स्मरण ईश्वराचे व स्वकर्मांचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

Human_1  H x W:
 
 
माणूस म्हणजे केवळ शरीर किंवा केवळ आत्मा नव्हे, तर शरीर व आत्मा या दोन्हींचा संघात म्हणजे मानव होय. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, प्राण, पाच महाभूते ही १६ तत्त्वे आणि स्वत: आत्मा यांचा समूह यांना ‘मानव’ म्हणतात. मानवाने आध्यात्मिक ज्ञानाच्या साहाय्याने जीवात्म्याला या १६ तत्त्वांपासून काही काळ वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. ही अनुभूती त्याला आध्यात्मिक शांततेकडे व समाधी सुखाकडे नेण्यास साहाय्यक ठरेल.
 
 
वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तँ शरीरम्।
ओ3म् क्रतो स्मर क्लिबे स्मर कृतं स्मर॥
 
(यजुर्वेद-४०/१५)
 
अन्वयार्थ
 
(वायु:) जीवात्मा हा (अनिलम्) अपार्थिव किं अभौतिक आणि (अमृतम्) अमर आहे. (अथ) तर (इदं शरीरम्) हे शरीर (भस्मान्तम्) भस्म होणारे - जळून जाणारे आहे. म्हणून हे (क्रतो) क्रियाशील माणसा! (ओ3म् स्मर) परमेश्वराचे स्मरण कर. (क्लिबे) स्वत:चे सामर्थ्य वाढविण्याकरिता आणि लोकांच्या भल्याकरिता ईश्वराचे (स्मर) स्मरण कर. (कृतम्) आपल्या केलेल्या कर्माचे (स्मर) स्मरण कर..!
 
विवेचन
 
अनादी काळापासून जीवात्म्याची यात्रा सुरु आहे. विविध प्राण्यांची शरीरे धारण करून त्रिविध दु:खांचे, षड्रिपूंचे आणि आपल्या दुष्कर्मांचे ओझे वाहतोय. या जन्मातून त्या जन्मात किंवा या शरीरातून त्या शरीरात प्रविष्ट होऊन आपला प्रवास करतोय. आद्य शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे - ‘पुनरपि जननं पुनरपिमरणं, पुनरपि जननीजठरे शयनम्।’ पण, असंख्य जन्मांच्या पुण्याईने हा अमूल्य असा नरदेह लाभूनदेखील भौतिक सुखात रममाण होत, कर्मबंधनात इतका गुंतून जातो की, त्याला जीवनाची खरी व्याख्या कळतच नाही. जेव्हा वार्धक्यावस्थेत मृत्यू दारावर उभा राहतो, तेव्हा त्याला अध्यात्माकडे वळावेसे वाटते. देव, धर्म, भक्ती, उपासना, तीर्थाटन या गोष्टी आठवतात. त्यावेळी काहीच उपयोग होत नाही. कारण, शरीर थकलेले असते व इंद्रिये शिथील झालेली असतात, मनाची वृत्ती इतकी ताठर झालेली असते की त्याला आध्यात्मिक आणि धार्मिक मार्गाकडे जाऊच देत नाहीत. त्यातच शोकांतिका ही की, समजा प्रयत्न आणि वैराग्य वृत्तीने माया-मोहातून काढता पाय घेता आला आणि त्याची इच्छा धार्मिकतेकडे वळण्याची झाली, तर त्यासाठी यथार्थ अध्यात्म, खरा देव, खरी भक्ती, वास्तविक उपासना इत्यादींचा चोखंदळ मार्ग त्याच्यासमोर आहे तरी कुठे? भगवंताचे वेद प्रतिपादित सत्यस्वरूप न समजल्याने, किंबहुना परमार्थाची खरी वाट न सापडल्याने तो दिग्भ्रमित होतो. त्यामुळे एखादा भला, श्रद्धाळू माणूसदेखील भक्ती व अध्यात्माच्या नावावर चालणार्‍या अवडंबरांना बळी पडून अनिष्ट मार्गाकडे वळतो...! त्यामुळे ‘किं करोमि.. कुत्र गच्छामि।’ अशी त्यांची अवस्था होते. मंत्रात ईश्वराचे मुख्य निजनाम ‘ओ3म्’ चे स्मरण करण्याचा आणि आपल्या सत्कर्मांची आठवण ठेवत जगण्याचा उपदेश मिळतो.
 
 
जीवात्मा आणि शरीर काय आहे, यांचे वास्तविक दिग्दर्शन या मंत्रात प्रारंभी झाले आहे. माया-मोहाच्या या दुनियेत मानव आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती (मोक्षलाभ) विसरतो. पण, त्याचे हे विस्मरण त्याला खरा शाश्वत आनंद देऊ शकत नाही. शरीराच्या साहाय्याने जीवात्म्याला वरील उद्दिष्ट गाठावयाचे आहे. शेवटी तेच त्याचे विश्रांती स्थान आहे. पहिल्या चरणात ‘वायु अनिलम्, अमृतंम् च अस्ति।’ (वायू- जीवात्मा हा अनिल व अमृत आहे) आणि ‘इदं शरीरं भस्मांतम् अस्ति।’ (हे शरीर भस्मिभूत होणारे आहे) अशी स्वतंत्र दोन वाक्ये तयार होतात. प्रचलित व्यवहार भाषेत वार्‍यासाठी ‘वायू’ म्हटले जाते. ‘वा’ या गत्यर्थक धातूपासून ‘वायू’ शब्द बनतो. जशी वार्‍याची गती तशीच जीवात्म्याचीदेखील गती असते. म्हणूनच सदरील मंत्रात सुरुवातीला आलेला ‘वायू’ हा शब्द जीवात्म्यासाठी आला आहे. माणूस म्हणजे केवळ शरीर किंवा केवळ आत्मा नव्हे, तर शरीर व आत्मा या दोन्हींचा संघात म्हणजे मानव होय. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, प्राण, पाच महाभूते ही १६ तत्त्वे आणि स्वत: आत्मा यांचा समूह यांना ‘मानव’ म्हणतात. मानवाने आध्यात्मिक ज्ञानाच्या साहाय्याने जीवात्म्याला या १६ तत्त्वांपासून काही काळ वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. ही अनुभूती त्याला आध्यात्मिक शांततेकडे व समाधी सुखाकडे नेण्यास साहाय्यक ठरेल.
 
 
पण, जगाची मात्र विचित्र अशी अज्ञानी परंपरा सुरु आहे. माया-मोह, प्रापंचिक समस्या यात गुंतून गेलेले बहुसंख्य लोक आत्म्याला शरीरापासून वेगळे मानावयास तयारच नाहीत. शरीर म्हणजेच सर्व काही, अशीच सर्वांची धारणा, मग ते आस्तिक असोत की नास्तिक! ज्यावेळी माणूस आध्यात्मिक ज्ञानाच्या योगाने ‘आत्मा हा चेतन, शाश्वत, बलवान, पवित्र, शुद्ध व कर्मनिष्ठ आहे आणि शरीर हे जड, अशाश्वत, बलहीन, अपवित्र, अशुद्ध आहे,’ असे समजून दोघांचेही अस्तित्त्व वेगळे समजेल आणि आत्म्याप्रमाणे मन व इंद्रियांना चालवेल, त्या दिवशी खर्‍या अर्थाने त्याला आत्मबोध होईल. तो आध्यात्मिक प्रगती करण्यास समर्थ ठरेल. ‘वायू’ म्हणजे शरीरात विद्यमान असलेला धनंजय नावाचा वायू! जो की कारणरूप सूक्ष्मवायूच्या अधीन आहे आणि हा सूक्ष्म वायूसुद्धा नाशरहित अशा कारणस्वरूपीच प्रकृतीच्या आश्रयाला आहे. शरीरापासून आत्मा हा वेगळा आहे. ही भावना याच वायूवर आश्रित आहे... असा हा वायुरूप जीवात्मा ‘अनिलम्’ म्हणजेच ‘अन् इलम्’ होय. ‘इल’मध्ये ‘इला’ किंवा ‘इडा’ शब्द दडला आहे. ‘इला’ शब्दाचा अर्थ पृथ्वी होतो, जी की जड असते. जे जड नाही, म्हणजे अपार्थिव असते, तो ‘आत्मा’ होय. हा अमृत म्हणजे कधीच मरत नाही... जळून भस्मिभूत होत नाही...! याउलट शरीराचे आहे, जे जळून खाक होणारे आहे. हाच दृष्टिकोन योगेश्वर श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात विशद केला आहे-
 
 
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारूत:॥
 
 
शरीराचा शेवट भस्मिभूत होण्यात आहे. मग मानवाने शरीराच्या रक्षणासोबतच आत्म्याच्याही रक्षणाचा अधिक विचार करावा. जळून खाक होणार्‍या शरीराची चिंता करण्यापेक्षा चेतन व भस्मविहीन अशा आत्मतत्त्वाची अधिक काळजी घ्यावी! हे प्रकृती व आत्मतत्त्वाचे वेगळेपण जाणण्यासाठीच तर पवित्र असे मानव जीवन लाभले आहे. दुसर्‍या चरणात मानवाकरिता ‘क्रतो!’ हे संबोधन आले आहे. जो क्रियाशील, कर्मप्रवीण, पुरुषार्थी असतो तो क्रतु! ज्याच्यामध्ये आळस, प्रमाद, निष्क्रियता कदापी नसते, तो क्रतु असतो, म्हणजेच जीवात्मा! यासाठीच त्याला उद्देशून म्हटले आहे - हे क्रतो! हे कर्मनिष्ठ जीवात्म्या! तू सदैव ‘ओ3म’ ईश्वराच्या मुख्य नावाचे स्मरण कर. कशासाठी? तर दोन प्रकारची उद्दिष्टे साधण्यासाठी. यासाठीच ‘क्लिब’ हा शब्द आला आहे. ‘क्लिबे’ म्हणजे एक तर स्वत:चे सामर्थ्य वाढविण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोककल्याणासाठी...! स्वत:मध्ये जेव्हा सामर्थ्य व बळ येईल, तेव्हा जगाचे खरोखरच कल्याण होईल, भले होईल! त्याबरोबरच आजपर्यंत तू जे काही कर्म केले आहेत, त्याला आठव, चांगली पुण्य कामे केली असतील, तर ती आठवून पुन्हा नव्या उत्साहाने शुभकर्मांस तत्पर हो! आणि जर काय वाईट कामे झाली असतील, तर प्रायश्चित घेत, पश्चाताप करीत यापुढे पुण्यकर्मांचा संचय करण्याचा पवित्र संकल्प कर आणि तितक्याच शक्तीने कामाला लाग. ईश्वरीय वेदाज्ञेतील या विशेष मौलिक संबोधनातच तर मानवाचे सर्वहित सामावले आहे...!
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
@@AUTHORINFO_V1@@