अरण्यऋषींना अभिवादन! : नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |
Nitin Gadkari_1 &nbs
 
 

भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये असलेले वैविध्य जगात कुठेही नाही, हे तर त्यांनी लेखनातून आधीच सांगितले आहे. विदर्भात वने आहेत आणि ती आपली समृद्धी आहे. त्या समृद्धीला सोप्या भाषेतील साहित्यात आणून चितमपल्ली यांनी निसर्गाला आपल्या आणखी जवळ आणले. निसर्ग रक्षण करायचे तर निसर्गावर प्रेम करावे लागते आणि ते कसे करायचे याचा वस्तुपाठ मारुती चितमपल्लींनी आपल्याला दिला आहे.
 
 
 
आपल्या भारतीय साहित्यात अरण्याचा उल्लेख भरपूर प्रमाणात आहे. पुराण, वेद, महाभारत, रामायणादी ग्रंथांमध्ये किती तरी अरण्यांचे वर्णन आढळते. साहित्यातील अरण्यांचा उल्लेख आपल्या संस्कृतीचा मूळ स्त्रोत अरण्य असल्याचे दर्शवणारा आहे. ही अरण्ये म्हणजे फक्त जंगले नव्हती. ती आपल्या संस्कृतीची-ज्ञानदानाची जिवंत केंद्रे होती. अरण्यात शिक्षणाची विकसित केंद्रे होती आणि राजे-महाराजे मुलांना अरण्यातील आश्रमांत पाठवून शिक्षण देत असत, असे उल्लेख आपल्या जुन्या साहित्यात आढळतात. अरण्याशी तादात्म्य साधणे म्हणजे दातृत्व, कर्तृत्व, त्याग, संयम, साधना, तपश्चर्या, सुसंगती अशा मूल्यांचे धडे घेणे.
 
 
 
आपल्या पूर्वजांना या वास्तवाचे फार चांगले भान होते. त्यामुळेच आपल्यावरील संस्कारांच्या प्रक्रियेत वने-जंगले आणि वन्य प्राणी-पक्ष्यांसह निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आणि त्यांचे संवर्धन यांचा भाव आविष्कृत होत आल्याचे आपल्याला दिसते. मराठी साहित्यात नेमका हा भाव मारुती चितमपल्ली यांनी आणला आणि एरवी केवळ झाडा-फुलांच्या किंवा नदी काठांच्या वर्णनाभोवती फिरणारे आपले साहित्य निसर्गाच्या समग्र समावेशाने समृद्ध झाले. अरण्य हे एकुणात सजीव अस्तित्व असते. त्यात केवळ झाडे नसतात. केवळ प्राणी-पक्षीही नसतात.
 
 
त्यात तिथला नाद असतो, तिथली शांतता असते आणि तिथली सळसळही जिवंत असते. जंगल हे स्वतंत्र अस्तित्व असते. चितमपल्लींचे साहित्य वाचताना आपल्या मनात अवघे अरण्य त्याच्या साऱया छटांसह जिवंत होते. मराठी साहित्यात यापूर्वी इतर लेखकांनी निसर्गावर काही प्रमाणात लिहिले आहे. मात्र, प्रामुख्याने त्यातील बव्हंशी लेखनाचा संबंध निसर्गाच्या वर्णनाशी होता. माणसं नायक-नायिका होती. मारुती चितमपल्लींच्या साहित्यात निसर्ग हाच नायक आहे.
 
 
तोच त्यांचा भाव आहे, कथानक आणि आधारही. तब्बल ४५ वर्षे चितमपल्ली विदर्भात राहिले. इथल्या जंगलांची, तिथल्या माणसांची भाषा त्यांनी आत्मसात केली आणि ते आपल्या साहित्यातून सामान्यांपर्यंत पोचवले. चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास मिळाला. प्राणी-पक्षी आणि वृक्षराजीच्या निरीक्षणातील बारकावे त्यांनी डॉ. अलींच्या मार्गदर्शनाखाली समजून घेतले आणि मग स्वतःचे विश्व त्यांनी निसर्गाच्या साथीने साकारले. नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल सखोल अभ्यासले-पाहिले.
 
 
 
पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे झाल्यावर ते विदर्भात आले. नवेगाव बांध हे त्यांचे आवडते ठिकाण. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र, त्यांना नवेगाव बांधचे जंगल फारच आवडायचे. चितमपल्लींच्या सोबतीने ज्यांचे नाव सतत घेतले जाते, ते माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिकले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींनी ग्रहण केली. या दोघांच्या संगतीच्या दंतकथा झाल्या आहेत. नंतर साधारण तीनेक दशके चितमपल्ली त्याच भागात होते. तिथले जंगल, जल, जमीन आणि जीवन या साऱयांबद्दल त्यांना आस्था होती. निसर्गाबद्दल चितमपल्लींच्या साहित्यात आपपरभाव दिसत नाही.
 
 
 
चितमपल्लींच्या साहित्यात निसर्ग एक सजीव अभिव्यक्ती म्हणून प्रकटतो. तोच नायक असतो. तोच कथा लिहितो आणि क्लायमॅक्सही निसर्गच ठरवतो. चितमपल्ली साध्या पण रसाळ शैलीत लिहित राहिले आणि आपल्याला आनंद देत राहिले. निसर्ग हा त्यांनी फक्त ललित लेखनाचा भाग ठेवला नाही. ते तर त्यांनी केलेच, शिवाय त्यांनी निसर्ग त्याच्या विविधांगी पैलूंसह अभ्यासला आणि ग्रंथबद्ध देखील केला.
 
 
 
पक्षी जाय दिगंतरा, रातवा, रानवाटा, निळावंती, प्राणीकोश, पक्षीकोश, सुवर्ण गरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, जंगलाचं देणं, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊस, घरट्या पलिकडे, आनंददायी बगळे, नवेगाव बांधचे दिवस, चकवा चांदण: एक वनोपनिषद अशी प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. चकवा-चांदण ही त्यांची आत्मकथा. त्यातून व्यक्त होणारे चितमपल्ली विदर्भाच्या मातीशी किती घट्ट जोडले गेले होते हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटत राहते.
 
 
 
नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील जंगले-अभयारण्ये यांत त्यांची ४५ वर्षे गेली. ते वाचनवेडे आहेत. प्रौढत्वात ते संस्कृत शिकले. त्यानंतर संस्कृत साहित्याचे त्यांनी व्यासंगी अध्ययन केले. त्यातून त्यांचे निरीक्षण आणि लेखन अधिक समृद्ध झाले. चितमपल्ली भाषाप्रभू आहेत. मराठीसह अन्य भाषांचाही त्यांचा अभ्यास आहे. प्राणी-पक्ष्यांच्या भाषेचा अभ्यासही त्यांनी केला आहे. त्यामुळे निसर्गाला जे आपल्यासारख्या लोकांना काही सांगायचे असेल, ते त्याने चितमपल्ली नावाच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून सांगितले, असे मला वाटत असते.
 
 
 
चितमपल्ली यांनी निसर्ग साहित्यात एवढे मोठे योगदान दिले, की कथा-कादंबऱया आणि वैचारिक लेखनाच्या पलीकडे निसर्गवेडे आणि निसर्गाभ्यासासंबंधीचे लेखन हा वेगळा प्रांत म्हणून दखलपात्र झाला आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चितमपल्लींना मिळाले. सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
 
 
नोकरीच्या निमित्ताने मारुती चितमपल्ली एकेकाळी विदर्भात आले आणि इथलेच होऊन गेले. चितमपल्ली हे आडनाव दुसऱया कुठल्या भागातले असावे, याचा अंदाजही येणार नाही इतका वैदर्भी रसाळ स्वभाव आहे त्यांचा. त्यांनी विदर्भाला आपले मानले. विदर्भानेही त्यांना भरभरून प्रेम दिले. पत्नी आणि कन्येच्या निधनानंतर ते एकाकी झाले होते. नव्वदीच्या जवळ जाणारे वय आणि शारीर व्याधींनी त्यांचा नाईलाज केला.
 
 
 
पण, नागपूर सोडून सोलापूरकडे जाण्यापूर्वी त्यांनी अनेक प्रकारच्या जुन्या-नव्या कामांना पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे. सोलापुरात पोचल्यावर सुहृदांशी बोलताना पुनः लेखनारंभ करण्याचा मनसुबाही त्यांनी बोलून दाखवला याचा आनंद आहे. विदर्भाचा निरोप घेताना, विदर्भासारखे जंगल कुठेही नाही, ते आपण सर्वांनी जपले पाहिजे, असा सल्ला देण्यास ते विसरले नाहीत.
 
 
 
भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये असलेले वैविध्य जगात कुठेही नाही, हे तर त्यांनी लेखनातून आधीच सांगितले आहे. विदर्भात वने आहेत आणि ती आपली समृद्धी आहे. त्या समृद्धीला सोप्या भाषेतील साहित्यात आणून चितमपल्ली यांनी निसर्गाला आपल्या आणखी जवळ आणले. निसर्ग रक्षण करायचे तर निसर्गावर प्रेम करावे लागते आणि ते कसे करायचे याचा वस्तुपाठ चितमपल्लींनी आपल्याला दिला आहे.
 
 
 
विदर्भातून ते आपल्या स्वगावी म्हणजे सोलापूरला गेले आहेत. त्यांना निरोप देताना मनात दुःख आहे. पण, आपल्या माणसांच्या सोबतीत त्यांना उत्तरार्ध घालवायला मिळेल आणि शांतपणे आपले कामही करता येईल, याचे समाधानही आहे. त्यांचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि साहित्याचे-निसर्ग प्रेमाचे विश्व अधिक समृद्ध करण्यासाठी ईश्वराने त्यांना दीर्घायुरारोग्य द्यावे या प्रार्थनेसह मी अरण्यऋषिंना अभिवादन करतो. विदर्भाच्या वतीने त्यांना अनंत कोटी शुभेच्छा.




- नितीन गडकरी 
केंद्रीय मंत्री, भारत सरकार 
@@AUTHORINFO_V1@@