‘कल्याणकर’ तुषार देशपांडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020
Total Views |

Tushar Deshpande_1 &
 
 
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेतील आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात लक्षवेधी कामगिरी करणारा मराठमोळा खेळाडू कल्याणकर तुषार देशपांडेच्या आयुष्याविषयी...
 
 
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेला सुरुवात झाल्यामुळे अनेक खेळाडूंना आपले कौशल्य जगासमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. अनेक महिन्यांनंतर सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रतिभावान खेळाडूंसोबतच अनेक नवे खेळाडूही आपले अस्तित्व सिद्ध करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. जगप्रसिद्ध अशा या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळतानाही अनेक नवखे खेळाडू आपल्या कर्तृत्वाद्वारे सर्वांसमोर छाप पाडत आहेत. अगदी पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी केलेली कामगिरीदेखील लक्षवेधी ठरत असून, हे खेळाडू भविष्यात नक्कीच देशासाठी नाव कमावतील, अशी भावना क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू असून या यादीत सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे मराठमोळा खेळाडू तुषार देशपांडे याचे. तुषार देशपांडे याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच केलेल्या कामगिरीने अनेकांना भुवया उंचावण्यास भाग पाडले आहे. अनेक क्रिकेट जाणकारांनी तुषारमध्ये प्रतिभावान तेज गोलंदाज होण्याची क्षमता असल्याचे मत व्यक्त केल्याने सध्या भारतीय क्रिकेटविश्वात तुषार देशपांडे या नवख्या गोलंदाजाची चांगलीच चलती आहे. मुख्य बाब म्हणजे, हा खेळाडू मुंबईकर असल्याने त्याच्याकडून अधिकच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
 
 
 
मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. ‘मायानगरी’ म्हटल्या जाणार्‍या मुंबईने क्रिकेटविश्वाला अनेक खेळाडू दिले. अनेक जगप्रसिद्ध खेळाडू मुंबईच्या मातीतच घडले. अगदी क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिनही घडला तो याच मुंबईच्या धर्तीवर. अनेक नामवंत आणि प्रतिभाशाली खेळाडू घडविण्याचा मुंबईचा इतिहास असल्याने तुषार देशपांडेकडून आपसूकच अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मराठमोळा मुंबईकर खेळाडू तुषार देशपांडे हा सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेल, अशी आशा तमाम क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तुषार हा मूळचा कल्याण येथील रहिवासी. १५ मे, १९९५ रोजी त्याचा जन्म झाला. तुषार याचे आईवडील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. कल्याणकर असणार्‍या या तुषारला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. आपल्या मुलाची ही आवड जपण्यासाठी देशपांडे दाम्पत्यांनी तुषारला स्थानिक क्लबमधील प्रशिक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांनी एका स्थानिक नामांकित क्रिकेट क्लबमध्ये नोंदणी केल्यानंतर तुषारच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास येथून सुरू झाला. लहानपणापासूनच तो दररोज नित्यनियमाने क्रिकेटच्या सरावाला जाऊ लागला. सुरुवातीपासूनच एक चांगला फलंदाज होण्याचे स्वप्न तुषार देशपांडे याचे होते. मात्र, का कुणास ठावूक नियतीच्या मनात काय होते; फलंदाज म्हणून घडण्याऐवजी तुषार घडला तो एक गोलंदाज म्हणूनच. झाले असे की, २००७ साली १३ वर्षांखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. यावेळी सरावासाठी मैदानावर आलेल्या तुषारला फलंदाजीसाठी त्याच्यासारखेच ६०-७० खेळाडू रांगेत दिसले. दुसरीकडे गोलंदाजीच्या रांगेत कमी खेळाडू असल्यामुळे तुषारने गोलंदाजीच्या रांगेत उभे राहायचे ठरवले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये तुषार देशपांडेने आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधले आणि इथूनच तुषारसाठी मुंबई संघाची दारे खुली झाली.
 
 
 
मुंबईत जाऊन सराव करण्यासाठी दारे खुली झाली असली, तरी अजून यासाठी संघर्ष आणखी करावा लागणार होता. दररोज कल्याण ते मुंबई असा प्रवास करावा लागणार होता. तुषारचे आईवडील सरकारी कर्मचारी असल्याने दरदिवशी सरावासाठी कल्याण ते शिवाजी पार्क असा प्रवास करताना आपल्या मुलाला कसलाही त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. यानंतर मुंबईतील नामवंत प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत त्याने गोलंदाजीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. तुषार कसून सराव करू लागला. स्थानिक सामन्यांमध्ये तो यशस्वी कामगिरी करत होता. अशातच ‘रणजी’ सामन्यांच्या प्रशिक्षकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला मुंबईच्या ‘रणजी’ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. २०१६-१७ साली तुषारने मुंबईकडून ‘रणजी करंडक’ स्पर्धेत पदार्पण केले. २०१८-१९च्या ‘विजय हजारे करंडक’ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने पाच बळी घेत मुंबईला एकहाती सामना जिंकवून दिला. त्याची ही कामगिरी लक्षात घेत दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ‘आयपीएल’मधून खेळण्याची संधी दिली. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’च्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने उत्तम कामगिरीही केली. त्यामुळे आता क्रिकेटविश्वात त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. ‘आयपीएल’नंतर भारतीय संघात स्थान मिळविण्याचे त्याचे लक्ष असून पुढील वाटचालीसाठी मराठमोळ्या मुंबईकर तुषार देशपांडेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!
 
- रामचंद्र नाईक
 
 
@@AUTHORINFO_V1@@