आंबोलीतील मंदिरासमोरील छोट्या कुंडात सापडली माशाची नवी प्रजात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020   
Total Views |
fish _1  H x W:


गोड्या पाण्यातील माशाचे 'शिस्टुरा हिरण्यकेशी' नामकरण 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील एका मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून गोड्या पाण्यातील माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. येथील हिरण्यकेशी नदी मुखाच्या प्रवाहामधून 'शिस्टुरा' कुळातील या प्रजातीचा उलगडा करण्यात आल्याने तिचे नामकरण 'शिस्टुरा हिरण्यकेशी', असे करण्यात आले आहे. या संशोधनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंचा समावेश असून गोड्या पाण्याच्या अधिवासातील प्रदेशनिष्ठ जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे, मत त्यांनी मांडले आहे. 
 
 
समुद्री परिसंस्थबरोबरच गोड्या पाण्याची परिसंस्था जैवसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावते. या गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध सह्याद्रीच्या खोऱ्यामधून लावण्यात आला आहे. 'शिस्टुरा' कुळातील या नव्या प्रजातीच्या शोधाचे वृत्त गुरुवारी 'एक्वा, इंटरनॅशनल जर्नल ऑफ इक्थिओलॉजी' या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. या नव्या प्रजातीचा उलगडा डाॅ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला आहे. २०१२ साली सर्वप्रथम ठाकरे यांना आंबोलीमधील हिरण्यकेशी नदीच्या मुखाजवळील कुंडामध्ये ही प्रजात दिसली होती. २०१७ साली ठाकरे आणि बालसुब्रमण्यम यांनी या प्रजातीचे नमुने गोळा केले आणि यातील सहा नमुने माझ्याकडे अभ्यासाकरिता पाठवल्याची माहिती संशोधक डाॅ. प्रविणराज जयसिन्हा यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 
fish _1  H x W: 
 
 
जयसिन्हा यांनी आकारशास्त्र आणि गुणसूत्रांच्या तपासणीअंती ही प्रजात विज्ञानाकरिता नवीन असल्याचे सिद्ध केले. हिरण्यकेशी नदीच्या मुखाजवळ ती सापडल्याने आणि 'शिस्टुरा' कुळातील असल्याने तिचे नामकरण 'शिस्टुरा हिरण्यकेशी', असे करण्यात आले. या माशाचा आकार ३३ ते ३७.८ एमएम असून तो झूप्लॅक्टन, शैवाळ आणि छोटे कीटक खातो. 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या माशाचा अधिवास केवळ हिरण्यकेशी नदीच्या मुखाशी असणाऱ्या प्रवाहामध्ये आढळून आला आहे. हे अधिवास क्षेत्र मर्यादित स्वरुपाचे असल्याने माशासोबतच या जागेचे संवर्धन आवश्यक असल्याचे जयसिन्हा यांनी अधोरेखित केले आहे. ही नवी प्रजात भारतातल्या सर्वात सुंदर माशांच्या प्रजातीपैंकी एक असल्याने तिला मत्स्यालयांसाठी होणाऱ्या अवैध व्यापाराचा धोका आहे.
 
 
गोड्या पाण्याच्या अधिवासाचे संवर्धन आवश्यक 
सागरी परिसंस्थेच्या खालवत जाणाऱ्या जैवविविधतेविषयी गेल्या काही वर्षांमध्ये जग बरेच जागरुक झाले आहे. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचीही सारखीच परिस्थिती आहे. मात्र, आपल्या हे निदर्शनास येत नाही आहे. पर्वतांमधून उगम पावणाऱ्या गोड्या पाण्याच्या या प्रवाहांनी मानव संस्कृतीला जन्म दिला. तसेच मानवी सभ्यतेला बळकटी दिली. जरी या पाण्यामध्ये प्रवाळ खडकांसारखे वैविध्य नसले, तरी उष्ण कंटिबधीय प्रदेशातील गोड्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ जैवविविधता आढळते. नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' प्रजातीसारख्याच काही प्रजाती या केवळ छोटे प्रवाह, तळी आणि नदी पात्रांपुरत्याच मर्यादित आहेत. त्यामुळे अशा छोट्या अधिवासांना क्षति पोहोचल्यास आपण संपूर्ण प्रजातीच गमावू शकतो. म्हणूनच गोड्या पाण्याचा अधिवास आणि त्यामध्ये राहणाऱ्या लाखो प्रजातींच्या संवर्धनाच्या अनुषंगाने काम करण्याचा हा योग्य काळ आहे. - तेजस ठाकरे, संशोधक 
 
 
आंबोलीचे महत्व
सांवतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने या ठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे इथली जैवविविधता समृद्ध आहे. एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ पासून २० नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींमध्ये काही साप, उभयचर, खेकडे, कोळी आणि स्काॅरपियन प्रजातीबरोबरच 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या माशाचाही समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@