निर्मोही भक्तिदर्शक संत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020   
Total Views |

Maharaj_1  H x
 
 
साधी राहणी, नम्र आचरण आणि नित्य नियम याद्वारे गुरुभक्तीत लीन असणारे प. पू. माधवगिरीजी महाराज यांच्याविषयी...
 
 
महाराष्ट्राला साधू, संत, महंत यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. राज्यात संतांच्या हितोपदेशाने सामाजिक व्यवस्था सुधारण्यात मोलाचे योगदान आजवर दिले आहे. हे आपण सर्वजण जाणतोच. संतांची शिकवण ही व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांच्यासाठी मोक्षाचे द्वार खुले करण्याबरोबरच आत्मीय सुखाची आनंदानुभूती देणारी ठरत असते. श्रमदानाच्या माध्यमातूनदेखील ईश्वराची भक्ती करता येते. नित्य नियम हाच खर्‍या साधनेचा अलंकार आहे. अशी शिकवण देणारे एक संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांचे नाव राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज. नाशिक, खानदेश, नगर जिल्हा, मराठवाडा आदी भागात जनार्दन स्वामी यांचे करोडो अनुयायी आहेत. जनार्दन स्वामी यांनी समाधी घेतल्यावर त्यांची शिकवण जनमानसात रुजविण्याचे महत्तम कार्य त्यांचे शिष्य प. पू. माधवगिरीजी महाराज अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत आहे. संन्यस्थजीवन व्यतीत करण्याकामी आवश्यक असणार्‍या सर्व दीक्षा माधवगिरीजी महाराज यांनी घेतल्या आहेत. २००७ सालापासून त्यांनी मौनव्रत धारण केले असून, केवळ प्रदोषकाळात ते प्रवचनाच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विवेचन सादर करत असतात.
 
 
आजच्या आधुनिक युगात संत म्हटले की, लोकांच्या मनात पहिल्यांदा संशयाची पाल चुकचुकल्या खेरीज राहत नाही. तथाकथित संतांनी केलेले कृत्य हे त्यास कारणीभूत असते. मात्र, आपल्या गुरूवर अपार निष्ठा असणारे, ‘मी जो काही आहे, ते केवळ माझ्या गुरूचे देणे आहे’ अशी प्रांजळ भावना मनी बाळगून भक्तगणांशी संवाद साधणारे निर्मोही भक्त असलेले संत अशीच माधवगिरीजी महाराज यांची ओळख. गुरूच्या पश्चात स्वतःची गादी निर्माण करणारे आणि स्वतःकडे गुरुपद घेणारे स्वयंघोषित संत आजवर अनेकदा समाजात दिसून येतात. मात्र, ‘संपूर्ण शिष्य परिवार हा माझा नसून, तो माझे गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचाच आहे,’ अशी धारणा आणि ठाम भूमिका माधवगिरीजी महाराज यांची आहे. ‘महाराज’ ही उपाधी देणे किंवा तसे संबोधणेदेखील त्यांना फारसे रुचत नाही. वयाने मोठे असल्याने ‘माधवबाबा’ म्हणून जरी संबोधले तरी चालेल, असा आग्रह ते कायम धरतात. भक्तीचा खरा मार्ग कोणता, हे सांगताना ते सांगतात की, “नित्य नियम हाच खर्‍या भक्तीचा मार्ग आहे. नित्य नियमाने पूजाविधी, स्तोत्र, मंत्र यांचा जप केल्यास याद्वारे ईश्वरी आराधना केल्यास निश्चितच ईश्वरभक्ती होत असते.”
 
 
 
एखाद्या विशिष्ठ संप्रदायात किंवा आश्रमात गेल्यावर तेथील देवाचे नामस्मरण करावे, अशी साधारण अपेक्षा बाळगली जाते. मात्र, जनार्दन स्वामी यांच्या शिकवणुकीनुसार त्यांच्या आश्रमात भक्त त्याला हवे त्या देवाची, मंत्राची उपासना करू शकतो, हे विशेष. ईश्वर एक आहे आणि तो सर्वत्र आहे, या एकाच विचारावर येथे भक्तिमार्गाचा पथ प्रशस्त केला जातो. त्यामुळे येथे येणारा साधक हा विनापाश आपली भक्ती करू शकतो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा भक्तगण तसा समाजातील मध्यमवर्गीय किंवा निम्नमध्यमवर्गीय असलेला. भक्तिसाधनेत दानाचेही महत्त्व आहेच. मात्र, द्रव्यरूपी दान या वर्गास प्रत्येक वेळी करता येईल असे नाही. मनातील भाव हा ईश्वरी भक्तीचा असला की, तो साकारण्यासाठी मार्ग आपोआप तयार होत असतोच. त्यामुळे जनार्दन स्वामी महाराज यांनी आपल्या भक्तगणांसाठी श्रमदानाचा पर्याय अनुसरला. भक्तांच्या श्रमदानातून अनेकविध शिव मंदिरांचे निर्माण व जीर्णोद्धार हा करण्यात आला आहे. शिवपंथाची महती वाढविण्याचे काम माधवगिरीजी महाराज आजही अहोरात्र करत आहेत.
 
 
 
लाल रंगाची एक छोटी सायकल, पत्र्याचे आच्छादन असलेली कुटीया, बारदानाचे आसन, जेवणास केवळ फलाहार तोही थोडाच, फलाहाराचे पाच हिस्से त्यातील एक लहान हिस्सा स्वतःला, असे जीवनमान माधवगिरीजी महराज व्यतीत करत आहेत. पदव्युत्तर पदवी प्राप्त करूनही केवळ गुरूच्या आदेशाने ते अध्यात्मात रमले. सरकारी अधिकारी पदाची नोकरी चालून आलेली असतानादेखील ‘भक्त’ या उपाधीत रममाण होण्यास माधवगिरीजी महाराज यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटले. जनार्दन स्वामी महाराज यांनी दीन बालकांसाठी वसतिगृहे काढून त्यांना शिक्षण देण्याचे धोरण अनुसरले होते. आजही ते कार्य माधवगिरीजी महाराज व जनार्दन स्वामी यांचे इतर संत शिष्यगण यांच्या माध्यमातून त्याच निष्ठेने पार पाडले जात आहे. विज्ञान आणि अध्यात्म या दोहांचे अस्तित्व माधवगिरीजी महाराज मान्य करतात. साधना आणि खडतर भक्ती हेच ईश्वरप्राप्तीचे मार्ग आहेत. आजवर होऊन गेलेल्या संतांनी अनेकविध हालअपेष्टा भोगल्या आहेत. मात्र, त्यांनी आपल्यातील मातृभाव, कणव, मायाळूवृत्ती आणि क्षमाभाव कधीही कमी होऊ दिला नाही. षड्रिपूंवर विजय प्राप्त करणे हेच संतांचे लक्षण आहे, अशी धारणा असणारे माधवगिरीजी महाराज हे अधिकमासानिमित्त थोर संतांचे चरित्र भक्तांसमोर प्रवचनाच्या माध्यमातून मांडत आहेत. ‘मी’ पणाला तिलांजली देऊन संतपदावर आरूढ असणारे, ‘शंकराचार्य पुरस्कारा’ने सन्मानित भक्त प.पू. माधवगिरीजी महाराज यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नमन.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@