साठ हजार बुलबुलांचे उड्डाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2020
Total Views |

khulafat movement _1 


सन १९२०च्या उन्हाळ्यात खिलाफत चळवळ पुढे कोणते वळण घेणार, हे अनिश्चित होते. आपला देश ‘कुफ्र’ (श्रद्धाहीनता) मुळे अपवित्र झाला, अशी भावना झाल्यामुळे मे ते नोव्हेंबर १९२०या काळात जवळजवळ ६० हजार बुलबुल हिंदुस्थानातून उडून गेले. हजारोंच्या संख्येत स्थलांतर (हिजरत) झाले. त्याअर्थी त्याला सैद्धांतिक आधार अवश्य असणार!



कविता म्हणजे अंतःकरणातील भावभावनांचा उत्स्फूर्त, अत्युत्कट आविष्कार! एखाद्या लोकसमूहाच्या रोमारोमांत भिनलेली कविता त्या लोकांची मानसिकता दर्शविते, त्यांचा व्यवहार ठरविते. बंकिमचंद्राची ‘वंदे मातरम्’ कविता देशाला जमिनीचा तुकडा न मानता नित्य वंदनीय दैवी मातेचे रूप देते. लोकांसमोर दैवी मातेचे रूप प्रकटले की, मग श्रीअरविंदांच्या शब्दांत “...जोपर्यंत मंदिराची उभारणी होऊन मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही, तिला बळी दिला जात नाही तोपर्यंत विश्रांती, शांती आणि निद्रा शक्य नाही.” (ऋषी बंकिमचंद्र, श्रीअरविंद समग्र वाङ्मय, १६ एप्रिल, १९०७). एखाद्या जमातीची देशाविषयी निराळी भावना असू शकते. जमिनीच्या एक तुकड्याला आई म्हणणे तर दूर, त्याला देवत्व बहाल करून त्याची पूजा ईश्वरनिंदेचे महापातक ठरते. ‘सारे जहाँ से अच्छा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘तराना-ई-हिंदी’ या कवितेत कवी मुहम्मद इक्बाल यांनी ‘हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्ताँ हमारा’ (देश म्हणजे आमचा बगिचा, आम्ही त्याचे बुलबुल आहोत) अशा शब्दांत देशासंबंधी त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे. एखाद्या बगिचात बुलबुल का राहतात? अर्थातच, त्या बगिचातील वृक्षांना लगडलेल्या फळांचा उपभोग घेण्यासाठी! मग बगिचा उजाड झाल्यास एरवी कुंजन करणारे हे पक्षी काय करतात? बगिचाविषयी आत्मीयता बाळगून त्यांनी तिथेच तडफडत आपले प्राण सोडावेत, अशी अपेक्षा का करावी? आपला कार्यभाग बगिचात होत नाही हे पाहून ते उडून गेले तर काय आश्चर्य? सन १९२०च्या उन्हाळ्यात खिलाफत चळवळ पुढे कोणते वळण घेणार, हे अनिश्चित होते. आपला देश ‘कुफ्र’ (श्रद्धाहीनता) मुळे अपवित्र झाला, अशी भावना झाल्यामुळे मे ते नोव्हेंबर १९२०या काळात जवळजवळ ६०हजार बुलबुल हिंदुस्थानातून उडून गेले. हजारोंच्या संख्येत स्थलांतर (हिजरत) झाले. त्याअर्थी त्याला सैद्धांतिक आधार अवश्य असणार!


हिजरतसंबंधी इस्लामी आदेश


इस्लामेतर व्यवस्थेच्या वर्चस्वाखाली मुस्लिमांनी कोणत्या परिस्थितीत राहणे वैध आहे, हे थोर इस्लामी विद्वान मौलाना अबुल आला मौदुदींनी त्यांच्या ‘कुराणा’च्या भाषांतरात स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, “...अल्लाहच्या ‘दीन’वर इमान आणले असेल त्याच्यासाठी इस्लामेतर व्यवस्थेच्या वर्चस्वाखाली राहून जीवन व्यतीत करणे केवळ दोनच स्थितींत वैध ठरू शकते. एक अशी की त्या भूमिका तो इस्लामचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व इस्लामेतर व्यवस्थेला इस्लामी व्यवस्थेत रूपांतरित करण्यासाठी, ज्याप्रमाणे ईश्वराचे प्रेषित व त्यांचे प्रारंभीचे अनुयायी प्रयत्न करीत राहिले आहेत, त्याचप्रमाणे त्यानेही प्रयत्न करीत राहावे. दुसरी स्थिती म्हणजे, खरोखरच तेथून बाहेर निघण्याचा त्याला कोणताही मार्ग मिळत नसावा व अत्यंत अप्रियता व नाराजीने निरुपाय म्हणून तो तेथे राहत असावा.” (दिव्य कुराण, सटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदुदी यांच्या उर्दू भाषांतरावरून अब्दुलजब्बार कुरैशी, कुतुबुद्दीन हुसैन मनियार व मुबारक हुसैन मनियार यांनी केलेले मराठी भाषांतर, निदाए इस्लाम पब्लिकेशन्स, मुंबई, २००२, पृ. १६६).


मौलाना मौदुदी स्वतःच्या मनाचे सांगणारे नव्हते. ‘कुराणा’च्या संबंधित आयती पुढीलप्रमाणे, जे लोक स्वतःवर अत्याचार करीत राहिले होते, त्यांचे आत्मे जेव्हा दूतांनी कब्जात घेतले, तेव्हा त्यांना विचारले की, “तुम्ही या कसल्या दशेत गुरफटला होता?” त्यांनी उत्तर दिले की, “आम्ही पृथ्वीवर निर्बल व विवश होतो.” दूतांनी सांगितले की, “अल्लाहची पृथ्वी विशाल नव्हती काय की, तुम्ही देशांतर करून दुसरीकडे जावे? अशा लोकांचे ठिकाण नरक आहे (४.९७).” जे पुरुष, ज्या स्त्रिया व जी मुले खरोखरच विवश आहेत आणि देशांतराचा कोणताच मार्ग आणि साधन सापडत नाही, अशांना अल्लाह क्षमा करतो, हा कुराणाचा निर्वाळा आहे. देशांतर करणार्‍यांना त्याचे फळ देण्याचे वचन अल्लाह पुढीलप्रमाणे देतो, जो कोणी अल्लाहच्या मार्गात देशांतर करील तो पृथ्वीवर आश्रय घेण्यासाठी मुबलक जागा व उदरनिर्वाहासाठी मोठी सुबत्ता प्राप्त करील आणि जो आपल्या घरातून अल्लाह व त्याच्या पैगंबराकडे देशांतरासाठी निघाला, नंतर त्याला वाटेत मृत्यू आला, त्याचा मोबदला अल्लाहच्या जवळ अनिवार्य ठरला...(४.१००).


स्वतः प्रेषितांनी हिजरतला प्रोत्साहन दिले, इतकेच नव्हे तर स्वतः हिजरत केले. प्रेषितत्व मिळाल्यावर पाच वर्षांनी जेव्हा प्रेषितांनी त्यांच्या सोबत्यांच्या अडचणी पाहिल्या, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “अल्लाह तुम्हाला त्रासातून मुक्त करीत नाही, तोपर्यंत तुम्ही अ‍ॅबिसिनियाला गेलात (तर तुमच्यासाठी बरे होईल) कारण (तेथील) राजा अन्याय सहन करणार नाही आणि तो मित्रदेश आहे.” (द लाइफ ऑफ मुहम्मद, अ ट्रान्सलेशन ऑफ इसहाक्स सीरात रसूल अल्लाह विथ इंट्रोडक्शन अ‍ॅण्ड नोट्स बाय ए. गुइऑम, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९६५, पृ.१४६).” इथे उल्लेखलेल्या ‘अडचणी’ आणि ‘त्रास’ हे शब्द म्हणजे मक्केतील गैर-मुस्लीम कुरैश कबिल्याकडून नवजात मुस्लीम समुदायाचा होणारा कथित छळ! प्रेषितांचे (शेवटपर्यंत गैर-मुस्लीम राहिलेले) चुलते अबू तालिब यांचे निधन झाल्यावर प्रेषितांना मक्केत कुणी वाली उरला नाही. तेव्हा सप्टेंबर ६२२ मध्ये प्रेषितांनी स्वतः मक्केहून मदिनेला हिजरत केले.


हिजरत हे भेकडांचे पलायन नव्हे हे नमूद केले पाहिजे. इस्लामसाठी असुरक्षित स्थानातून सुरक्षित स्थानी स्थलांतर करून तिथे शक्तिसंचय करावयाचा व त्यानंतर युद्ध पुकारून काफरांकडून त्यांची भूमी हिसकावून घ्यावयाची, हे हिजरतमध्ये अभिप्रेत आहे. इस्लामच्या अंतिम विजयासाठी डावपेच म्हणून घेतलेली तात्पुरती माघार म्हणजे हिजरत! हिजरत आणि जिहाद वेगळे नव्हेत. जिहाद अधिक त्वेषाने लढता यावा म्हणूनच तर हिजरत करावयाचे असते. एका ध्रुवावर आपल्या देशाला दैवी माता मानणारा समुदाय होता. दुसर्‍या ध्रुवावर देशाला बगिचा समजणारा समुदाय होता. देशावर आपले वर्चस्व नसल्यास तो राहण्यास अयोग्य असल्याची या समुदायाची भावना होती. कोण बरोबर, कोण चूक या वादात शिरण्याचे कारण नाही. दोघांचे भावविश्वच भिन्न होते, हे निश्चित! हे साधेसरळ सत्य ज्याला पचनी पडत नाही, त्याला १९२०साली हिंदुस्थानातील मुस्लिमांनी केलेली हिजरत समजणारच नाही.

हिंदुस्थान म्हणजे दार-उल-हरब!

हिंदुस्थानातील अखिल-इस्लामवादाचा आधुनिक काळातील जनक शाह वलिउल्लाह याचा मुलगा शाह अब्दुल अजीज (१७४६-१८२४) याने १८०३च्या सुमारास ‘फतवा-ई-अजीजी’ नावाचा फतवा जारी केला. ‘इमाम-उल-मुस्लिमीन’ (मुस्लिमांचा सर्वोच्च नेता) च्या आदेशानुसार नव्हे, तर ख्रिस्ती राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार देशाचा कारभार होत असल्याचे फतव्यात म्हटले होते. अब्दुल अजीजचा शिष्य आणि जावई अब्दुल हाई (मृत्यू १८२८) हा अधिक रोखठोक होता. ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थानात ‘आपल्या पवित्र कायद्याची बूज राखली जात नसल्यामुळे ते ‘दार-उल-हरब’ असल्याचे त्याने स्पष्ट केले. मौज म्हणजे अब्दुल हाई ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या सेवेत होता. (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९-१९२४, मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३, पृ.११८; शिवाय पाहा शाह अब्दुल अजीज : हिज लाईफ अ‍ॅण्ड टाईम, मुशीरुल हक, इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक कल्चर, १९९५, पृ.२४-२६). देशाला दैवी माता मानणार्‍यांना ‘दार-उल-हरब’ म्हणजे काय भानगड असते, हे समजले पाहिजे. त्यासाठी ‘इबादत’ आणि ‘धिम्मी’ हे शब्द आधी समजून घ्यावे लागतील. ‘इबादत’ या शब्दाचा अर्थ ‘उपासना’ असा सांगितला जात असला तरी हा शब्द ‘इबादह’ या अरबी शब्दापासून आला आहे, ज्याचे ‘उबुदियाह’ (गुलामी) या अरबी शब्दाशी नाते आहे. थोडक्यात, ‘इबादत’ म्हणजे ‘अल्लाहची बंदगी अथवा गुलामी!’ त्याला उपासनेचा मुलामा देणे अयोग्य आहे.


मुस्लीम राज्याला खंडणी देऊन दुय्यम नागरिक म्हणून जीव मुठीत धरून अत्यंत अपमानास्पद जीवन जगणार्‍या मुस्लिमेतर व्यक्तीला ‘धिम्मी’ म्हणतात. इबादत, श्रद्धावंतांची सुरक्षा आणि धिम्मींच्या बाबतीत शरियत कायदा जिथे लागू नाही, त्या प्रदेशाला ‘दार-उल-हरब’ (शब्दश: अर्थ- तलवारीचा किंवा युद्धाचा प्रदेश) म्हटले जाते. शरियत कायदा लागू असलेल्या प्रदेशाला ‘दार-उल-इस्लाम’ म्हटले जाते. एकेकाळी ‘दार-उल-इस्लाम’ असलेला प्रदेश ‘दार-उल-हरब’ झाल्यास मुस्लिमांनी काय करावयाचे असते? त्या प्रदेशातून माघार घेऊन त्यांनी ‘दार-उल-इस्लाम’ असलेल्या एखाद्या प्रदेशात जावयाचे असते. मग एकेकाळी ‘दार-उल-इस्लाम’ असलेल्या त्या वर्तमान ‘दार-उल-हरब’वर त्यांनी पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करावयाची असते. सन ६२२मध्ये मक्केहून हिजरत केल्यावर प्रेषितांनी केवळ आठ वर्षांनी मक्केत विजेता म्हणून पुन्हा प्रवेश केला. सन १९२०मध्ये हिंदुस्थानातील मुस्लिमांनी अफगाणिस्तानात हिजरत करावे, असे सांगणार्‍यांच्या डोळ्यांसमोर प्रेषितांचे हेच उज्ज्वल उदाहरण होते. (कुरेशी, उपरोक्त, पृ.११९) ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळे खिलाफत संकटात आल्यामुळे खिलाफतवाद्यांच्या मते हिंदुस्थान ‘अपवित्र’ झाले होते. अशा प्रकारचे प्रतिपादन करण्यात अली बंधू सर्वात पुढे होते. २४ एप्रिल, १९१९ला व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्डला धाडलेल्या पत्रात ते लिहितात, “इस्लामसाठी प्रदेश पुन्हा सुरक्षित झाल्यावर परतण्याच्या उद्देशाने त्याने (एखाद्या मुस्लिमाने) कुठल्यातरी अन्य अधिक स्वतंत्र प्रदेशात स्थलांतर केले पाहिजे... आमची अशक्त परिस्थिती पाहता, स्थलांतर हाच पर्याय आमच्यासमोर आहे.” (कुरेशी, उपरोक्त, पृ. ११९,१२०)


अफगाणांची चिथावणी


मुस्लीम जगतातील तुर्कस्तान, अरबस्तान आणि पर्शिया हे देश ख्रिस्ती युरोपीय सत्तेखाली होते. अफगाणिस्तान हेच एकमेव ‘दार-उल-इस्लाम’ उरले होते. ऑटोमन साम्राज्याच्या विघटनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची स्वप्ने अफगाणिस्तान बघत होते. ९ फेब्रुवारी,१९२०ला दिलेल्या भाषणात अफगाणिस्तानच्या अमिराने खिलाफतसाठी आपण प्राण देण्यास तयार असून हिंदुस्थानातून अफगाणिस्तानात येणार्‍या मुहाजिरांचे (मुहाजिर- हिजरत करणारा) स्वागत करण्याचे वचन दिले. हिंदुस्थानभर गाजविण्यात आलेल्या या भाषणाने चांगलीच खळबळ उडाली. (द हिजरत ऑफ १९२०अ‍ॅण्ड अफगाणिस्तान, अब्दुल अली, प्रोसिडिंग्स ऑफ दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस, खंड ४३. १९८२, पृ. ७२६,७२७) मुहाजिरांच्या सुखसोयीसाठी अमीर अमानुल्लाहने पुढील निजामनामा (अध्यादेश) जारी केला (सोर्स मटेरियल फॉर ए हिस्ट्री ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया : खिलाफत मूव्हमेंट, खंड १०, महाराष्ट्र सरकार, १९८२, पृ.३९८, ३९९) :-


१) अफगाणिस्तानात स्थलांतर करण्याचा विचार करणार्‍या कुठल्याही व्यक्तीला पेशावर किंवा ढाक्याला पारपत्र मिळेल. अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार्‍या व्यक्तीला अफगाण प्रजेचा घटक म्हणून वागविण्यात येईल व तसे पूर्ण अधिकार मिळतील. त्यानुसार ती व्यक्ती मुस्लीम कायदा नि राज्याच्या अंतर्गत कायद्यांशी बांधील राहील.


२) अफगाणिस्तानात प्रवेश करणार्‍या आणि अफगाण सरकारला आपली निष्ठा शपथपूर्वक वाहणार्‍या कुठल्याही व्यक्तीला पुढीलप्रमाणे शेतजमीन देण्यात येईल - अविवाहित पुरुष सहा जरीब (१जरीब= ०.४९ एकर किंवा दोन हजार चौरस मीटर). विवाहित पुरुष आठ जरीब. कुमारिका किंवा अज्ञान व्यक्तीला कोणतीही शेतजमीन मिळणार नाही.


३) मुहाजिरांना देण्यात आलेल्या शेतजमिनीवर आलेली पिके, कापण्याच्या स्थितीत येण्यापूर्वी या व्यक्तींना खालील शिधा मिळेल : प्रौढ व्यक्ती पाच शेर (काबुली मानकानुसार एक शेर = ७.०६६ कि.ग्रॅ. किंवा १५.५८पौंड) कणीक प्रतिमाह; बालक (वय वर्षे सहापासून पौगंडावस्थेपर्यंत) तीन शेर कणीक प्रतिमाह.


४) नांगर इत्यादी विकत घेता यावे म्हणून भूमीधारक व्यक्तींना पहिल्या वर्षी सहा शेर कणीक आणि रु. पाच प्रति जरीब आगाऊ देण्यात येईल. आगाऊ दिलेली नगद राशी तीन वर्षांनंतर तीन वार्षिक हप्त्यांत परत करावी लागेल.


५) हिंदुस्थानी मुजाहिरांना जमिनीवरील महसूल भरण्यातून तीन वर्षांसाठी सूट असेल. हा महसूल सरकारी नियमांनुसार चौथ्या वर्षी घेण्यात येईल.

६) अफगाण सरकारला विचारल्याशिवाय कोणतेही राजकीय काम करता येणार नाही.

७) शिक्षित असलेल्या लोकांची किंवा कला आणि विज्ञान अवगत असलेल्यांची सेवा घेण्याची सरकारला गरज वाटल्यास आणि त्यांची इच्छा असल्यास, त्यांना सेवेत घेतले जाईल आणि त्यांच्या अहर्तेनुसार वेतन दिले जाईल. इतर पुरुषांना सेवा करण्याची किंवा कोणताही व्यापार अथवा व्यवसाय करण्याची मुभा असेल.


८) अफगाणिस्तानच्या भूमीत सर्वप्रथम प्रवेश केल्यावर हिंदुस्थानी मुजाहिर ‘जबल-उस-सिराज’ला एक ते दोन महिने राहतील. विनामूल्य निवासस्थाने उपलब्ध नसल्यास त्या अवधीत सरकार तुकडे पाडून त्यांना देता येतील आणि निवासस्थाने बांधता येतील अशा जागांची निवड करेल. दि. २५ एप्रिल, १९२०ला दिल्लीत भरलेल्या ‘खिलाफत वर्कर्स कॉन्फरन्स’ मध्ये या अफगाण प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले. हिजरत करावे की नाही, यासंबंधी उलेमात मतभेद होते. द्विधा मनःस्थितीत असलेल्या उलेमाचे मन हिजरतच्या बाजूने कोणी वळविले? ‘राष्ट्रवादी मुस्लीम’ म्हणून ज्यांचा उदोउदो होतो, त्या मौलाना आजाद नावाच्या नरपुंगवाने हे महत्कार्य पार पाडले!


हिजरतचे पुरस्कर्ते मौलाना आजाद


मौलाना आजादांनी खिलाफत चळवळीला दिलेले योगदान प्रामुख्याने वैचारिक होते. दि. २८, २९ फेब्रुवारी, १९२० ला कलकत्त्याला भरलेल्या खिलाफत कॉन्फरन्समध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी इस्लामच्या सैद्धांतिक आधारावर खिलाफत चळवळीची मीमांसा केली. ‘मसला-ई-खिलाफत व जजीरात अल-अरब’ (खिलाफतचा विषय आणि इस्लामची पवित्र स्थळे) नावाचा त्यांचा प्रबंध खिलाफतसंबंधी हिंदुस्थानातील मुस्लिमांचा दृष्टिकोन मांडणारा महत्त्वाचा इस्लामी अभिलेख आहे. मुस्लिमांना जाण्यासारखे ठिकाण नसल्यामुळे हिजरत करणे शक्य नसल्याची भूमिका मौलाना आजादांनी २५ मार्च, १९२०ला मांडली. आपल्या भूमिकेत घुमजाव करत त्यांनी ‘हिजरत का फतवा’ लिहिला. ३० जुलै, १९२० ला अमृतसरहून निघणार्‍या ‘अहल-ई-हदीथ’ या उर्दू दैनिकात तो प्रसिद्ध झाला. ‘सन्मार्गाचा शोध’ घेणार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा; अन्यथा हिजरतवादी उलेमाकडून सूचना घ्याव्यात, असा उपदेश आजादांनी केला. आपल्या फतव्यात आजाद लिहितात, शरियतच्या सर्व तरतुदी, समकालीन घटना, मुस्लिमांचे हित आणि (राजकीय विषयांचे) बरे-वाईट लक्षात घेता, हिंदुस्थानातून स्थलांतर करण्याशिवाय हिंदुस्थानातील मुस्लिमांना पर्याय नाही... याविषयी मी ठाम आहे... ज्यांना त्वरित स्थलांतर करणे शक्य नाही, त्यांनी मुहाजिरांना मदत करावी. हिंदुस्थानात मागे राहणार्‍यांसाठी ‘इस्लामचा शत्रू म्हणून ओळखणार्‍या समुदायाशी कोणतेही सहकार्य किंवा संबंध वर्ज्य असून असे न करणार्‍यास पवित्र कुराणानुसार इस्लामचा शत्रू मानले जाईल, असे आजादांनी लिहिले. आपले मत राजकीय मुद्द्यांवर आधारलेले नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. आपले घरदार सोडून अफगाणिस्तानला निघून जा, असे इस्लामचा हवाला देऊन सांगणार्‍या आजादांनी स्वतः हिंदुस्थानातून आपला गाशा का गुंडाळला नाही, हे कोडेच आहे. दुसर्‍याने देशोधडीला लागावे, आपण नुसती पोपटपंची करावी, अशी श्रमविभागणी आजादांना अभिप्रेत असावी! हिजरत कसे करावे, या तांत्रिक मुद्द्याबाबत आजाद थोडे साशंक होते. ते अव्यवस्थित प्रकारे नव्हे तर संघटितपणे व्हावे, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्ष हिजरत करण्यापूर्वी हिजरतची शपथ घेणे अत्यावश्यक असल्याचीही त्यांची दुसरी पूर्वअट होती. हिजरतच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या मर्यादा आणि धोके दिसत असूनही ते आपल्या भूमिकेला चिकटून राहिले (हिजरत: द फ्लाईट ऑफ द फेथफुल, ए ब्रिटिश फाईल ऑन दि एक्सोडस ऑफ मुस्लीम पेझन्ट्स फ्रॉम नॉर्थ इंडिया टू अफगाणिस्तान इन १९२०, डीट्रिख रीट्झ, वर्ल. दास अ‍ॅरेबिश बुक, बर्लिन, १९९५, पृ.३५,३६)

हिजरतची तयारी


हिजरत अभियानाला मुख्य संघटनात्मक आधार दिला तो खिलाफत कमिटीने. देशभरात शाखा असलेले केंद्रीय खिलाफत कार्यालय सुरू करून व्यापक प्रचार अभियान चालविण्यात आले. देशभरात आणि विशेषतः वायव्य प्रांतात स्थानिक समित्या उगवल्या. हिजरतच्या तयारीची बरीचशी धुरा पेशावर समितीने सांभाळली. ‘अंजुमन-ई मुहाजिरीन-इस्लाम सुबा सरहदी’ (सीमांत प्रांताच्या इस्लामी स्थलांतरितांची संस्था) तिने नाव घेतले. (डीट्रिख रीट्झ, उपरोक्त, पृ.४४,४५) हिजरतला प्रोत्साहन देण्यासाठी मशिदींचा वापर करण्यात आला. हिजरत न करणारे मुस्लीम काफीर होतील, असा प्रचार मशिदींतून मौलवी करू लागले. बोरूबहादुरांनी हिजरतचे गोडवे गद्यात नि पद्यात गाण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानातील रम्य जीवनाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांनी छापल्या. मुहाजिरांचे तिथे कसे जंगी स्वागत करण्यात येते याच्या रसभरित कहाण्या सांगण्यात आल्या. (कुरेशी, उपरोक्त, पृ.१२५, १२६)


इस्लामी स्वर्गोत्सुकांचे लोंढे


अभियानाला शुभशकुन नको का? सन १९२० हे इस्लामी कालगणनेप्रमाणे हिजरी सन १३३८ होते. त्याचे औचित्य साधून १३३८ मुहाजिरांचा पहिला तांडा अफगाणिस्तानला जाण्यास तयार असल्याचे दि. ७ मे, १९२०च्या उर्दू भाषिक ‘जमीनदार’ वृत्तपत्राने घोषित केले. काही उत्साही मंडळींनी आधीच गुपचूपपणे सीमा ओलांडण्यास सुरुवात केली असली तरी सुनियोजित स्थलांतर म्हणून हिजरतची सुरुवात १५ मे, १९२०ला झाली. त्याच दिवशी तुर्कस्तानसह झालेल्या शांततेच्या अटी हिंदुस्थानात प्रकाशित झाल्यामुळे उत्साही मुहाजिरांचा पहिला तांडा मोठ्या

हर्षोल्लासाने काबुलच्या दिशेने निघाला.


सुरुवातीला हिजरतची गती मंद होती. एक तर सीकेसी आणि ‘जमियत-उल-उलेमा’ प्रस्तावित असहकाराच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये व्यग्र होते. शिवाय, अजमल खान, किचल्यू, जिना, इक्बाल आणि अन्य नेत्यांचा हिजरतला ठाम विरोध होता. ही उठाठेव मुस्लिमांच्या हिताची नसल्याचे त्यांचे प्रामाणिक मत होते. (कुरेशी, उपरोक्त, पृ.१२६) दि. १५ मे, १९२० ला संपलेल्या आठवड्यात खैबर खिंड ओलांडून ५३ मुहाजिरांचा पहिला तांडा सीमेवर पोहोचला. जुलै १९२०मध्ये हिजरत अभियानाने परमोच्च बिंदू गाठला. वायव्य प्रांत (सुमारे ८५ टक्के), पंजाब (दहा टक्के) आणि सिंध (पाच टक्के) या प्रांतांतून प्रामुख्याने मुहाजीर आले. अफगाणिस्तानात आलेल्या मुहाजिरांची संख्या ५० हजारांच्या वर असल्याचा एक अंदाज आहे. (डीट्रिख रीट्झ, उपरोक्त, पृ. ५२). सुमारे ४० हजार मुहाजीर आल्याचा अफगाणांचा अंदाज होता. अमिराने हिजरत थांबविल्यानंतरही सात हजारांहून अधिक मुहाजिरांनी अफगाणिस्तानची वाट धरली. छोटे-छोटे तांडे अगदी सप्टेंबर १९२०पर्यंत अफगाणिस्तानातील खोस्त येथे थडकत होते. खैबर खिंड सोडून अन्य मार्गांनीदेखील मोठ्या संख्येत हिजरत झाले. त्यामुळे एकूण मुहाजिरांची संख्या ५० हजार ते ६० हजारपर्यंत होती, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. (कुरेशी, उपरोक्त, पृ. १४८). दोन कारणांमुळे ब्रिटिशांच्या चिंतेत भर पडत होती. हिजरत करू पाहणारे आपली स्थावर मालमत्ता विकू लागले. गावेच्या गावे ओस पडू लागल्यावर जमिनीच्या किमती घसरल्या. दुसरे कारण अधिक गंभीर होते. पोलीस आणि सैन्य दलावर हिजरतचा परिणाम दिसू लागला. ऑगस्ट १९२०च्या सुरुवातीपर्यंत हिजरत करणार्‍या मुस्लीम सैनिकांची संख्या एका संपूर्ण कंपनीइतकी होती. (डीट्रिख रीट्झ, उपरोक्त, पृ. ५३, ५४; शिवाय पाहा कुरेशी, उपरोक्त, पृ. १३२)


अखिल-इस्लामवादाचे हसे


मुहाजिरांना ऐन उन्हाळ्यात ओसाड आणि डोंगराळ प्रदेशातून भटकावे लागले, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष होते. हिंदुस्थानची सीमा संपल्यावर पुढचा प्रवास अंगावर काटा आणणारा होता. अमिराने कितीही लंब्या गप्पा मारलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. अमिराचे अधिकारी मुहाजिरांचे लाथाबुक्क्यांनी स्वागत करत. नवीन अफगाण जनता त्यांच्याशी कठोरपणे, अगदी पाशवीपणे वागायची. त्यांच्या बायाबापड्यांचा विनयभंग करायची. कटू अनुभवांनी सैरभैर झालेले मुहाजीर हिजरत करायला भरीस पाडणार्‍या मुल्लांना घरी परतल्यावर गोळ्या घालण्याच्या शपथा घेऊ लागले. सीमा प्रांतातून काबुलला जाणारा मार्ग मुहाजिरांच्या कबरींनी फुलला. खैबर खिंडीत सर्वत्र मृतदेह पडल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. (डीट्रिख रीट्झ, उपरोक्त, पृ.६९) काबुलकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर ऑगस्ट १९२०पर्यंत कोंडी झाली. थंडीही वाढू लागली. थंडीच्या मोसमात अफगाणिस्तानला ४० हजार मुहाजिरांची व्यवस्था करणे अशक्य होते. दि. १२ऑगस्ट, १९२०ला अमिराने हिजरत पुढे ढकलल्याची घोषणा केली. मुहाजिरांना अफगाण लोक बंदुका आणि संगिनींचा धाक दाखवून परत पाठवत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. (कुरेशी, उपरोक्त, पृ. १४१).



मुहाजिरांचा आता पुरता अपेक्षाभंग झाला. त्यांना हिंदुस्थानला परत यावयाचे होते. पण, त्यापूर्वी खोस्त भागातील अफगाणांच्या गटाने प्रति-हिजरत करून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. वाढत्या संख्येत येणार्‍या मुहाजिरांच्या लोंढ्यांमुळे हे अफगाण वैतागले होते. मुहाजिरांना देण्यासाठी या अफगाणांना आपल्या जमिनी मुकाव्या लागल्या होत्या. खोस्त भागात मुहाजीर आणि स्थानिक लोकांमध्ये तणाव वाढला. (डीट्रिख रीट्झ, उपरोक्त, पृ.७०) सुमारे ७५टक्के मुहाजीर हिंदुस्थानात परतले. (कुरेशी, पृ.१४६) हिजरत अभियान मुळात अखिल-इस्लामवादाच्या ठिसूळ पायावर उभे होते. त्यामुळे त्याचे हसे झाले यात काही आश्चर्य नाही. हिजरतचे चटके अफगाणांना बसू लागल्यावर ते अखिल-इस्लामवादाकडे पाठ फिरवून मुस्लीम आया-बहिणींवर अत्याचार करू लागले. बगिचा उजाड झाला म्हणून उडून गेलेल्या बुलबुलांची अखिल-इस्लामवादी मिजास पूर्ण उतरली. ‘अपवित्र’ असला तरी ‘गड्या आपुला गाव बरा’ हा धडा शिकून भ्रमनिरास झालेले बहुतेक जण आपल्या घरी परतले!


(क्रमश:)
- डॉ. श्रीरंग गोडबोले
@@AUTHORINFO_V1@@