार्‍या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्याचे धार्ष्ट्य आजपर्यंत कधी दाखवले नाही. उलट कोरोनाचे संकट कोसळो किंवा ‘निसर्ग’ वादळाने जनतेची वाताहत होवो, अपवाद वगळता ‘मी घरातच बसणार,’ असा त्यांनी कारभार केला. कदाचित, इतके दिवस कोरोनाच्या की, आणखी कसल्याशा भीतीने घरातच बसून राहिलेल्या उद्धव ठाकरेंना शेत-शिवारातही त्याचीच भीती वाटत असावी. तसेच दुःखाचा डोंगर कोसळूनही आपण तातडीने न धावल्याने व अतिवृष्टी, पुराने त्रासलेल्या जनतेने आपलाच विरोध-निषेध केला तर काय, हा प्रश्नही त्यांना भेडसावला असावा. आताही ते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतल्यानंतर, भाजपच्या टीकेनंतर लाजेकाजेस्तव का होईना घराबाहेर पडले, तरी त्यांनी शेतकर्‍यांना मदत वगैरे जाहीर केलेली नाही, तर केवळ एखाद्या संकटमोचकासारखे जनतेला दर्शन देण्याचे सोपस्कार पार पाडले. ‘आपल्यासारखा राज्यकर्ता पुन्हा मराठी मातीला कधी लाभणार नाही आणि मीच तो काय तुमचा तारणहार,’ हा बोलघेवडा अभिनिवेश यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता. पण, केवळ दौरे काढून काय होणार? विद्यमान सत्ताधार्‍यांची शेतकर्‍यांना खरोखर मदत करण्याची मानसिकता किंवा तयारी तरी आहे का? कारण, महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परस्परविरोधी विधाने, ती वाचली की, सत्ताधार्‍यांची बनवेगिरी उघडी पडते.


घरातून बाहेर पडण्याच्या दोन दिवसआधी उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय यंत्रणेला शेतकर्‍यांना मदत करण्याचे आदेश दिले होते, तर त्याच्याच दुसर्‍या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करू शकणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. सरकारमधील सर्वोच्च नेतृत्वच अशी विरोधाभासी विधाने करत असेल, तर राज्यातील शेतकर्‍यांचे ते वाली आहेत, असे कसे म्हणता येईल? उलट एकाने शेतकर्‍यांना आशेला लावायचे, दुसर्‍याने त्यावर आर्थिक परिस्थितीचे नाव घेत निराश करायचे आणि तिसर्‍याने आशा-निराशेच्या काटेरी झुल्यावर शेतकर्‍यांना झुलवत ठेवायचे, असा काहीसा या सरकारचा कारभार असल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, शिवसेना त्या सरकारमध्ये सामील होती, त्यावेळीही राज्यातील शेतकर्‍यांवर नैसर्गिक संकट कोसळले होते. मात्र, तेव्हा सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका बजावणारी शिवसेना शेतकर्‍यांच्या कैवार्‍याच्या रूपात हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत मागत होती; अर्थात तेव्हा फडणवीस यांनी तत्काळ दहा हजार कोटींची मदत जाहीरही केली होती आणि ती मदतही शिवसेनापक्षप्रमुखांना कमी वाटत होती. आता मात्र, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत, तसेच भाजपचा विश्वासघात करून, बेइमानीने ते सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत. अशावेळी त्यांनी खरेतर भाजपला शेतकरीविरोधी ठरविण्यासाठी, भाजपला चिडविण्यासाठी, हिणविण्यासाठी शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार नव्हे, तर ५० हजारांची म्हणजेच दुप्पट मदत देऊन मुख्यमंत्रिपदाचे सार्थक करायला हवे. राज्यभरातील शेतकरीदेखील उद्धव ठाकरेंच्या मदतीने अचंबित व्हायला हवेत. पण, तसे काही होणार नाही. कारण, सोमवारी शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याच्या नावाखाली काढलेल्या दौर्‍यात उद्धव ठाकरेंनी तसे काही केले नाही. मात्र, ज्या ‘सिल्व्हर ओक’वरच्या साहेबांच्या घरी हेलपाटे मारून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळविले, त्यांनी केंद्राकडे बोट दाखवून ठणाणा केला. “केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पैसा द्यावा, म्हणजे मदत करता येईल,” असे शरद पवार म्हणाले.



पण, राज्यात सत्ता तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची म्हणजेच पवारांनी जमवलेल्या गोतावळ्याचीच आहे. हा गोतावळा शेतकर्‍यांना मदत करणार की नाही? की, उठसूट फक्त केंद्राकडे पाहायचे आणि स्वतः फक्त दौरे काढायचे? केंद्र सरकार मदत देईलच, तशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली आहे. पण, राज्यातील शेतकर्‍यांची, जनतेची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे, असते. त्यांनी आधी तातडीने मदत जाहीर करणे गरजेचे असते, नंतर केंद्राची मदतही मिळणारच आहे. पण, इथे उद्धव ठाकरेंना आपण घराबाहेर पडल्याचेच इतके कौतुक वाटत असावे की, त्या कौतुकात ते आपले कर्तव्यही विसरून गेले. पवारांचे तर विचारायलाच नको, ते तर निवडणुकीआधी बांधाबांधावर जाऊन शेतकर्‍यांना आश्वासने देत होते आणि सत्ता बळकाविल्यावर शेतकर्‍यांना विसरून कोरेगाव-भीमाच्या नव्याने तपासासाठी प्रयत्न करत होते. प्रचारावेळी मतांसाठी पावसात भिजून दाखवत होते आणि केंद्रात मंत्री असताना शेतकर्‍यांनी सारखी सारखी मदत मागण्याची सवय सोडून द्यावी, असे उपदेशाचे डोस देत होते. आताही त्यांची मानसिकता बदलली असेल असे नाही, ते तसेच आहेत. कारण, सत्ता नसतानाचे पवार आणि सत्तेत असतानाचे पवार, दोन्ही महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत.



दरम्यान, आपला कंट्रोल बारामतीच्या रिमोटकडे देणार्‍या उद्धव ठाकरेंनीही सोमवारच्या फेरफटक्यावेळी फडणवीसांवर टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यापेक्षा आपल्या राज्यासाठी दिल्लीला जावे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्यापूर्वी फडणवीस असो की दरेकर, दोन्ही नेते शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून सातत्याने त्यांनी भेट घेत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, याची उद्धव ठाकरेंना खबरबातही नाही! दुसर्‍या बाजूला, फडणवीस दिल्लीला जातील, तिकडून भरघोस निधी आणतील आणि तोपर्यंत मी बॉलीवूडला मुंबई बाहेर नेण्याचे प्रकरण पाहतो, मंत्र्यांना काय हवे, काय नको ते पाहतो, पीआर एजन्सीकडून माझी, आदित्यची आणि सरकारची प्रतिमा उजळविण्याचे पाहतो, मुस्लीम विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचे प्रकरण पाहतो, असाही उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर टीका करण्यामागचा विचार असावा. पण, आपण काय आणि कोणाबद्दल बोलतो, याची समज यावेळी मुख्यमंत्र्यांनी नसावी. कारण, भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, शिवसेनेसारखा मुंबई, ठाणे, कोकण किंवा मराठवाड्यापुरता मर्यादित नव्हे. राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाला सर्व राज्यांत जाण्याची गरज असते आणि त्यांना तिथे प्रतिसादही मिळत असतो आणि देवेंद्र फडणवीस कोणत्याही भीतीशिवाय तिथे जात आहेत. पण, हे शिवसेनेसारख्या पक्षाला किंवा उद्धव ठाकरेंना माहीत नसेल. कारण, विहिरीत राहणार्‍यांना जगही तितकेच आहे, असे वाटते. पण, आता मुख्यमंत्री घराबाहेर पडलेत, तर त्यांनी जगाची नाही किमान देशाची व भाजपचीही माहिती घ्यावी. तसेच फडणवीसांनी कुठे जायचे, कुठे नाही, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतः शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
@@AUTHORINFO_V1@@