...तर ‘स्पिरीट’चा स्फोट होईल !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020   
Total Views |
black out_1  H



सरकार मात्र ‘तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी’ म्हणून मोकळे झाले. या मुर्दाड सरकारला म्हणूनच प्रश्न विचारावासा वाटतो की, रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक ही सगळी मग कोणाची जबाबदारी? सरकारचीच ना! मग जर नागरिकांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्ये कसोशीने पार पाडावी, अशी अपेक्षा असेल, तर सरकारनेही कृतिशीलता दाखवावी; अन्यथा मुंबईकरांच्या याच ‘स्पिरीट’चा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर मुंबई. श्रीमंतांना श्रीमंत करणारी आणि गरिबांनाही पोसणारी ही मायानगरी. पण, गेली कित्येक वर्षं रस्ते असो वा पाणीपुरवठा, स्वच्छता असो वा सार्वजनिक वाहतुकीची साधनं, झोपडपट्ट्यांचे जाळे असो वा घाणीचे ढीग, मुंबई दिवसेंदिवस बकाल आणि हताशच होत गेली. कालच्या पॉवरग्रीडच्या गोंधळाने तर अख्ख्या मुंबई महानगरालाच क्षणार्धात गोठवून टाकले. वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकलही जागीच थबकल्या आणि तीन-चार तासांचा मुंबईकरांच्या कामाचा खोळंबाही झाला. विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. त्यात ऐन कोविड महामारीच्या काळात वीजपुरवठा व्यापक स्तरावर खंडित झाल्याने रुग्णालयेही अंधारात गेली, तरी सुदैवाने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ठप्प पडले नाहीत. पण, यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, नेमका हा दोष कुणाचा? ऊर्जामंत्री, मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले असले, तरी अशाप्रकारे मुंबईसारख्या काट्यावर धावणार्‍या शहराचा वीजपुरवठा चार-पाच तास खंडित होणे हे नक्कीच शोभनीय नाही. तेव्हा, या प्रकरणाकडे केवळ एक तांत्रिक बिघाड म्हणून सोयीस्कर दुर्लक्ष करून चौकशी न गुंडाळता, यासाठी जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई सरकारने करायलाच हवी. दरवेळी मुंबईचे स्पिरीट, मुंबईकरांची जिद्द याचे गोडवे गाऊन मुंबईकरांच्या जखमांवर मीठ चोळणे आता सरकार आणि प्रशासनाने थांबवावे. कारण, आधीच पिचलेला मुंबईकर या ‘कोविड’च्या काळात अधिक कोलमडला आहे. कित्येकांच्या नोेकर्‍या गेल्या, धंदे बंद झाले. कोरोनाने घरचे, जवळचे दुरावले. त्यात कार्यालये ‘अनलॉक’ झाली, तरी लोकलचे दरवाजे सामान्यांसाठी अजूनही ‘लॉक’ आहेत. त्यामुळे दिवसाचे आठ तास खर्ची घालून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा रेल्वे स्थानकांवर उद्रेकही झाला. पण, सरकार मात्र ‘तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी’ म्हणून मोकळे झाले. या मुर्दाड सरकारला म्हणूनच प्रश्न विचारावासा वाटतो की, रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक ही सगळी मग कोणाची जबाबदारी? सरकारचीच ना! मग जर नागरिकांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्ये कसोशीने पार पाडावी, अशी अपेक्षा असेल, तर सरकारनेही कृतिशीलता दाखवावी; अन्यथा मुंबईकरांच्या याच ‘स्पिरीट’चा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही.
 
 
 

मुंबईला हतबल कोणी केले?

 
 
 
मुंबई आणि मुंबईकर म्हणजे जणू सहनशीलतेचा कळस अध्यायच, असा समज या सरकारचा, पालिका प्रशासनाचा झालेला दिसतो. हा काल-परवा झालेला समज नाही, तर गेली कित्येक वर्षे मुंबईला, मुंबईकरांना सर्वार्थाने ग्राह्य धरूनच पालिका कारभार हाकत गेली. मुंबईच्या समस्यांची यादीही मोठी असून त्याची आज प्रत्येक मुंबईकरालाही कल्पना आहेच. पण, पालिकेत गेली कित्येक वर्षं सत्तेच्या खुर्चीला चिकटलेल्या सत्ताधार्‍यांना याचे अजिबात सोयरसुतक नाही. कारण, जर मुंबईची इतकीच काळजी असती, तर मूलभूत सोयीसुविधांची या शहरात वानवाही नसती. पण, मुंबई ही गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीसारखीच वागवली गेली. तिला स्वार्थासाठी मरू तर दिले नाही. पण, तिची निगाही व्यवस्थित राखली नाही, हेच सत्य. पालिकेचे कारभारी आता राज्याचे सत्ताधारी झाल्यावर ‘अस्सल मुंबईचा मुख्यमंत्री’ म्हणून मुंबईकरांच्या अपेक्षाही काहीशा उंचावल्या खर्‍या; पण तिथेही मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आरेचे जंगल वाचवले खरे; पण केवळ अहंकारापोटी आरेतील काम सुरू झालेले कारशेड गुंडाळल्याने मेट्रो रखडवली. परिणामी, मुंबईच्या प्रदूषण पातळीत आगामी काळात घट न होता, ती पुढे वाढतच राहील. पण, आधीही म्हटल्याप्रमाणे मुंबईकरांना विचारतंय कोण? आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, असा हा सगळा प्रकार. कारण, मुंबईचे आपणच अनभिषिक्त सम्राट या धुंदीत इतकी वर्षं केवळ मुंबईकरांच्या भावनांशी खेळ करत, मराठी अस्मितेचे राजकारण करत शिवसेना मतं पदरात पाडत गेली आणि मुंबईकरांनीही मतांचे दान शिवसेनेच्याच पदरात टाकले. पण, त्याचा मुंबईकरांना काय मोबदला मिळाला? रस्ते खड्डेमुक्त झाले की, मुंबई पावसाळ्यात जलमय होण्याची शक्यता कमी झाली? पालिकेच्या रुग्णालयांची स्थिती सुधारली की, मुंबईतील कचर्‍यांचे डोंगर कोसळले? आपल्या आयुष्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय बदल झाले, हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराने आज पुन्हा एकदा स्वत:लाच विचारावा आणि काय उत्तर मिळते, ते पाहावे. त्यामुळे मुंबईची प्रगती, मुंबईचा विकास आणि सामान्य मुंबईकरांचे आयुष्यच या सत्ताधार्‍यांनी इतके हतबल करून टाकले की, मुंबईकरांनाही त्याचीच सवय जडली. मुंबईकरांनी सगळे निमूटपणे सहन केले. आयुष्य मात्र लोकलसारखे ‘फास्ट’ ठेवले. पण, आसपासच्या ‘स्लो’ दुनियेकडे मात्र कानाडोळाच केला. त्याचेच हे परिणाम!



@@AUTHORINFO_V1@@