हिंदू संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन - सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

Mohan Bhagvat_1 &nbs
 
पुणे : “दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शन देखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताद्बी समारोह समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दत्तोपंत ठेंगडी यांच्या दृष्टीतून सामाजिक समरसता’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. भागवत बोलत होते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, चिंतक आणि भारतीय मजदूर संघाचे संस्थापक महामंत्री दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज (दि. १४ ऑक्टोबर) त्यांच्या स्मृतिदिनी टिळक रोड वरील गोळवलकर शाळेच्या गणेश सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समारोह समितीचे राष्ट्रीय सदस्य गोविंददेव गिरी महाराज होते. समितीचे संयोजक रवींद्र देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
डॉ. भागवत पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेच्या संदर्भातील सर्व विचार दत्तोपंत ठेंगडी यांनी आत्मसात केले होते. एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा निकटचा सहवास होता. या महनीय व्यक्तींचा सहवास व व्यासंगाने दत्तोपंत ठेंगडी यांची तयार झालेली व्यापक दृष्टी ही परंपरेशी अनुरूप होती आणि तीच दृष्टी संघाचीही आहे. समाजात जर उच्चनीचता असेल तर देश उभा राहू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि हे मत ते आग्रहाने मांडायचे. त्यांचा दृष्टीकोन प्रामाणिक होता, त्यामागे कोणतेही राजकीय आडाखे नव्हते. समरसतेशिवाय समता शक्य नाही, त्यासाठी बंधुभाव आवश्यक आहे. समाजात आपल्यापेक्षा मागे राहिलेल्यांना उचलून वरती घेण्यासाठी थोडे झुकावे लागते तेव्हाच समाजात समरसता निर्माण होते. समरसता हा भाषणाचा विषय नाही तर तो आपल्या कृतीतून घडवून आणण्याचा भाग आहे.
 
 
आपल्या प्राचीन विचार परंपरेत एकरसतेचा भाव आहे. त्याच्या आधारे देशाचा विकास करण्यासाठी सामाजिक समरसता साधायची आहे. हिंसेच्या मार्गाने ती कधीही साधता येत नाही. क्रांतीच्या मार्गाने समता निर्माण होत नाही, शोषण करणारा नवा वर्ग तयार होतो, परिवर्तन होत नाही. विषमता संपवण्यासाठी बंधुभाव, सकारात्मक संवाद आणि प्रबोधन हे मार्ग आहेत. समरसता हे देशासमोरचे राष्ट्रीय ध्येय राहिले पाहिजे, त्यासाठी धैर्य आणि संयमाची आवश्यकता आहे. हे सर्व करत असताना सतत सावधानता बाळगली पाहिजे, कारण देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांच्या मनात एकरसतेचा भावच नाही. त्यामुळे आपल्या देशात असलेल्या विविधतेला विषमतेचा आधार बनू देऊ नका.”
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोविंददेव गिरी महाराज आपल्या भाषणात म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार अतिशय मूलगामी होते. त्यांच्या साहित्यात ऋषीची प्रज्ञा दिसून येते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अपवाद करता असा अनुभव अन्य कोणाच्या विचारात मला अनुभवास आला नाही. दत्तोपंत ठेंगडी यांनी मांडलेला समरसतेचा विचार हा आपल्या संस्कृतीचा अविष्कार आहे. त्याच्या अंतरंगातील एकरसता ओळखून त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीच्या काळात आवश्यक असलेले सर्व निर्बंध पाळून केवळ पन्नास निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे यांनी केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@