‘कोरोना’नंतर कसोटी नव-कौशल्याची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2020
Total Views |

AatmaNirbhar_1  
 
 
कोरोना-लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कौशल्याचा मुद्दा नव्या संदर्भ आणि स्वरूपात पुढे आला. याच दरम्यान देशपातळीवरील ‘आत्मनिर्भरते’च्या संदर्भात कर्मचारीविषयक नव-कौशल्यांचा मुद्दा पडताळून पाहणे आवश्यक व लक्षणीय ठरते.
 
कोरोना कालखंडादरम्यान नोकरी-रोजगारात निर्माण झालेली अस्थिरता व उद्योग-व्यवसायात आलेली मरगळ याचा मोठा परिणाम जाणवला. नोकरीच्या ठिकाणी व कामाच्या स्वरूपात मोठे बदल झाले. हे झालेले अकल्पित बदल अनेकांच्या रोजगाराच्या संदर्भात मोठ्या व दीर्घकालीन स्वरूपात परिणामकारक ठरले. याच्याच जोडीला कर्मचारी कौशल्याचा मुद्दा नव्या संदर्भ आणि स्वरूपात पुढे आला. याच दरम्यान देशपातळीवरील ‘आत्मनिर्भरते’च्या संदर्भात कर्मचारी विषयक नव-कौशल्यांचा मुद्दा पडताळून पाहणे आवश्यक व लक्षणीय ठरते. कोरोनामुळे कंपनी आणि कर्मचारी या उभयंतांच्या कामकाजात मोठे बदल झालेले आहेत. कंपनीचा व्यवसाय व तेथील काम करणार्‍या कामाची पद्धत, कामाचे स्वरूप, प्रक्रिया इ. मध्ये झालेल्या बदलांनुरूप, कोरोनानंतरच्या गरजांनुरूप नवीन कार्यपद्धतीनुरूप नव-कौशल्याची जोड देणे आता अपरिहार्य ठरले आहे. यासाठी प्रक्रिया-तंत्रज्ञानापासून कामकाज-व्यवहारांपर्यंत कौशल्यवृद्धीचे प्रयत्न प्राधान्यतत्त्वावर करण्यात येत आहेत.
 
 
कर्मचारी नव-कौशल्याच्या या नव्या प्रयत्नात विविध व्यवस्थापनांची आपल्या कर्मचार्‍यांकडून असणारी प्रमुख, समान व किमान अपेक्षा म्हणजे कर्मचार्‍यांमध्ये नवे काही शिकण्याची तयारी व मानसिकता. व्यवस्थापनाची आपल्या कर्मचार्‍यांकडून अशी अपेक्षा असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोरोनामुळे बदलेली व्यावसायिक स्थिती. त्यातच भर पडली ती लांबलेले प्रदीर्घ ‘लॉकडाऊन’, आर्थिक स्थिती, अनपेक्षित व्यावसायिक स्थिती, व्यवस्थापनांपुढील वाढती व्यावसायिक आव्हाने व या सार्‍यांच्या परिणामी निर्माण झालेली अनपेक्षित अस्थिरता. यासंदर्भात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, ‘ताज’ हॉटेलचे संचालन करणार्‍या ‘इंडियन हॉटेल कंपनी’ने कोरोनाकाळात उपलब्ध वेळ आणि संधीचा लाभ घेत सुमारे दहा हजार कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक अशा नव-कौशल्य विकास कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. हॉटेल व्यवसायाशी बदलत्या परिस्थितीनुरूप निगडित अशा कोरोनादरम्यान व त्यानंतरच्या काळातील ग्राहकसेवा, विविध आवश्यक मर्यादांसह आतिथ्यशीलता, खानपान, ग्राहक संपर्क विशेष स्वच्छता इ. बाबींचा या प्रशिक्षण उपक्रमात ‘ताज’ हॉटेलने आवर्जून समावेश केला होता. सद्यःस्थितीत ‘कर्मचारी प्रशिक्षण’ या विषयाला नवा उपक्रम प्राप्त झाला आहे. या आयामांतर्गतचे बदल हे कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी या उभय पातळींवर झालेले आहेत. कोरोनाच्या निमित्ताने बदलते कामकाज आणि कामाचे स्वरूप यानुसार काम करणे ही काळाची गरज ठरली आहे. याचे परिणामही दिसून आले आहेत. उदा. ‘कॉग्निझंट’ कंपनीत कोरोनादरम्यान कंपनी कर्मचार्‍यांमध्ये विविध प्रकारचे व विविध स्वरूपाचे प्रशिक्षण घेणार्‍या कर्मचार्‍यांच्या संख्येत २०१९च्या याच कालावधीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी, तर कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षण सत्र तासांच्या तुलनेत सहा टक्क्यांनी झालेली उल्लेखनीय वाढ यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरते.
 
 
 
कोरोनानंतर कर्मचार्‍यांच्या कौशल्यवृद्धीमध्ये जी लक्षणीय वाढ झाली आहे, त्याचे प्रत्यंतर आपल्याला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातर्फे प्रसारित केलेल्या आकडेवारीवरूनही लक्षात येते. महामंडळातर्फे प्रसारित माहितीनुसार, विविध स्तरावरील व्यक्तिगत म्हणजे कर्मचारी स्तरावर सप्टेंबर २०२० मध्ये सुमारे तीन लाखांनी वाढ झाली. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी २०२०च्या तुलनेत ‘कौशल्य विकास’ कार्यक्रमाच्या लाभार्थींच्या संख्येची तुलना केल्यास यामध्ये विक्रमी अशा दोन हजार टक्क्यांनी वाढ होण्याचा इतिहासही कोरोनाच्या कठीण काळात झाला आहे. ‘कौशल्य विकासा’च्या या विक्रमी वृद्धीचे वैशिष्ट्य म्हणजे, कोरोेनादरम्यानच्या ‘लॉकडाऊन’ निर्बंध काळात विभिन्न स्तरावरील कर्मचार्‍यांनी ऑनलाईन म्हणजेच संगणकीय पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणावर अवलंब केल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने ‘नॅसकॉम’च्या ‘फ्यूचर स्किल’, ‘अप ग्रेड’, ‘सिंपली लर्न’ या संगणकीय पद्धतीवर आधारित कौशल्य विकास पद्धती अधिक परिणामकारक ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. विविध स्तर आणि वयोगटातील असणार्‍या व सद्यःस्थितीत नव-कौशल्य आत्मसात करण्याच्या या प्रक्रियेत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘स्किल-फोरम’द्वारा नवे कौशल्य घेणार्‍यांची संख्या महिन्यात लाखांवर पोहोचली आहे, तर ‘अप-ग्रेड’ने मार्च २०२० मधील ४.८ लाख या आकड्यावरून ऑगस्ट २०२० मध्ये ८.३ लाखांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना दरम्यान आणि नंतरच्या काळात नक्कीच आशादायी ठरते. मुख्य म्हणजे, या नवीन कौशल्यांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानापासून प्रात्यक्षिकांसह बौद्धिक ज्ञानापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश आहे, हे विशेष.
 
 
यासंदर्भात अधिक मागोवा घेतल्यास असे जाणवते की, तंत्रज्ञान-प्रक्रिया, संगणक पद्धती, प्रकल्पशास्त्र, उत्पादन प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी बदलते तंत्रज्ञान आणि कार्यशैली-प्रक्रियेमुळे या क्षेत्रात काम करणार्‍याने नवे आणि बदलते कौशल्य आत्मसात करणे ही एक नित्याची बाब असली, तरी यावेळी झालेल्या कौशल्यवाढीत मार्केटिंग, संवाद क्षमता, लेखन-विकास, प्रकल्प व्यवस्थापन, परस्पर संबंध यांसारख्या विषयांमधील वाढीव व बदलते कौशल्य घेणार्‍यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते. तसे पाहता तंत्रज्ञान-प्रक्रियेवर आधारित अशा कौशल्यांची नव्याने भर तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत पडत असतेच. कंपन्या-व्यवस्थापन त्यादृष्टीने नियोजनही करतात. तसे करणे आवश्यकच नव्हे, तर अपरिहार्यही ठरते. मात्र, कोरोनानंतर नव्याने व मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांना नव-कौशल्य क्षेत्रात प्रशिक्षण देण्या-घेण्याच्या या नव्या व वाढत्या कौशल्य उपक्रमाने यासंदर्भातील परंपरागत कालमर्यादा कालबाह्य ठरविली आहे. मुख्य म्हणजे, सध्या अशा कौशल्य प्रशिक्षणाची थेट सांगड कोरोनामुळे बदललेल्या अथवा बदलू शकणारे कामकाज आणि त्याचे स्वरूप, व्यावसायिक गरजा व मुख्य म्हणजे ‘लॉकडाऊन’मुळे प्रदीर्घकाळ कर्मचार्‍यांनी घरून काम करणे इ.चा प्रभाव प्रामुख्याने दिसून आला आहे.
 
 
 
नव-कौशल्याची सुरुवात झाल्यानंतर आता त्यांच्या फायदा-उपयुक्ततेची कल्पना सर्वांनाच येत आहे. एप्रिल-मेमध्ये ‘लॉकडाऊन’नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर नोकरी रोजगार गमावणार्‍यांना अधिकांश स्वरूपात त्यांची संधी पुन्हा प्राप्त होत आहे. मात्र, यादरम्यान त्यांचे कामाचे स्वरूप आणि पद्धतींमध्ये जे मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल झाले, त्यामध्ये नव्याने विकसित झालेले कामकाज विषयक कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे. ज्या कुणी कोरोनाकाळात नवे कौशल्य व कार्यपद्धती आत्मसात केली असेल, अशांना आता त्यांच्या अथवा नव्या कामाच्या ठिकाणी प्राधान्यासह पसंती दिली जात आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनानंतरच्या नव-कौशल्यात केवळ तंत्रज्ञान वा दैनंदिन कामाशी संबंधित अशा कौशल्यांच्या जोडीलाच व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांच्या संदर्भातील बदलत्या कौशल्यांचाही आवर्जून व आवश्यक असा समावेश करण्यात आला आहे, हे विशेष. परिणामी, आता कोरोनानंतरच्या बदलत्या आणि नव्या कार्यपद्धतीमध्ये अधिकारी-व्यवस्थापकांसाठी पण काही निकष वा अपेक्षा नव्या संदर्भात अमलात आलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये कामाच्या संदर्भात काळ-काम-वेग यांच्या समन्वयापासून परिस्थितीनुरूप आवश्यक, आव्हानपर काळातही व्यवसायपूरक व व्यावहारिकच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही पूरक अशा निर्णयक्षमता असणार्‍या अधिकार्‍यांना प्राधान्य दिले जात आहे. कोरोनापासून व त्यानंतरच्या काळातील हे विशेष व्यवहार्य धडे दीर्घकाळ परिणामकारक ठरले आहेत.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
 
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@