‘टिकटॉक’ बंद करुन पाकचा चीनला ‘शॉक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

TikTok ban_1  H
 
 
 
भारताप्रमाणे पाकिस्तानला चीनच्या हेरगिरीचा फार काही धोका नाही, कारण चीन त्याच्या अंतर्गत व्यवस्थेपर्यंत सहजतेने पोहोचला आहे. मग असे कोणते कारण आहे की, पाकिस्तानने ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला?
 
 
आपला नवा मालक चीनच्या इशार्‍यावर सातत्याने नाचणार्‍या पाकिस्तानने एक असे पाऊल उचलले की, ज्यामुळे त्याला चिनी नाराजीचा सामना करावा लागू शकतो. कारण, आता पाकिस्तान चिनी स्वामित्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-‘टिकटॉक’वर बंदी घालणार्‍या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ‘टिकटॉक’वरील बंदीबाबत अनैतिक आणि अशोभनीय व्हिडिओ सामग्रीचे प्रसारण, हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. ‘पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटी’ने शुक्रवारी एक निवेदन जारी करत म्हटले की, “पाकिस्तान अनैतिक आणि अशोभनीय सामग्रीविरोधात समाजाच्या विविध घटकांतून आलेल्या तक्रारींची संख्या पाहता, ‘टिकटॉक’वर बंदी घालत आहे. सदर निवेदनात, आम्ही यापूर्वीच अशाप्रकारच्या सामग्रीबाबतच्या पाकिस्तानी तक्रारींची माहिती कंपनीला दिली होती,” असे ऑथोरिटीने म्हटले. परंतु, ‘टिकटॉक’ने आमच्या काळजीवर कोणतेही उत्तर दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
भारताने ‘टिकटॉक’, ‘बिगो’सह ५७ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले असून, त्यामागचे कारण चिनी कंपन्यांमुळे सायबर सुरक्षेबाबत निर्माण होणार्‍या समस्या असल्याचे सांगितले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, बंदीआधी ‘टिकटॉक’साठी भारत एक मोठी बाजारपेठ होती, जिथे ‘टिकटॉक’चे २० कोटींपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते होते, जी चीनबाहेर ‘टिकटॉक’ची सर्वात मोठी बाजारपेठ होती. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये ‘टिकटॉक’देखील अतिशय लोकप्रिय असून, इथेही मोठ्या प्रमाणावर ‘टिकटॉक’ वापरकर्ते आहेत. तथापि, बंदी घातली तरी ऑथोरिटी आणि ‘टिकटॉक’ची मालक कंपनी ‘बाईट डान्स’ दोघांनीही आम्ही पाकिस्तानच्या सक्षम प्राधिकार्‍यांच्या सतत संपर्कात असल्याचे मान्य केले.
 
 
उल्लेखनीय म्हणजे, आशिया खंड आणि त्याबाहेरही सार्वजनिक शालीनतेशी निगडित मुद्द्यांबाबत ‘टिकटॉक’ सरकारांच्या निशाण्यावर होते. इंडोनेशिया आणि बांगलादेशमध्ये ‘टिकटॉक’ला बंदीचा सामना करावा लागला. ‘टिकटॉक’ला मिळणार्‍या महसुलाचे प्रमुख केंद्र असलेल्या अमेरिकेसह अन्य देशांतही चिनी सरकारच्या फायद्यासाठी माहितीची चोरी आणि गोपनीयतेशी निगडित प्रकरणांमुळे ‘टिकटॉक’वर बंदीचे संकट घोंगावत आहे.
 
 
‘टिकटॉक’ची परस्परविरोधी बाजू
 
 
‘कोविड-१९’सारख्या आपत्तीनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असून ‘टिकटॉक’सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मात्र सातत्याने वाढ होत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये जवळपास दोन कोटी सक्रिय ‘टिकटॉक’ वापरकर्ते होते, जे वैयक्तिक, समाज, राजकारण आणि दैनंदिन जीवन, चित्रपट, संगीत, नृत्य इत्यादीशी निगडित सामग्रीची निर्मिती करत होते. यापैकी अनेकांसाठी ‘टिकटॉक’ची आर्थिक बाजू महत्त्वाची होती, कारण हा त्यांच्या उत्पन्नाचा एक मार्ग झाला होता.
 
दुसरीकडे पाकिस्तानसारख्या रूढीवादी आणि कट्टरपंथी देशात ‘टिकटॉक’ सुरू राहणे मुश्कील ठरत होते. इथल्या रूढीवादी मुस्लिमांनी ‘टिकटॉक’ इस्लाम आणि इस्लामवर आधारित सामाजिक निकषांच्या विपरीत असल्याचे म्हटले. पंतप्रधान इमरान खान स्वतः कट्टरपंथी विचारांमुळे ‘तालिबान खान’ नावाने प्रसिद्ध असून त्यांनीही सार्वजनिकरीत्या ‘टिकटॉक’वर अश्लीलता वाढवणारे म्हणून टीका केली होती.
 
यापूर्वीची उदाहरणे
 
हे काही पहिलेच उदाहरण नाही की, पाकिस्तानमध्ये इंटरनेट प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारची बंदी घालण्यात आली. पाकिस्तानमध्ये आपत्तीजनक सामग्रीवर कठोर कायद्यांद्वारे बंदी घातली गेलेली आहे. ‘युट्यूब’ एक असाच प्लॅटफॉर्म आहे, ज्याला आतापर्यंत अशाप्रकारच्या कारवायांचे नुकसान सोसावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, सप्टेंबर २०१२ पासून जानेवारी २०१६ दरम्यान तीन वर्षांहून अधिक काळापर्यंत पाकिस्तानात ‘युट्यूब’वर बंदी घातलेली होती. नंतर ‘युट्यूब’ची पाकिस्तानी आवृत्ती सुरू केली गेली व ते तिथे सुरू झाले. मात्र, यातही सरकारला जी कोणती सामग्री आक्रमक वाटते, ती हटविण्याचे अधिकार आहेत. यंदाच्या ऑगस्टमध्येही पाकिस्तानी दूरसंचार नियामकांनी ‘युट्यूब’ला देशात अश्लील, अनैतिक, नग्न आणि असभ्य भाषेला तत्काळ ब्लॉक करण्यासाठी सांगितले होते. सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानने ‘टिंडर’ आणि ‘ग्राईंडर’ या डेटिंग अ‍ॅप्सवरदेखील अश्लील आणि अशोभनीय ठरवत बंदी घातली होती.
 
बंदी का?
 
असे नव्हे की, पाकिस्तानने ‘टिकटॉक’वर बंदी घालण्यामागचे अश्लीलता हेच एकमेव कारण आहे. पाकिस्तानमध्ये ‘टिकटॉक’पेक्षाही अधिक अश्लील सामग्री पसरवणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपस्थित आहेत. दुसरीकडे भारताप्रमाणे पाकिस्तानला चीनच्या हेरगिरीचा फार काही धोका नाही, कारण चीन त्याच्या अंतर्गत व्यवस्थेपर्यंत सहजतेने पोहोचला आहे. मग असे कोणते कारण आहे की, पाकिस्तानने ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला?
 
 
उल्लेखनीय म्हणजे, ‘कोविड-१९’मुळे गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे. गरिबी, बेरोजगारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भूकबळींच्या संख्येने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. परिणामी, पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या तुलनेत भुकेपायी अनेकांचा मृत्यू झाल्याची शंका आहे. अशा स्थितीत पाकिस्तानमध्ये सरकारविरोधात व्यापक जनअसंतोष आहे आणि तो ‘टिकटॉक’च्या माध्यमातून अभिव्यक्त होत होता, बाहेर पडत होता. त्यांच्या निशाण्यावर इमरान सरकार आणि पाकिस्तानची सर्वशक्तिमान सेनादेखील होती. याबाबत ‘द फ्रायडे टाईम्स’चे संपादक आणि प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार नजम सेठी यांचे ट्विट महत्त्वाचे ठरते. ते म्हणाले, “पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने ‘टिकटॉक’ला अनैतिक सामग्रीमुळे बंद केले नाही, तर ‘टिकटॉक’द्वारे महान नेत्याची खिल्ली उडवली जात होती म्हणून बंद केले.”
 
दरम्यान, ‘टिकटॉक’वरील बंदीने इमरान खान यांच्यासह ‘डीप स्टेट’ला दिलासा मिळाला असून, कट्टरपंथीयांच्या हातीही एक लॉलिपॉप दिले, ज्यामुळे त्यांनी इस्लामला संकटात टाकणार्‍या तत्त्वाच्या समाप्तीवर आणि या कार्यातील आपल्या यशावर जल्लोष साजरा करणे सुरू केले. तसेच यामुळे इमरान खान यांना आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात कठोरतेने वागण्याची खुली सूटही मिळाली. पाकिस्तान सरकारने हा निर्णय जगभरात अंतर्गत सुरक्षा आणि गोपनीयतेला कायम ठेवण्यासाठी चिनी उपकरणांविरोधात विविध देश एकजूट होत असताना घेतला. पाकिस्तान चीनचे एक घोषित प्यादे आहे आणि चीनच्या हेरगिरी तंत्रापासून वाचविण्यासारखे त्याच्याकडे फार काही नसेलही. सध्या पाकिस्तान सरकार आपल्याच देशात आपली विश्वसनीयता गमावत चालले आहे आणि त्याच्याविरोधातील आवाज बुलंद होत आहे. अशा स्थितीत आपल्या पायाखालून सरकणारी जमीन वाचविण्यासाठी शक्य तो प्रयत्न इमरान खान व त्यांचे सरकार करत आहे. तसेच ‘टिकटॉक’वरील बंदी पाकिस्तानी शासकांच्या नाराजीची परिचायक आहे.
 
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@