'मालवण सागरी अभयारण्या'च्या सीमेबाबत पुनर्विचार होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020   
Total Views |
malvan _1  H x


अभयारण्याचा १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा मंजूर


मुंबई (अक्षय मांडवकर) - वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'मालवण सागरी अभयारण्या'च्या सीमेबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात 'मालवण सागरी अभयारणाचा व्यवस्थापन आराखड्या'ला (२०२० ते २०३०) संमती मिळाली. या आराखड्यातील तरतूदींनुसार अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार होणार आहे. पुढच्या वर्षी 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) माध्यमातून अभयारण्याच्या आसपासच्या परिक्षेत्रातील सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागांचा शोध घेतला जाईल. त्यानंतर अभयारण्याच्या सीमेबाबत निर्णय घेण्यात येईल. 
 
 
राज्याच्या किनारी क्षेत्रात दोन सागरी संरक्षित क्षेत्र आहेत. ज्यामध्ये 'मालवण सागरी अभयारण्य' आणि 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चा समावेश होतो. या दोन्ही संरक्षित क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह सेल'ची आहे. १९८७ साली मालवण सागरी परिक्षेत्राला सागरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या सागरी अभयारण्याचे एकूण परिक्षेत्र २९.१२ चौ.किमी आहे. त्यामधील साधारण २५.९५ चौ.किमीचे कवच (बफर) क्षेत्र आहे. तर अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात (कोअर) सिंधुुुदुर्ग आणि पद्मगड किल्ल्यांचा समावेश होतो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी आणि पर्यटनाच्या आधारे होणारे व्यवसाय केले जातात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिकांकडून अभयारण्याची सीमा आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत आक्षेप नोंदवले जात आहेत. त्यामुळे आता 'मॅंग्रोव्ह सेल'ने या अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

malvan _1  H x  
 
गेल्या आठवड्यात ७ आॅक्टोबर रोजी 'मालवण सागरी अभयारण्या'चा १० वर्षांचा व्यवस्थापन आराखडा राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संमत केला. अभयारण्य निर्माणाच्या ३३ वर्षांनंतर प्रथमच व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीस वर्षांपूर्वी ठरवलेल्या अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मासेमारीसोबतच स्थानिकांनी विविध प्रकारचे रोजगार आधारित उपक्रम सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अभयारण्याच्या सीमेबाबत फेरविचार करणे आवश्यक आहे. मात्र, सीमेबाबत पुनर्विचार करण्यासाठी सर्वप्रथम अभयारण्याच्या आसपासच्या परिक्षेत्रातील महत्त्वाच्या सागरी जैवविविधता जागांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा जागांचा शोध घेण्यासंदर्भातील विचारणा 'मॅंग्रोव्ह सेल'ने ४ जुलै रोजी 'डब्लूआयआय'ला केली होती. त्यावर उत्तर देताना 'डब्लूआयआय'ने २५ सप्टेंबर रोजी या जागांच्या शोधासंदर्भातील प्रस्ताव 'मॅंग्रोव्ह सेल'ला पाठवला आहे. 
 
 
मालवण सागरी अभयारण्याच्या आसपासच्या परिक्षेत्रातील महत्त्वाच्या सागरी जैवविविधता जागांचा शोध घेण्यासंदर्भातील प्रस्ताव 'डब्लूआयआय'कडून आम्हाला प्राप्त झाला आहे. या अभ्यासासाठी ४० लाखांचा खर्च अपेक्षित असून जानेवारी, २०२१ ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत हा अभ्यास करण्यात येईल. या प्रस्तावाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. शिवाय या अभ्यासामुळे अभयारण्याच्या आसपासच्या क्षेत्रात असणाऱ्या प्रवाळ खडाकांसारख्या महत्त्वाच्या जांगाचा उलगडा होईल. या अभ्यासाच्या आधारावरच अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार होईल. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मॅंग्रोव्ह सेल
 
 
'ईएसए'विषयी मुख्यमंत्र्यांकडे बैठक
'मालवण सागरी अभयारण्या'चे 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र' (ईएसए) अजूनही निश्चित झालेले नाही. या क्षेत्राच्या संदर्भात स्थानिकांचे काही आक्षेप आहेत. या आक्षेपांविषयी लवकरच मुख्यमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर अभयारण्याचे 'ईएसए' क्षेत्र ठरविण्यात येईल.
 
@@AUTHORINFO_V1@@