आग की फुफाटा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020
Total Views |

Donald Trump_1  
 
 
 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचण्यावेळीच जो बायडन यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट नागरिकत्व देण्याची घोषणा केली. मात्र, यावरून एका बाजूला आक्रस्ताळे, धटिंगण डोनाल्ड ट्रम्प आणि दुसर्‍या बाजूला अवैध स्थलांतरितांचे समर्थन करणारे जो बायडन, यापैकी नेमकी आग निवडायची की फुफाटा, याचा निर्णय अमेरिकन जनतेला घ्यायचा आहे.
 
 
 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून तिथल्या आणि इथल्याही डाव्या-उदारमतवादी मंडळींनी डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे भरभरून समर्थन केले. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या सत्ताकाळात मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा एक आक्षेप घेतला जातो. तसेच त्यांची स्त्रियांशी संबंधित मते, जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर उद्भवलेला हिंसाचार व ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ची मोहीम, कोरोनाला आटोक्यात आणण्यात व बळींची संख्या किमान पातळीवर राखण्यात आलेले अपयश, करचोरी किंवा करभरणा न करणे, रशियाशी कथित जवळीक किंवा त्याचा निवडणुकीतील हस्तक्षेप, अतिरेकी राष्ट्रवाद व वैयक्तिक अभिनिवेशापोटी आपल्या आधीच्या सरकारांनी केलेले करार मोडणे, अमेरिकेचे जागतिक राजकारणातील स्थान घसरेल अशी भूमिका घेणे, चीन प्रकरणाची हाताळणी, अशा अनेक मुद्द्यांवरून ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका होत होती, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी तथ्यात्मक मांडणी करण्यापेक्षा केवळ होणारी टीका उडवून लावण्यावर भर दिला. परिणामी, अध्यक्षीय निवडणूक प्रचार, चर्चेची पहिली फेरी आदी काळात ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे आणि जो बायडन आघाडीवर असल्याचेही निदर्शनास आले. पण, जो बायडन हेसुद्धा फार काही दमदार नेतृत्व असल्याचे दिसत नाही. त्यातूनच अमेरिकन जनतेला अधिक वाईट आणि कमी वाईट या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, नुकतेच जो बायडन यांनी असे एक विधान केले की, आता ते कमी वाईटाचे अधिक वाईट ठरावेत. म्हणजेच, येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या निवडणुकीत अमेरिकन जनतेसमोर आग की फुफाटा, असे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवते.
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील मूळ निवासी, अमेरिकन नागरिक व अमेरिकन राष्ट्रवादाशी संबंधित मते सर्वांच्या परिचयाची आहेत. मागील निवडणूक त्यांनी याच मुद्द्यांच्या व स्थलांतरितांना विरोधाच्या आधारावर जिंकली होती. आताही पुन्हा त्याच मुद्द्यांवर धुरळा उडण्याची वेळ आली आहे, कारण जो बायडन यांचे विधान. कोणत्याही एका उमेदवाराच्या लहानशा चुकीनेही त्याला मोठी हानी होऊ शकेल, अशा वळणावर आलेल्या निवडणूक प्रचारात बायडन यांनी मोठी चूक केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना आकर्षित करण्यासाठी बायडन यांनी आत्मघाती विधान केले, ज्याचा अध्यक्षीय निवडणुकीवर गहिरा प्रभाव पडू शकतो. बायडन यांनी घोषणा केली की, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशात राहणार्‍या एक कोटी दहा लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व दिले जाईल. मुळात अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा मोठा असून, त्याचे उत्तर एकाच वेळी सर्वांना नागरिकत्व देणे हे नाही. तसे केले तर मूळच्या अमेरिकन नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी होतील, तसेच शिक्षण, आरोग्य आदी समस्याही उद्भवतील. सोबतच वर्षानुवर्षे प्रतीक्षा करून वैध पद्धतीने अमेरिकेचे नागरिकत्व मिळविलेल्यांवरही अन्याय होईल. ट्रम्प यांनी तर बायडन यांच्या या विधानाआधीपासूनच बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून डेमोक्रॅटिक पक्षाला घेरले होते. आता बायडन यांच्या विधानाने तर त्यांना आणखी जोर चढेल आणि मूळचे अमेरिकन नागरिकही सावध होतील व त्याचे नुकसान बायडन यांना सोसावे लागेल. तत्पूर्वी बायडन-सॅण्डर्स यांच्या टास्क फोर्सने एक धोरणपत्रिका प्रसिद्ध करून सत्तेत आल्यास १०० दिवसांपर्यंत डिपोर्टेशन किंवा अवैध स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याशी संबंधित प्रक्रिया बंद करणार असे म्हटले होते. आता तर त्यांनी डाव्या-उदारमतवाद्यांना खूश करण्यासाठी थेट बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्वच देणार, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे अमेरिकन जनतेच्या नशिबी कोणते भोग आहेत, याचीही कल्पना करता येते. एकीकडे आक्रस्ताळे, धटिंगण डोनाल्ड ट्रम्प, तर दुसरीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देणारे बायडन आणि त्यापैकी एकाची निवड करायची, हे अमेरिकनांचे भाग्य आहे. पण, बायडन यांच्या नव्या विधानामुळे त्यांनी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्याचे समजते.
 
 
 
अमेरिकेत सध्या चार कोटी ७० लाख स्थलांतरित राहतात व त्यापैकी एक कोटी दहा लाख बेकायदेशीर आहेत. त्यांना मतदानाचा हक्क नाही, तर एक कोटी १४ लाख कायदेशीर स्थलांतरित आहेत आणि त्यांनाही मतदानाचा हक्क नाही. उर्वरित दोन कोटी दहा लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले असून, त्यांना अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. आता बायडन यांनी या मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असली, तरी ते सर्वच्या सर्वच बायडन यांचे नेतृत्व मान्य करतील, असे नाही. दरम्यान, जो बायडन यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी मतदार मात्र, अधिक चेवाने त्यांच्याविरोधात सक्रिय होण्याची व मतदानाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याची शक्यता वाटते. तसेच ट्रम्प किंव बायडन यापैकी कोणाच्याही बाजूने नसलेल्या व कुंपणावरच्या मतदारांची संख्या पाठीराख्यांपेक्षा नेहमीच अधिक असते. अशा कुंपणावरच्या मतदारांची भूमिका नेहमी निर्णायक ठरत असते. पण, जो बायडन यांचे आताचे विधान या कुंपणावरच्या मतदारालाही आपल्यापासून दूर लोटणारे ठरते. गेल्या निवडणुकीत हिलरी क्लिटंन यांना अध्यक्षपदी बसवणेच बाकी ठेवणार्‍या अमेरिकी व आपल्या मराठी बुद्धिमंतांची या मतदाराने घोर निराशा केली होती, नव्हे सर्वांना धाडदिशी तोंडावर आपटवले होते. तसाच प्रकार बायडन यांच्या अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याच्या विधानाने होऊ शकतो. विशेष म्हणजे, आता हाती आयतेच कोलीत मिळाल्याने ट्रम्पदेखील आता डेमोक्रॅट्सच्या स्थलांतरितविषयक धोरणावर आवेशाने हल्ले करतील. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी अमेरिकी मतदार व कुंपणावरचे मतदार दोन्हीही आगीतून उठून फुफाट्यात पडण्यापेक्षा जिथे आहोत, तिथेच राहणे पसंत करण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. तरीही आताच काही अंदाज व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मात्र, बायडन यांच्या विधानाने अमेरिकन मतदारांतील एक मोठा वर्ग त्यांच्यापासून अंतर राखू शकतो व त्याचा परिणाम निवडणुकीत उमटू शकतो.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@