मोदी-शाहांची गरज का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020
Total Views |
Farukh abulla_1 &nbs




नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर आक्षेप असणारे अनेक लोक आहेत. पण, फारुख अब्दुल्लांसारख्या देशद्रोह्यांकडे पाहिले की, मोदी व शाह यांची देशाला गरज का आहे, याचेही उत्तर मिळते. त्यामुळे आता अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर आणि ‘कलम ३७०’चा राग आळवून चीनपुढे कितीही शेपटी हलवून निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काहीही साध्य होणार नाही.
 
 
भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने चीनने लडाख सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारले. चीनने ‘कलम ३७०’ निष्प्रभीकरणाचा भारत सरकारचा निर्णय कधीही मान्य केला नाही. आता अल्लाच्या मर्जीने आमच्या लोकांना चीनच्या ताकदीचा फायदा मिळावा, जेणेकरून आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ लागू करू, असे सरळ सरळ चीनला भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारे देशविघातक, देशद्रोही विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान लोकसभा खासदार फारुख अब्दुल्ला यांनी केले.
 
 
जम्मू-काश्मीरला आपल्या बापजाद्यांची जहागीर समजणार्‍या व भारत सरकारने ‘कलम ३७०’ हटवल्यास रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी देणार्‍या फारुख अब्दुल्ला यांना व त्यांच्यासारख्याच अन्य काश्मिरी नेत्यांना, डाव्या-पुरोगामी, उदारमतवादी-धर्मनिरपेक्षतावाद्यांना ५ ऑगस्ट, २०१९ रोजी ३६० व्होल्टचा झटका बसला. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे वर उल्लेख केलेल्या भारत विखंडन शक्तींनी सातत्याने कलम ३७० हटवल्यानंतर काय काय होईल, याची भीती घातली व जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहापासून कायम दूरच ठेवले.
 
 
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय नियोजनबद्धरीत्या; पण कोणताही गाजावाजा न करता फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती वगैरेंसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेले ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ रद्द करून दाखवले. जम्मू-काश्मीरला लागू असलेल्या ‘कलम ३७०’ वर मोदी-शाहांसारख्या कुशल शल्यचिकित्सकांनी अशी काही शस्त्रक्रिया केली की, आता अब्दुल्लाच काय, त्यांच्याच भाषेत त्यांचा खुदाही ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करू शकणार नाही; अर्थात तोपर्यंत ‘कलम ३७०’च्या आडून अब्दुल्ला-मुफ्ती घराण्यांनी तिथे काय धिंगाणा घालायचा तो घातला, तसेच आजन्म नव्हे तर आपल्या येणार्‍या कित्येक पिढ्यांतही जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा कायम राहणार, या धुंदीत बेफाम कारभार केला. केंद्राकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीची मलाई काश्मिरी जनतेला न देता स्वतः ओरपली. मात्र, त्या सर्वांचीच दुकानदारी ‘कलम ३७०’च्या निष्प्रभीकरणाने बंद झाली आणि आता यापुढे आपल्याला खिसे भरता येणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. परिणामी, गेल्या वर्षभरापासून नजरकैदेत असताना आणि आता नजरकैदेतून सुटका झाल्यानंतरही फारुख अब्दुल्लांना झोंबलेली मिरची त्यांच्या वटवटीतून बाहेर पडत असल्याचे दिसते.
 
 
 
जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता असली की, केंद्रातील सरकारशी सलोख्याचे संबंध ठेवायचे आणि सत्ता नसली की, फुटीरतेला प्रोत्साहन देणार्‍या कारवाया करायच्या, असा एककलमी कार्यक्रम फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला तसेच मुफ्ती कुटुंबानेही राबवला. पण, आता मात्र, कलम ३७०च्या निष्प्रभीकरणाने पुन्हा कधीही जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला घराण्याचे सरकार येण्याची शक्यता पार मावळली.
 
 
‘कलम ३७०’ची ढाल पुढे करून चालणार्‍या अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या राजकारणाची तिरडी उठली आणि म्हणूनच त्याच्या शोकात फारुख अब्दुल्ला कायम देशविरोधी वक्तव्ये करताना दिसतात. दगडफेक्यांचे, दहशतवाद्यांचे जनाजे पाहून त्यांना घसा फाडून ओरडावेसे वाटते आणि ते भारत सरकारच्या नावाने लाखोली वाहतात. पण, अब्दुल्लांमध्ये स्वतः काही करण्याची धमक नाही, कारण जम्मू-काश्मीरची जनता त्यांना आपला नेता मानत नाही, जनतेचा त्यांना पाठिंबा-समर्थन नाही, त्यामुळे फारुख अब्दुल्ला आता चीनच्या मांडीवर बसून ‘कलम ३७०’ सह जम्मू-काश्मीर परत मिळवण्याची स्वप्ने पाहतात.
 
 
एखाद्या गावातील जमीनदाराची सर्वसामान्यांना लुबाडणारी, ओरबाडणारी, जमीनदारी प्रशासकीय व्यवस्थेतील खमक्या अधिकार्‍यामुळे जमीनदोस्त व्हावी आणि नंतर त्याने दात-ओठ खावेत, तशी अवस्था आज फारुख अब्दुल्लांची झाल्याचे दिसते. पण, म्हणूनच कसेही करून मला माझी जमीनदारी परत मिळावी, याकडे ते आशाळभूतपणे डोळे लावून बसले आहेत. संसदीय प्रणालीचे भान न राहिलेल्या अब्दुल्लांना फक्त सत्ता आणि सत्ताच दिसत आहे. पाकिस्तानला शक्य नसेल तर चीनने तरी आपले रडगाणे ऐकावे नि झोळीत जम्मू-काश्मीरच्या सत्तेचा तुकडा टाकावा म्हणून ते तळमळत आहेत.
 
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या आताच्या मुलाखतीतून फारुख अब्दुल्लांची जम्मू-काश्मीर हातचे गेल्याचीच जखमच ठसठसताना दिसते. त्याआधीही ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशविरोधी विधाने केलीच होती. ‘काश्मिरी जनता स्वतःला भारतीय मानत नाही, चीन भारतापेक्षा वरचढ ठरत असेल तर काश्मिरी लोक खूश होतात आणि चीनने भारतावर कब्जा केला पाहिजे, ही काश्मिरी जनतेची इच्छा आहे,’ अशा प्रकारची वक्तव्ये त्यांनी त्या मुलाखतीत केली होती. म्हणजेच, फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेतून सोडले तर ते ‘कलम ३७०’ रद्दीकरणाच्या विरोधात माहोल पेटवण्याच्या कामाला लागलेत. यातून आताच्या केंद्रशासित प्रदेशातील जनतेला भडकावण्याचे त्यांचे कारस्थान तर दिसतेच; पण चीनसारख्या देशाला भारतावर आक्रमण करण्यासाठी आवताण देणारा त्यांचा देशद्रोही चेहराही दिसतो.
 
 
मात्र, अब्दुल्ला आता असे बोलताहेत, तर ज्यावेळी त्यांची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय काय कारनामे केले असतील, याची कल्पनाही करवत नाही. पण, आता त्यांनी कितीही आणि कोणाचेही नाव घेऊन भारत सरकारला शह देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या हाती शुन्याशिवाय काहीही लागणार नाही. हो, वाटल्यास ते दिवसाचे २४ तास जम्मू-काश्मीर गमावल्याच्या रुदाल्या नक्कीच गावू शकतात. शिवाय बाकी कसलेच काम नसल्याने रिकामटेकड्या ओमर अब्दुल्ला व समदुःखी मेहबुबा मुफ्तींनाही ते साथ-संगतीसाठी बोलावू शकतात.
 
 
कारण, देशाची सत्ता आता नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बळकट हातात आहे, तेव्हा अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर असंसदीय मार्गाने परत मिळवण्याचे विसरून जावे. उलट पाकिस्तान असो वा चीन, कोणीही डोळे वाकडे करून पाहिले तर ते डोळे काढून घेण्याचे सामर्थ्य आणि इच्छाशक्ती आताच्या केंद्रीय नेतृत्वात व भारतीय सैन्यदलांत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर आक्षेप असणार अनेक लोक आहेत. पण, फारुख अब्दुल्लांसारख्या देशद्रोह्यांकडे पाहिले की, मोदी व शाह यांची देशाला गरज का आहे, याचेही उत्तर मिळते. त्यामुळे आता अब्दुल्लांनी चीनपुढे कितीही शेपटी हलवून निष्ठा दाखविण्याचा प्रयत्न केला, तरी त्याने काहीही साध्य होणार नाही. हो, मात्र भारत सरकार पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग, गिलगिट-बाल्टिस्तान आणि चीनच्या ताब्यातील अक्साई चीन लवकरच परत मिळवेल, तेव्हा त्या रडारडीसाठी अब्दुल्लांनी नक्कीच सज्ज राहावे.
 
@@AUTHORINFO_V1@@