हार्वर्डचे मराठी नेतृत्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

shrikant datar_1 &nb

जगविख्यात ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या अधिष्ठातापदी मराठमोळे श्रीकांत दातार यांच्या निवडीने मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...


आज महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्स यांसारख्या विषयांवर संशोधन करत आहेत. तसेच जगभरातही भारतीय संशोधकांच्या कामगिरीची विशेषत्वाने दखल घेतली जाते. नुकतेच जगविख्यात ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या अधिष्ठातापदी भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची निवड झाली आहे. ते आता नितीन नोहरिया यांचे उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. संस्थेच्या ११२ वर्षांच्या इतिहासात लागोपाठ दुसर्‍यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी निवड झाली आहे. दातार यांची कारकिर्द १ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठीचा झेंडा जागतिक पातळीवर फडकला आहे. दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार. गेल्या २५वर्षांत त्यांनी ‘एचबीएस’ (हार्वर्ड बिझनेस स्कूल) संस्थेत विविधांगी काम केले असून, इतर हार्वर्ड स्कूल्सला सहकार्य केले आहे. ‘कोविड-१९’ साथीने उभ्या केलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यास ‘एचबीएस’ने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे. श्रीकांत दातार हे हार्वर्ड विद्यापीठाच्या ११२वर्षांच्या इतिहासातले ११ वे अधिष्ठाता आहेत.


अनेक वर्षांपासून ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये त्यांनी केलेल्या अभिनव कार्यावर त्यांची निवड म्हणजे मानाचा तुराच म्हणावी लागेल. आधुनिक काळ हा सहकार्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वाचा असणार आहे, असे सांगितले जाते आणि श्रीकांत दातार हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. दातार यांचा प्रवास थक्क करणारा आणि भविष्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. दातार शिक्षणतज्ज्ञ असून मूळचे मुंबईकर. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनोन शाळेतून झाले. १९७३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ’गणित आणि अर्थशास्त्र’ विषयाची पदवी परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. यानंतर ते सनदी लेखापाल (सीए) झाले. उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविकेसाठी ते अहमदाबादच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या संस्थेत दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी ‘सांख्यिकी आणि अर्थशास्त्र’ या विषयांचा अभ्यास केला. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून आधी सांख्यिकी, नंतर अर्थशास्त्र यात पदव्युत्तर पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापन विषयात ‘डॉक्टरेट’ प्राप्त केली. आधी ‘कार्नेजी मिलन’ आणि नंतर स्टॅनफर्डच्या ‘ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’ येथे स्वत:तील उत्कृष्ट शिक्षकी कौशल्याचे दर्शन घडवले. १९८४ ते १९८९ या काळात ते साहाय्यक प्राध्यापक होते. ‘कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रिएल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेत त्यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तेथे त्यांना ‘जॉर्ज लेलॅण्ड बाख शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. 1989 ते 1996 या काळात ते ‘स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझिनेस’मध्ये प्राध्यापक होते. तेथे ते ‘अकाऊंटिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ विषयात ‘लिटलफील्ड’ प्राध्यापक झाले. या काळात ते भविष्यकालीन व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक आघाडीचे चिंतक, अभ्यासक आणि सर्जनशील गुरू म्हणून पुढे आले. त्यातून त्यांचे ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’शी असलेले नाते दृढ झाले. दातार हे १९९६साली ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ‘वरिष्ठ सहयोगी अधिष्ठाता’ या नात्याने त्यांनी प्राध्यापकांची भरती, शिक्षक प्रशिक्षण, कार्यकारी शिक्षण आणि संशोधन इत्यादी क्षेत्रांत योगदान दिले आहे. काळाची पावले ओळखून नवे मिश्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे त्यांनी दाखवलेले धाडस अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले.



श्रीकांत दातार हे ‘नोवार्टिस एजी’ आणि ‘टी-मोबाईल युएस इंक’सोबतच कित्येक कंपन्यांच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. एमएस-एमबीए जैवतंत्रज्ञान, एमएस-एमबीए अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. डाटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अ‍ॅण्ड मशीन लर्निंग याविषयावर त्यांचे खूप मोठे योगदान आहे. विविध विषयांवर त्यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण असंख्य लेख जगभरातील नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, आफ्रिका, युरोप या भागांतील शिक्षणतज्ज्ञ व उद्योगधुरिणांपुढे त्यांनी संशोधन निबंध सादर केले आहेत. कोलकाता येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या संचालक मंडळावर ते आहेत. “१९०८साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली हार्वर्ड ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी आहे. आज असंख्य मराठी तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षणासाठी हार्वर्डसारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत, त्यावेळेस या जगातील सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख एक मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार,” अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.श्रीकांत दातार यांच्या निवडीनंतर भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं पुढं यावीत, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. श्रीकांत दातार यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
@@AUTHORINFO_V1@@