आत्मवस्तूकडून समाधानाकडे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

suresh jakhadi_1 &nb
 
 
 
‘आत्मज्ञान’ खरे नाही असे जे म्हणतात, त्यांचे पारमार्थिक अध:पतन होणार असे खुशाल समजावे. बुद्धिहीन, विचारहीन माणसांना हे कळत नाही. आत्मज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार ही अवस्था इतकी तरल असते की, तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही. पण, ती समाधानाची अवस्था असते.
 
 
आत्मवस्तू किंवा ब्रह्मवस्तू हे आपलेच स्वरुप असल्याने ते नित्यप्राप्त आहे. त्यामुळे ते वेगळेपणाने पाहता येत नाही. आत्मवस्तूला आपल्या समोर आणून पाहायचे ठरवले तर आपण कोण आणि पाहणारा कोण, याचा निर्णय न झाल्याने चमत्कारिक स्थिती उद्भवते. या सर्व गोंधळात आत्मवस्तू किंवा ब्रह्मवस्तू अस्तित्वात नसावी, असे मानण्यापर्यंत मनाची मजल गेलेली असते. अशा प्रसंगी, ‘लटिकेचि काय पाहावे’ असा मनाचा कल असतो. ब्रह्मवस्तू लटिकी म्हणजे बनावट खोटी आहे का? आणि आत्मदर्शन व आत्मसाक्षात्कार कसा होऊ शकतो, या विषयावर दासबोधात समर्थांनी चर्चा केलेली दिसून येते. शिष्यांच्या मनातील आत्मज्ञानासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी समर्थ दासबोधात तर्कशुद्ध पद्धतीने शिष्यांच्या मनातील संशय काढून टाकतात. एखादे विधान खरे की खोटे, हे ठरवण्याची एक तर्कशास्त्रीय पद्धत आहे. ती समजली म्हणजे, समर्थांच्या तर्कशुद्ध विचार पद्धतीचा अर्थ समजतो. तर्कशास्त्र पद्धतीत दिलेले विधान खरे की खोटे ठरवण्यासाठी प्रथम ते विधान खरे आहे, असे ग्रहित धरून पुढील तपास करतात. त्यानंतर त्या विधानाची अनुकूल आणि प्रतिकूल (Pros and cons) करणे वेगळी मांडून ती तपासतात. अनुकूल कारण सत्य आहे अशी प्रचिती आली, तर गृहित विधान खोटे ठरवता येते. तसेच प्रतिकूल कारण सत्य आहे, असे निदर्शनास आले तर गृहित विधान त्याच्या उलट म्हणजे खोटे ठरते. थोडक्यात, अनुकूल विधानाची सत्यासत्यता तसेच प्रतिकूल विधानांची सत्यासत्यता यावर गृहित विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहता येते.
 
 
 
आता प्रस्तुत विषयात ‘आत्मवस्तू लटिकी आहे’ या विधानात आत्मवस्तूचा अभाव गृहित धरलेला असतो. या विधानातील आत्मवस्तूचा अभाव हे वेद-उपनिषदे आणि व्यासादिक ब्रह्मऋषींचे अध्यात्म ग्रंथ यांना मान्य नाही. त्या सर्व ठिकाणी आत्मवस्तू खरी आहे, असे प्रतिपादन केलेले आढळते. जर आपण आत्मवस्तू लटिकी म्हणजे खोटी आहे, असे मानले तर ज्ञानभंडार असे वेदादी अध्यात्मग्रंथ, तसेच व्यासांसारख्या प्रज्ञावान ब्रह्मर्षिंनी सांगितलेले अद्वैतपर आत्मज्ञान खोटे ठरण्याची वेळ येते. पण, तसे करता येत नाही. आपण त्या ग्रंथांतील अध्यात्मज्ञान खोटे ठरवू शकत नाही. त्यामुळे ‘आत्मवस्तू खरी नाही’ या गृहित विधानाला बाधा येते. समर्थांनी अशाच तर्कशास्त्रीय पद्धतीने हे समजून दिले आहे.
 
 
अभावचि म्हणो सत्य। तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य।
आणि व्यासादिकांचे कृत्य। वाऊगे नव्हे॥
म्हणोनि मिथ्या म्हणता नये। बहुत ज्ञानाचे उपाये।
बहुतीं निर्मिलें ते काये। मिथ्या म्हणावे॥ (७.७.३१ व ३२)
 
 
महान ब्रह्मज्ञानी ऋषींनी परिश्रमाने निर्माण केलेले अद्वैत ग्रंथभांडार खोटे कसे म्हणता येईल? ते निश्चितपणे खरे असून, त्याची चर्चा दासबोधात ठिकठिकाणी केली आहे. दासबोध ग्रंथ लिहिताना समर्थांनी कोणत्या आध्यात्मिक व पारमार्थिक ग्रंथांचा मागोवा घेतला, त्यांचा उल्लेख दासबोधाच्या प्रास्ताविक समासात स्वामींनी केला आहे. त्यात उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, वेद यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या ग्रंथांची शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती यावर दासबोधातील विचार मांडले आहेत, असे स्वामी म्हणतात. तसेच
 
 
शिवगीता रामगीता। हंसगीता पांडवगीता।
उत्तरगीता अवधूतगीता। वेद आणि वेदान्त॥१.१.१८ 
भगवद्गीता ब्रह्मगीता। हंसगीता पांडवगीता।
गणेशगीता येमगीता। उपनिषिदे भागवत॥ १.१.१९
 
 
या ग्रंथांतील विचारांचा दासबोधात उपयोग केला आहे. परंतु, आत्मप्रचितीलाही स्थान दिले आहे. या ग्रंथनामावलीतील फक्त ‘भगवद्गीता’ ग्रंथ सर्व परिचित आहे. त्यामुळे इतर गीताग्रंथांच्या पूर्वपीठिका स्वामी पुन्हा सातव्या दशकात स्पष्ट करतात. ते गीताग्रंथ असे आहेत. शंकरांनी पार्वतीला केलेला उपदेश ‘गुरुगीते’त आहे. अवधूतांनी गोरक्षांना सांगितलेला ज्ञानमार्ग ‘अवधूतगीते’त आहे. विष्णूने राजहंसाचे रुप घेऊन ब्रह्मदेवाला उपदेश केला तो ‘हंसगीते’त ग्रंथित आहे. ब्रह्मदेवाने नारदाला ‘चतुःश्लोकी भागवत’ सांगितले. व्यासांनी त्याचा पुढे खूप विस्तार केला. वसिष्ठांनी रामाला उपदेश केला ती ‘रामगीता’ ती ‘वसिष्ठसार’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. कृष्णाने अर्जुनाला ‘सप्तश्लोकीगीता’ सांगितली. पुढे व्यासांनी त्याचा ‘भगवद्गीता’ म्हणून विस्तार करुन तिला महाभारतात समाविष्ट केले. (संदर्भ : दासबोध दशक ७ समास ७ ओवी क्र. ३३ ते ३७) आत्मज्ञान सांगणार्‍या प्रमुख आध्यात्मिक ग्रंथांचा निर्देश येथे स्वामींनी केला आहे. असे आणखी कितीतरी ग्रंथ सांगता येतील, असे स्वामी म्हणतात. त्यात सांगितले आत्मज्ञान चिरकालीन सत्य आहे, यावर स्वामींचा विश्वास आहे. स्वामी सांगतात-
 
 
ऐसे सांगावे किती। बहुत ऋषी बोलिले बहुती।
अद्वैतज्ञान आदिअंती। सत्यचि असे॥
 
 
‘आत्मज्ञान’ खरे नाही असे जे म्हणतात, त्यांचे पारमार्थिक अध:पतन होणार असे खुशाल समजावे. बुद्धिहीन, विचारहीन माणसांना हे कळत नाही. आत्मज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार ही अवस्था इतकी तरल असते की, तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही. पण, ती समाधानाची अवस्था असते. सद्गुरुंच्या मुखातून या स्थितीचा अनुभव ऐकावा आणि तसे साधन करुन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, एवढे आपण करु शकतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन याबाबतीत आपले मन संभ्रमित अवस्थेत असते. तो संभ्रम वाढवण्याचे काम देहबुद्धीत तयार झालेले मन करीत असते. देहबुद्धीमुळे आत्मज्ञान खरे असून ते खोटे ठरवले जाते आणि दृश्य जगातील मायानिर्मित इंद्रियजन्य ज्ञान खोटे असून ते खरे आहे असे वाटते. त्यामुळे मन कायम संभ्रमात राहून खर्‍या खोट्याची निश्चिती करता न आल्याने ते अज्ञानात डुबक्या घेत राहते.
 
 
मिथ्य तेचि सत्य जालें। सत्य असोन मिथ्य केलें।
संदेहसागरी बुडालें। अकस्मात मन॥
 
 
आत्मवस्तू जाणण्याच्या आड येणारे आपलेच मन असते. मनातील ‘मी पणा’ अहंभाव अर्थात अहंकार हे त्याला कारण असतात, ‘मीपणा’ कल्पनांचे जाळे विणीत असते. त्यातून अहंभावाचा ताठा निर्माण होतो. आत्मज्ञानासाठी ‘मीपणा’चा ताठा समूळ मोडून टाकावा, तरच आपण परामात्म स्वरुपाशी जोडले जाऊ. सज्जनांच्या संगतीने मनाच्या संशय घेण्याच्या वृत्तीला आळा बसतो. ‘मीपणा’ कमी होतो. ‘मीपणा’ प्रपंचातही अनेक दुष्परिणाम घडवतो. ‘मीपणा’ने प्रपंच धड होत नाही आणि परमार्थ तर हमखास बुडतोच. ‘मीपणा’ व अहंभावाने यश, कीर्ती, प्रताप सारे धुळीला मिळतात. मैत्रीतील स्नेह, कुटुंबातील आपलेपणा प्रेम, तसेच प्रापंचिक जीवनातील अनेक क्षेत्रात अहंभाव भांडणे लावून देऊन सारे उद्ध्वस्त करतो. अहंकार सार्‍यांचा विध्वंस घडवून आणतो. ‘मीपणा’ हा कोणालाच आवडत नाही, मग भगवंताला तो कसा चालेल? यासाठी ‘मीपणा’चा अहंंकाराचा त्याग केल्याशिवाय आत्मदर्शन, ईश्वरदर्शन होणार नाही. जोपर्यंत आत्मदर्शन नाही, तोपर्यंत खरे समाधान अनुभवता येत नाही, ‘मीपणा’ला सोडून राहतो तो खरा समाधानी असे स्वामींचे मत आहे.
 
 
मीपण कोणासिच न साहे। तें भगवंती कैसेनि साहे।
म्हणौनि मीपण सांडून राहे। तोचि समाधानी॥
 
 
‘मीपणा’ नीट समजून घेऊन विवेकाने त्याचा त्याग केल्यावर ब्रह्माशी एकरुप होऊन खर्‍या समाधानाकडे जाता येते.
 
 
मीपण जाणोनि त्यागावें। ब्रह्म होऊन अनुभवावे।
समाधान ते पावावें। नि:संगपणे॥
 
 
- सुरेश जाखडी
 
 
@@AUTHORINFO_V1@@