नवरात्रोत्सवाची लगबग कमीच : व्यापारात 'घट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2020
Total Views |
Navratri_1  H x


कोरोनामुळे टोपलीविक्रेत्यांसह घट विक्रेत्यांच्या व्यवसायात मंदी

 
 
ठाणे : गणपती-गौरीनंतर आता नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे नवरात्रीत अंबामातेचे घटस्थापनेच्या उत्सवाला झळ बसली आहे. अनेक सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवात देवी न बसविण्याचा निर्णय घेतला असून घराघरात स्थापना होणार्‍या घटांची संख्याही घटण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, घट किंवा गरबी, टोपल्या विक्री करण्यासाठी महाराष्ट्रातील कुंभार समाज आणि आदिवासी दुर्गम भागातील बुरूड समाज व अनेक भटके-विमुक्त ठाण्यात येतात मात्र यंदा त्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचे दिसुन येत आहे.
 
 
 
एकीकडे वाहतुकीचे पर्याय कमी असल्याने तसेच,परजिल्हयातून येण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाहीत.या वाढीव भाड्यामुळे या मंडळीना हा खर्च परवडेनासा झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे अतिवृष्टी आणि मंदी-महागाईचा फटका या व्यवसायालाही बसला आहे.सबंध महाराष्ट्राला पावसाने झोडपल्याने या टोपल्या बनविण्यासाठी लागणारा बांबू पावसात भिजला.त्यामुळे, मालाची आवक कमी झाल्याचे हे व्यावसायिक सांगतात.
 
 
 
गणपती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी देवींच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडुन मंडपांचे भुमीपुजन आणि गरबा आयोजनाच्या तयारीची लगबग सुरू होते.मात्र,यंदा कोरोनाच्या सावटामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी नवरात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर घरगुती घटस्थापनांच्या संख्येतही घट होणार असल्याचे चित्र आहे.गुजराती समाजात नवरात्रात गरबा महत्वाचा असतो. नऊ दिवस विविधरंगी लेस,आरसा,टिकल्या,आणि मण्यांनी सजवलेल्या गरबीमध्ये (मडकी) दिवा लावून पूजन केले जाते.
 
 
 
यामुळे गरबीला मोठी मागणी असते. दरवर्षी ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत जवाहरबाग स्मशानभूमीजवळ टोपल्या व घट (मडके) विक्रेते आपलं बस्तान मांडत असत. मात्र,कोरोनामुळे बाजारात मंदी असल्याने मडके विक्रेत्यांची संख्या नगण्य असुन भाविकांनीही पाठ फिरवल्याचे विक्रेते सांगतात.तर, बांबूच्या सहाय्याने रंगरंगोटी करीत टोपल्या विणण्यासाठी जळगाव, भुसावळ, नाशिकहून आलेले आदिवासी बुरूड व भटके-विमुक्ती समाजातील कारागिरांच्या संख्येतदेखील घट झाल्याचे चित्र आहे.
 
 
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे टोपलीसाठी लागणारा बांबू मोठया प्रमाणात पाण्यात भिजला आहे. त्यामुळे मालाची आवक कमी आहे. तर, यंदा नवरात्रीत गरबा नसल्याने गरब्यासाठी लागणारी पारंपारिक वस्त्रे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल कमी झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी बडया मॉलमध्येही या कपड्यांची चांगली रेलचेल असायची,मात्र कोरोनाच्या धास्तीने मॉलकडेही ठाणेकरांनी पाठ फिरल्याचे दिसत आहे.
 
 
 
अधिक मासामुळे घटस्थापना उशिरा
 
 
नवरात्र उत्सव आठवडयावर येऊन ठेपला आहे.वास्तविक पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच घट बसुन नवरात्र प्रारंभ होतो.मात्र,यावर्षी अश्विन महिना अधिक आल्याने घटस्थापना उशीरा असल्याचे पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की,यावर्षी घटस्थापना शनिवार,१७ ऑक्टोबर २०२० रोजी असुन,नवरात्र संपण्याच्याच दिवशी अश्विन शुक्ल नवमीच्या दिवशी रविवार,२५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा सण आहे.



@@AUTHORINFO_V1@@