रामचंद्र खराडी वनवासी कल्याण आश्रमचे नवे अध्यक्ष

    12-Oct-2020
Total Views |
Nagpur TP _1  H
 
नागपूर : सेवा क्षेत्रातील महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संस्चेथेचे नवे अध्यक्ष म्हणून रामचंद्र खराडी यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरात वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा निलीमा पट्टे, कृपाप्रसाद सिंह, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
 
श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या निधनानंतर १९९५ पासून सलग २५ वर्षे जगजेवराम उरांव यांनी कल्याण आश्रमचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता रामचंद्र खराडी यांची निवड झाली आहे. रामचंद्र खराडी यांचा जन्म १५ जानेवारी १९५५ रोजी राजस्थानातील उदयपूर जिल्ह्याच्या खरबर या गावी भिल्ल आदिवासी परिवारात झाला. पदवीपर्यंत शिक्षणानंतर त्यांनी शासकीय सेवेत तहसिलदार, दंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आदी शासकीय पदांवर सेवा दिली आहे. शासकीय सेवेतील दांडगा अनुभव आणि कार्यशैलीमुळे ते लोकप्रिय आहेत.
 
 
 
 
२०१४ मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर धार्मिक आणि सामाजिक कार्यात ते सक्रीय झाले. १९९५ पासून ते गायत्री परिवाराच्या संपर्कात आले. त्यांच्या नेतृत्वात १७ ठिकाणी गायत्री मंदिराची उभारणी झाली आहे. गायत्री महायज्ञात त्यांची भूमिका महत्वाची होती. विविध सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत. २००३ मध्ये डुंगरपूर कल्याण आश्रम भवन उभारणी दरम्यान ते कल्याण आश्रमच्या संपर्कात आले.
 
 
२०१६ व २०१९, असे दोन वेळा त्यांनी राजस्थान शाखेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन वर्षांपासून ते राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून ते कार्यरत होते. नाशिक येथे आयोजित करण्यात मेळाव्यात त्यांनी सहभाग घेतला होता. हितरक्षा आयाम अंतर्गत हैदराबाद येथे पेसा अॅक्टवर आयोजित कार्यशाळा, मुंबईतील नीती दृष्टीपत्र तयार करण्यासाठी आयोजित चर्चासत्र आदी कार्यक्रमातून त्यांच्या अनुभवाची छाप दिसून आली. पाच वर्षात कल्याण आश्रमात ते देशभरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. स्पष्ट विचार आणि प्रभावी वत्कृत्व यामुळे ते लोकप्रिय आहेत. २०१७ मध्ये खराडी यांना संत ईश्वर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.