मतदारांची ‘ममता’ आटणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2020   
Total Views |

Mamata Banerjee_1 &n
 
राष्ट्रीय राजकारणाविषयी ममता बॅनर्जींच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीत. मात्र, बंगालमध्ये मतदारांची ‘ममता’ आटल्यास, ममता बॅनर्जींच्या राजकारणाला मोठी खीळ बसेल, हे नक्की!
 
 
 
 
सध्या देशाच्या राजकीय विश्वाचे लक्ष बिहार विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने त्या निवडणुकीचे वेगळे महत्त्व आहेच. त्यातही बिहारमध्ये सध्या तरी भाजप आणि जदयु यांच्यात वरचष्मा असल्याचे चित्र आहे; अर्थात १० नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यावर काय ते स्पष्ट होईलच. मात्र, बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा झाला नाही, तरी जॅकपॉट मात्र भाजपलाच लागणार आहे. असो, बिहारमध्ये सध्या सर्वांचे लक्ष असतानाच पुढील वर्षी होणार्‍या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज झाला आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल १८ जागांवर विजय मिळाला होता, हा विजय अनेकांसाठी धक्कादायक असला तरी भाजपचे अनेक नेते बंगालमध्ये बघा, कसा निकाल लागतो ते, असे खासगीत सांगतच होते. त्यामुळे बंगालमध्ये भाजपला मिळालेले यश हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी तो मोठा हादरा होता. त्यापूर्वीदेखील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी अतिशय उजवी राहिली आहे. पंचायत निवडणुकीत तर ममता बॅनर्जींनी अगदी मनसोक्त हिंसा केली होती. मात्र, तरीदेखील भाजपने तृणमूल काँग्रेसच्या तोंडाला फेस आणला होता.
 
 
“केंद्रात सलग दुसर्‍यांदा बहुमताने भाजपची सत्ता आली असली, तरीही हा भाजपचा सुवर्णकाळ नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोहरून जाण्याची गरज नाही. कारण, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजप जोपर्यंत सरकार स्थापन करीत नाही, तोपर्यंत पक्षाचा सुवर्णकाळ येणार नाही,” असे पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अगदीच खालच्या पातळीवर उतरल्या होत्या. जाहीर सभांना परवानगी नाकारणे, पक्षाच्या बैठका घेण्यात अडथळा आणणे, अमित शाहांचे हेलिकॉप्टर उतरू देण्यास परवानगी न देणे, हे आणि असे अनेक प्रकार त्यांनी केले. मात्र, राज्यातील ४२ पैकी १८ जागांवर भाजपने विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर भाजपने बंगालकडे आपले सर्व सामर्थ्य लावण्यास प्रारंभ केला आहे.
 
 
एकेकाळी राज्यात नावालाही नसलेला भाजप आज तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी समर्थ झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो खुद्द ममता बॅनर्जी यांचाच. बंगालमधली डाव्यांची दीर्घकाळची राजवट उलथून टाकून स्वबळावर सत्ता मिळविणार्‍या ममता बॅनर्जी या निश्चितच लढवय्या आहेत. मात्र, त्यांच्या लढवय्या स्वभावाला भीतीची एक किनार लाभली आहे आणि त्यामुळे त्या आता शब्दश: हादरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील हिंसक प्रवृत्ती आता वरचढ झाली आहे. बंगालमध्ये आतापर्यंत केवळ भाजपच्याच तब्बल ११५ कार्यकर्ते-नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच त्याची माहिती दिली, दर दोन दिवसाआड एकाची हत्या, असे धोरण ममता बॅनर्जी राबवित असल्याचे त्यांनी म्हटले. ममतांचे गणित अगदी साधे आहे, ‘जो मला आणि माझ्या पक्षाला विरोध करेल, त्याला जगण्याचा कोणताच हक्क नाही.’ विशेष म्हणजे, या सरकारपुरस्कृत हत्याकांडात तृणमूलच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यातील पोलिसांचाही सहभाग असल्याचा भाजपचा आरोप आहे. केवळ भाजपच्याच कार्यकर्त्यांचे बळी जात आहेत, असेही नाही. बंगालमध्ये राजकीय हत्यांची मुहूर्तमेढ रोवणार्‍या डाव्या पक्षांचे कार्यकर्ते, राज्यात असून नसल्यासारखे असलेल्या काँग्रेसचे कार्यकर्तेही मारले जात आहेत. मात्र, हे दोन पक्ष त्याविरोधात चकार शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे अशा रक्तपाताला कंटाळलेल्या मतदारापुढे भाजपचा एक समर्थ पर्याय आपोआपच उभा राहिला आहे.
 
 
ममतांच्या हिंसक वागणुकीची पूर्ण कल्पना असल्यानेच भाजपने बंगालसाठी पूर्ण तयारी केली आहे. ममतांच्या अरेरावीला त्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांना भाजपने कधीच तेथे सक्रिय केले आहे. विजयवर्गीय यांनी पहिले काम केले ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे. जनतेला आपला पक्ष हवा आहे, त्यासाठी कोणत्याही स्थितीत पाय रोवून काम करावेच लागेल, असे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात बिंबविले. त्यात वातानुकूलित खोलीत बसायचे आणि मग ‘स्ट्रॅटेजी’ आखायची, असे काम करण्याची विजयवर्गीय यांची कार्यशैली नाही. आपल्यासोबत रस्त्यावर उतरून काम करणारा समर्थ नेता मिळाल्याने हिसेंच्या भयातही भाजपचे कार्यकर्ते काम करीत आहेत. भाजप युवा मोर्चाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या हावड्यातल्या रॅलीमध्ये क्रूड बॉम्बने हल्ला करूनही तो मोर्चा यशस्वी झाला, यावरून भाजपचे मनोबल किती मजबूत झाले आहे, याची कल्पना येते.
 
 
त्याचा पुढचा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे. राज्यातल्या राजकीय हत्यांविरोधात बंगाल भाजप व्यापक जनअभियान सुरू करणार आहे, त्यासाठी राज्य भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. बंगालच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला हिंसेकडे नेण्याचे काम तृणमूल काँग्रेसने केले, असा विचार जनतेच्या मनात रुजविण्याचे काम भाजप या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी केंद्रातून अस्खलित बंगाली बोलणार्‍या आणि आक्रमक असणार्‍या स्मृती इराणी, ओडिशाला लागून असलेल्या भागासाठी धर्मेंद्र प्रधान, ईशान्येकडील राज्यांनी लागून असलेल्या भागासाठी किरेन रिजिजू, कृषी कायद्यांसाठी नरेंद्रसिंह तोमर आणि राज्यातले रेल्वेचे जाळे लक्षात घेऊन पीयूष गोयल आणि सांस्कृतिक विषयांसाठी प्रल्हाद पटेल या मंत्र्यांना आता सक्रिय केले जाणार असल्याची माहिती आहे. राज्यात सुमारे दीड महिने या सहा मंत्र्यांसह राज्यातले नेते जोरदार आंदोलने करून ममतांना जेरीस आणतील. सोबतीला तेजस्वी सूर्या यांचे तरुण नेतृत्व असणार आहे. भाजपसोबतच युवा मोर्चादेखील समांतरपणे आंदोलने करणार आहे.
 
 
या आंदोलनानंतर भाजपचा मुख्य तोफखाना बंगालच्या रणांगणावर उतरविला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य अनेक नेते बंगालमध्ये सक्रिय होणार आहेत. बंगालमध्ये भाजपने आता 250 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बंगालमध्ये भाजपला विजय मिळाल्यास त्याचा परिणाम अपरिहार्यपणे देशाच्या राजकारणावरही होणार आहे. कारण, सध्या काँग्रेस पक्ष पूर्णपणे निष्प्रभ झाला असताना ममता बॅनर्जी अनेकदा ती जागा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. राष्ट्रीय राजकारणाविषयी त्यांच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. मात्र, बंगालमध्ये मतदारांची ‘ममता’ आटल्यास, ममता बॅनर्जींच्या राजकारणाला मोठी खीळ बसेल. त्यामुळेच या निवडणुकीत भाजपकडे गमाविण्यासारखे काहीही नसले, तरी ममतांचे अस्तित्व मात्र या निवडणुकीवर अवलंबून आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@