'सेक्युलर' आघाडीमुळे शिवसेना 'धर्म' संकटात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2020
Total Views |
Uddhav Thackeray_1 &
 
 
 
 
मुंबई : राज्यात बिअर बार, हॉटेल्स, सिनेमागृह, रेस्ट्रोरंट सुरू आणि देऊळे बंद का, असा सवाल करत महाराष्ट्र भाजपने उपोषण आंदोलन सुरू केले आहे. सरकार विरोधात मंगळवार सकाळपासून 'मंदिरे बंद उघडले बार उद्धवा धुंद झाला तुझा दरबार', अशी घोषणा देत भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शिर्डी येथे आंदोलनाची सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन सेक्युलर पक्षांच्या मैत्रीमुळेच हा आडकाठी घालण्याचा निर्णय घेत आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. 
 
 
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी शिर्डीतील आंदोलन स्थळी सहभाग घेऊन सरकारच्या कारभाराविरोधात ताशेरे ओढले. राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणी करिता आध्यात्मिक समन्वय आघाडी अधिक कृ. एकादशी दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्रातील विविध संप्रदायाचे प्रमुख, साधु-संत, महंत, धर्माचार्यांसह अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना त्याचबरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले घटक आणि भाविक भक्त यांचा अंत सरकारने पाहू नये, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे. केंद्र सरकारने देऊळे खुली करण्यास परवानगी दिली आहे मग ठाकरे सरकार ही अडवणूक का करत आहे, असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.
 
 
 
प्रवीण दरेकर यांना घेतले ताब्यात
 
 
विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जमलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. भाजप कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर आरत्या व भजने म्हणत उद्धव ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. पोलीसांशी झालेल्या बाचाबाचीनंतर दरेकर व लाड यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे कारण देत पोलीसांनी हस्तक्षेप केला.
 
 
 
राज्यपाल-ठाकरे सामना
 
दरम्यान, याच वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करावीत, असे सांगितले. सोबतच शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमीकेचीही त्यांनी आठवण करून देत त्यांना खरमरीत पत्र लिहीले. मात्र, पत्र वाचून नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर देत आम्हाला हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले.
 
 
 
राज्यपाल पद सेक्युलर रहावं - राऊत
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया देत शिवसेनेची भूमिका मांडली. राज्यपालांनी या प्रकरणी आम्हाला लॉकडाऊनबद्दल सांगू नये, त्यांनी घटनेप्रमाणे राज्य चालते आहे कि नाही यावर लक्ष ठेवावे. हिंदुत्व म्हणजे काय ते आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असे राऊतांनी म्हणत पलटवार केला.
 
 
 
शिवसेनेने उकरुन काढला नवा वाद !
 
राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारे उत्तर देऊन शिवसेनेने पुन्हा एकदा 'धर्म'युद्ध सुरू केले. मंदिराच्या मागणीवरून केलेल्या पत्राला अशाप्रकारे उत्तर देण्याची गरज नव्हती. राज्यपालांची मार्गदर्शकाच्या भूमीकेतून हे मत नोंदवले आहे, त्याप्रमाणे सबुरीने घेण्याचा सल्ला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
 
 
प्रकाश आंबेडकर म्हणतात...
 
 
राज्यपाल हे एक सन्मानपूर्वक पद आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अशाप्रकारे उत्तर देणे योग्य नाही. मंदिरे सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली असेल पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना अशाप्रकारे उत्तर देणे हेदेखील चुकीचे आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिरे खुली करण्यास मुख्यमंत्र्यांना अडचणी काय येत आहेत, हे देखील जनतेला सांगणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.







@@AUTHORINFO_V1@@