मेट्रो कारशेड हलविण्याचा अट्टाहास आणि त्याची फलश्रुती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2020
Total Views |

Metro_1  H x W: 
 
 
 
महाविकास आघाडी सरकारने आरेचे कारशेड कांजुरमार्गला हलविण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला, याचे मुंबईकरांवर काय दूरगामी घातक परिणाम होऊ शकतात आणि या निर्णयामागची पार्श्वभूमी व त्याची फलश्रुती काय असेल, याचा ऊहापोह करणे आवश्यक ठरते.
 
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि त्यात आरेमधील मेट्रोची कारशेड थेट कांजुरमार्गला हलविण्याचा तुघलकी निर्णय जाहीर करून टाकला. मुळात कुलाबा-वांद्रे-सीप्झ (अंधेरी) अशी अस्तित्वात येणारी ‘मेट्रो लाईन-३’; अर्थात ‘अ‍ॅक्वा लाईन’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३३.५ किमीचा भुयारी मार्ग हा दोन ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ना जोडून चाकरमानी मुंबईकरांचा रोजचा धकाधकीचा प्रवास सुखाचा करणारा आहे. रस्त्यावरील ताण, लोकांचे प्रवासात होणारे हाल आणि वेळेची बचत हे या मेट्रो प्रकल्पाचे वैशिष्ट्य. यासाठी आरेमध्ये मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू होते. ही ‘मेट्रो लाईन-३’ साधारणतः २०२१ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कर्मचारी, इंजिनिअर्स, कॉन्ट्रॅक्टर्स दिवसरात्र या भुयारी लाईनचे काम करीत आहेत. आरेमध्ये होणार्‍या कारशेडचे कामदेखील त्यादृष्टीतून सुरू होते. परंतु, या कारशेड विरोधात झालेल्या तथाकथित पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच या कारशेडच्या बांधकामावर स्थगिती देऊन टाकली. स्थगिती मिळण्यापूर्वी या आरे कारशेडचे जवळपास ४०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले होते. आता या स्थगितीमुळे आधीच १,२०० कोटी रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारण्यात आला आहे.
 
 
 
आरे कारशेडला विरोध करणारे तथाकथित पर्यावरणप्रेमी म्हणजे कोण होते? निसर्ग संवर्धनासाठी प्रामाणिकपणे झटणार्‍या काही संस्था व काही व्यक्ती सोडल्या, तर बाकी सगळे कोण आहेत, ते बघा. मुंबईतील पर्यावरणप्रेमी हे त्यांच्याच एका अद्भुत विश्वात वावरत असतात. मुंबईसारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या शहराच्या दैनंदिन समस्यांशी त्यांचे काहीच देणे-घेणे नसते. प्रचंड वाहतूककोंडीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन वगैरे त्यांना दिसत नसते. कुठे आंदोलन उभे राहिले की, या संस्था तिथे प्रकटतात. त्यांचे फंडिंग कुठून येते, हा तर अजून गंभीर विषय आहे. आरे कारशेडला विरोध करण्यात काही युवक तिथे दिसले. त्यातील बरेच युवक हे ‘रॉयल पाम’ सारख्या कॉम्प्लेक्समधून आले होते; जो २५० एकरचा कॉम्प्लेक्स मुळात आरेच्या मधोमध वसविण्यात आला आहे. मुंबईत नागरी वसाहती उभारताना किती झाडे कापली जातात, याची यांना काहीच माहिती नसते. एक दिवस हातात प्लेकार्ड घेऊन, सोशल मीडियावर फोटो टाकून, टॉपिक ट्रेंड करून यांचे आंदोलन तिथेच संपले. बाकी आंदोलनात सहभागी झालेले किंवा पाठिंबा देणारे काही सेलिब्रिटी म्हणजे दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण. २४ तास वातानुकूलित स्थानी राहायचे, पॉश गाड्यांमधून फिरून कार्बन उत्सर्जन करायचे; पण सुपारी मिळताच सोशल मीडियावर जनतेला निसर्गप्रेमाचे धडे द्यायचे, हे यांचे कार्य!
 
 
आता सदर मेट्रो-३ची कारशेड ही आरेमधून थेट कांजुरमार्ग येथे हलविणे हा निर्णय राज्य सरकारने कोणत्या आधारावर घेतला, हे एक मोठे कोडे आहे. कारण, याच सरकारने नेमलेल्या समितीने आरेलाच कारशेड ठेवणे कसे आवश्यक व फायद्याचे आहे, याचा अहवाल दिला आहे. पण, जनतेला वेठीस धरण्याचा ज्यांनी पण केला आहे, त्यांनी साहजिकच या अहवालास केराची टोपली दाखविली. आता मेट्रो-3चे सीप्झ (अंधेरी) हे शेवटचे स्टेशन, इथून आरेच्या कारशेडपर्यंतचे अंतर हे फक्त १.३ किमी एवढेच आहे, तर सरकारने नव्याने डोकं लावून शोधून काढलेल्या कांजुरच्या जागेपासून सीप्झ हे तब्बल नऊ किमीचे अंतर आहे. आता या नऊ किमी अंतरावर मेट्रो कोचेस चालविण्यासाठी पिलर ट्रॅक व अख्खी लाईन टाकावी लागणार. का, तर फक्त पार्किंग करण्यासाठी. मुंबईत एका लाईनचे कन्स्ट्रक्शन होत असताना अख्खा रस्ता व त्याच्या आजूबाजूला किती वाहतूककोंडी होते, हे मुंबईकर रोज अनुभव घेत आहेत. पण, हा त्रास उद्याचा प्रवास सुसह्य होण्यासाठी मुंबईकर सहन करत आहेत. परंतु, इथे अजून एक नऊ किमीची विनाकारण लाईन टाकायची तर त्याचा त्रास किती होईल. बरं, कारशेडमध्ये फक्त मेट्रो पार्क होत नाहीत, तर त्या संपूर्ण लाईनची सिग्नल यंत्रणा, विद्युत व संगणक यंत्रणाही डेपोतच असते. हे सगळे असे भलतीकडे नेऊन कसे चालणार?
 
 
आरेमधील कारशेड हलवायचे ठरवून उद्धव ठाकरे यांनी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. एक म्हणजे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड महत्त्वाकांक्षेने मुंबईमधील सर्व मेट्रो प्रकल्प कार्यान्वित केले. गेल्या अनेक वर्षांत जे झाले नाही, त्या वेगाने फडणवीसांनी मेट्रोचे काम रेटण्याचा सपाटा लावला आणि तिथेच मराठी अस्मिता व मुंबईच्या मालकीचा टेंभा मिरविणार्‍या शिवसेनेच्या पोटात कळ यायला सुरुवात झाली. त्यातून उफाळलेल्या अहंकारातून उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळताच, फडणवीसांनी कार्यान्वित केलेल्या बर्‍याच प्रकल्पांना स्थगिती देण्यास सुरुवात केली. त्यातीलच एक ही मेट्रोची आरेमधील कारशेड. दुसरा आयाम म्हणजे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांबरोबर विरोध करण्यात आदित्य ठाकरे बर्‍यापैकी ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते. आज ते पर्यावरणमंत्रीदेखील आहेत. दुसरीकडे सुशांत आत्महत्या प्रकरणात विविध संबंध लावून सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांची इमेज अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे संधी मिळताच युवराजांची ‘इमेज’ सुधारायला मिळणे व स्वतःचा अहंकारदेखील सुखवायला मिळणे, असे दोन्ही प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड हलविण्याचा निर्णय घेऊन केले आहेत.
 
 
कारशेड अट्टाहासाने कांजुरला हलवलीच, तर त्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या त्रासात वाढच होणार आहे. ‘अ‍ॅक्वा लाईन’ पुढल्या वर्षीच्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार होती. ती आता किमान चार-पाच वर्षे अडकून पडेल. या पट्ट्यात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे ती अशीच राहील, जोपर्यंत लाईन चालू होत नाही. कार्बन उत्सर्जन, लोकांचे मनुष्य-तास वाया जाणे, इत्यादी सगळं होईल ते वेगळंच. एवढेच नाही, तर यामुळे तब्बल चार हजार कोटी रुपयांचा विनाकारण आर्थिक भुर्दंड हा सामान्य करदात्या जनतेच्या माथी मारण्यात येणार आहे. कोणासाठी, कशासाठी तर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेम व अहंकारासाठी! अर्थात, जनता सर्व काही बघत असते आणि लोकशाहीत आपण राजे नाही तर जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे पुत्रहट्ट व अहंकारापेक्षा सामान्य जनतेचे सुख अधिक महत्त्वाचे. याचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. दुर्दैवाने यात होरपळणार फक्त आणि फक्त सामान्य मुंबईकर!
 
 
- मयुरेश जोशी
(लेखक भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@