उशिरा सुचलेले शहाणपण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020
Total Views |

kartik _1  H x
 
 
 
 
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेच्या आता परतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या मध्यंतरादरम्यानच कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकची कर्णधारपदावरून उचलबांगडी करत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणार्‍या ईऑन मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वँकी मैसूर यांनी याबाबतची घोषणा केली. कोलकात्यासारख्या महत्त्वाच्या संघाची ही घोषणा म्हणजे एक प्रकारचे संघाच्या व्यवस्थापनाला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने ‘आयपीएल’मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर २०१८ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिनेश कार्तिकवर सात कोटी ८० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले. मात्र, त्या लिलावातही कोलकाता नाईट रायडर्स संघाला कर्णधारपदासाठी साजेसा खेळाडू न मिळाल्यामुळे संघाने दिनेश कार्तिकच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली. दिनेश कार्तिकने यापूर्वी ‘आयपीएल’च्या एकाही सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली नव्हती. मात्र, तरीही कोलकाता संघाने एखाद्या परदेशी खेळाडूऐवजी भारतीय खेळाडूला संधी देण्याचे धाडस दाखवले.२०१८ या वर्षी कोलकाता प्ले ऑफमध्ये स्वतःची जागा बनवू शकली नाही. एका अनुभवी कर्णधाराची उणीव या संघात कायम पाहायला मिळाली. परंतु, असे असतानाही २०१९च्या हंगामादरम्यान पुन्हा एकदा कार्तिकवर विश्वास ठेवला. पूर्ण हंगामात संघ पाचव्या स्थानी राहिला. परिणाम तोच, संघाला प्ले ऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. यंदाच्या लिलावात कोलकात्याने ईऑन मॉर्गनला आपल्या संघात सामील करून घेतल्यानंतर तो या संघाचा कर्णधार असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, कार्तिकच कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यंदाच्या हंगामात सातपैकी चार सामने संघाने जिंकले असून, विस्कटलेली घडी सावरण्यासाठी कोलकात्याने कार्तिकऐवजी ईऑन मॉर्गनला कर्णधार बनविले. सामन्याच्या काही तासांआधी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याने उशिरा सुचलेले हे शहाणपण असल्याचे मत समीक्षकांनी व्यक्त केले आहे.
 
 
देर आए पर दुरुस्त आए!
 
 
सध्या भाजपचे दिल्लीतील खासदार असणारे मात्र एकेकाळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधार राहिलेले गौतम गंभीर यांनीही कार्तिकबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचे विधान केले होते. कार्तिकने ईऑन मॉर्गन आणि आंद्रे रसेलनंतर फलंदाजीस यावे, असा सल्ला गंभीर यांनी दिला होता. क्रिकेट समीक्षकांच्या मते, हा सल्ला संघासाठी उपयुक्त होता. कारण, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत कार्तिकने सात सामन्यांत केवळ १५.४२च्या सरासरीने जेमतेम १०८ धावा केल्या आहेत. कर्णधारपदाच्या लौकिकास ही साजेशी कामगिरी मुळीच नाही. त्यामुळे कार्तिकने ईऑन मॉर्गन आणि आंद्रे रसेलनंतर फलंदाजीस उतरावे, असे गंभीरचे म्हणणे होते. गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना संघाला दोन वेळा ‘आयपीएल’चे विजेतपद पटकाविण्यात यश मिळविले आहे. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाबाबत गंभीरला चांगली माहिती असल्यानेच त्याने कार्तिकला हा उपयुक्त सल्ला दिला होता. मात्र, त्याचे पालन झाले नाही. अखेरीस कार्तिकने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून आपण मुक्त होत असल्याची घोषणा शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या काही तासांआधी केली. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने कार्तिकच्या जागी ईऑन मॉर्गन यानंतर संपूर्ण हंगामासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, असे जाहीर केले. कार्तिक हा प्रतिभावंत खेळाडू नक्कीच आहे. २०१८ साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या ‘निढास’ चषकाच्या अंतिम सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूवर षट्कार लगावत भारताला कार्तिकनेच विजय मिळवून दिला होता. बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेणारा खेळाडू ठरल्यानंतर तो फॉर्मात असतानाच त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा कोलकात्याने सोपविली होती. २०१८ साली त्याने ‘आयपीएल’च्या हंगामात ४९.८० च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर याबाबत कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. परंतु, सध्याच्या घडीला तो फॉर्मात नसल्याने संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी करत ईऑन मॉर्गनला नेतृत्व करण्यास सांगितले. समीक्षकांच्या मते खरे तर हे आधीच होणे अपेक्षित होते. मात्र, ‘देर आए दुरुस्त आए’ ही म्हण कोलकात्याबाबत तंतोतंत लागू होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
- रामचंद्र नाईक
 
@@AUTHORINFO_V1@@