हिंदू समाजाचा सुपुत्र : श्याम पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020   
Total Views |
Shyam pawar _1  

श्याम पवार यांचे आयुष्य म्हणजे वंचिततेच्या अंधारतला उगवता सूर्य, असा सूर्य जो धर्म आणि समाजाच्या उत्थानाचा विचार करतो. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असलेले, सीए आणि एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेले मुंबईचे श्याम पवार म्हणजे कष्ट आणि जिद्द यांचे मूर्तिमंत वास्तव. श्याम पवार यांच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर स्पष्टपणे जाणवते की, हुशारी आणि यश हे सर्वस्वीपणे सधन असलेल्या कुटुंबातल्या मुलाबाळांचीच मक्तेदारी नाही. मूळचे सोलापूर येथील पवार कुटुंब कुंचिकोरवे समाजाचे. कामानिमित्त येल्लप्पा आणि येल्लू पवार हे दाम्पत्य का{लना मुंबईला आले.
 
या दोघांना तीन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी सर्वात धाकटे श्याम. येल्लप्पा एका कंपनीत कंत्राटी कामगार होते. पण, व्यसनाधीनतेमुळे संसाराची आणि आयुष्याचीही घडी विस्कटलेली. येल्लूबाईचा दिनक्रम मोठ्या कष्टाचा. पहाटे लवकर उठायचे. सकाळी ९ वाजेपर्यंत मुलाबाळांचे, पतीची सगळी कामे आटपून स्वयंपाक बनवून, सकाळी १० ते सायंकाळपर्यंत लोकल ट्रेनमध्ये झाडू विकायला जायचे. तिथून आले की पुन्हा घरकाम, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत झाडू बनवणे. अशातच श्याम चार वर्षांचे असताना येल्लप्पा यांनी आत्महत्या केली. चार लेकरांना घेऊन तरुण येल्लूबाई जिद्दीने कष्टाने उभी राहिली. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून त्यांनी मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिले. त्या वस्तीमध्ये बहुतेक लोक येशूच्या भजनी लागलेले.
 
असो. एका घटनेने मात्र आईची जिद्द त्यांनी पाहिली. त्या वस्तीमध्ये समाजातील आणि इतरही खूप जण दारू बनविण्याचा आणि विकण्याचा धंदा करत असत. नाइलाजाने येल्लूबाईंनी दारू बनविण्याचा धंदा सुरू केला. एकेदिवशी येल्लूबाई घरी नव्हत्या. सहा वर्षांचे श्याम आणि त्यांची ११ वर्षांची मोठी बहीण घरी होती. त्यावेळी रेड टाकायला आलेल्या एका पोलिसांनी श्याम यांच्या मोठ्या बहिणीला मारहाण केली. सगळी वस्ती सुन्न झाली. संध्याकाळी आई घरी आली. तिला जेव्हा कळले की, मुलीला पोलिसाने मारहाण केली, त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले.
 
 
ती म्हणाली, “ज्या मुलांना जगवण्यासाठी मर मरते, त्या मुलांनाच जर त्रास झाला तर काय उपयोग?” त्याच क्षणापासून तिने दारू बनवणे सोडले. काही दिवसांतच ती सफाई कामगार म्हणून काम करू लागली. आईचे प्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द श्याम यांच्या मनावर खूप परिणाम करून गेली. या काळात ‘येशू, तुमच्या सर्वच समस्या सोडवेल’ असे सांगणारे त्या वस्तीत येत. त्यामुळे आजूबाजूवाल्या आयाबायांसोबत आई चर्चमध्ये जाऊ लागली. पण, याच काळात श्याम यांच्या बहिणीचा समाजातच विवाह झाला. तिथे हिंदू पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा आणि सर्व सण साजरे होत. श्याम यांना या पद्धती आवडत. चालीरीती आवडत.
 
 
चर्चचे वातावरण आणि पूजाअर्चा, सण, उत्सव यांचे वातावरण यातील तुलना श्याम यांच्या मनात सुरू झाली. आपला समाज कोणता? आपला धर्म कोणता? त्याच्या चालीरीती काय? असे त्यांच्या मनात येऊ लागले. त्यातूनच अभ्यासाव्यतिरिक्त स्वधर्मासंबंधीची माहिती त्यांनी अभ्यासली. दहावी झाल्यावर ते एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करू लागले. त्यावेळी तिथे अल्पशिक्षित कष्टकरी कंत्राटी कामगारांना मिळणारी वागणूक बघून त्यांच्या मनात आले, आपले वडीलही हेच आयुष्य जगले, आता आपणही हेच आयुष्य जगायचे का? नाही, आयुष्य बदलायचेच. त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू केला. बारावीनंतर सीएकडे काम करू लागले.
 
 
श्याम यांनी सीएचा अभ्यास करायला सुरुवात केली. मात्र, कधी कधी वाटे, आपल्या तर खानदानात कुणी सीए नाही, आपण कसे बनणार सीए? मात्र, त्याचवेळी आईचे कष्ट आणि हलाखीचे जगणे समोर येई, मग ते पुन्हा जिद्दीने अभ्यासाला सुरुवात करत. आज श्याम त्या जिद्दीमुळे सीए आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण करू शकले. शिक्षण आणि नोकरीने आयुष्यात स्थैर्य आले. मुलाचे स्वधर्म प्रेम आणि ज्ञान येल्लूबाई अनुभवत होत्या. धर्माची जाणीव त्यांनाही झाली, चर्च त्या अनुषंगाने येणारी कर्मकांड त्यांनी स्वत: पूर्ण विचाराअंती थांबवली.
 
 
धर्माबद्दलचे प्रेम तर त्यांच्या मनात होतेच. आपला समाज आणि धर्मरक्षण करायचे असेल, तर रा. स्व. संघाशी संपर्क हवाच, या हेतूने त्यांनी रा. स्व. संघाशी २०१८ साली संपर्क केला. तेव्हा त्यांच्या समाजातले लालू कुंचिकुर्वे हे संघ स्वयंसेवक भेटायला आले. रा. स्व. संघाचे धर्मविषयक आणि समाजविषयक काम आपल्या समाजाच्या अस्तित्वाला पुन्हा वैभव मिळवून देईल, अशी खात्री श्याम यांना वाटली. त्यातूनच ते धर्मकार्यासाठी काम करू लागले. वस्तीत समाजात कुणी धर्मांतर करू नये, केले तर हाती शून्यच येतो, प्रगती नाही तर आपले अस्तित्वच गमावतो, अशी भूमिका घेऊन उच्चशिक्षित श्याम भूमिका मांडत असतात. श्याम हे समाजातील तरुणांचा आदर्श आहेत. श्याम यांच्या कर्तृत्वाला आणि जिद्दीला नमन...




@@AUTHORINFO_V1@@