आत्मनिर्भरतेच्या दिशेने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Shivjit Ghatge_1 &nb

तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे ‘स्टेप सेट गो’ भन्नाट अ‍ॅप बनवीत ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात मानाचा तुरा रोवणार्‍या शिवजीत घाटगे यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया...
 
 
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत. त्यामुळे काही पावले चाललो, तरी अनेकदा धाप लागते. लोकांना चालण्याची सवय लागावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिवजीत घाटगे या तरुणाने ‘स्टेप सेट गो’ हे अ‍ॅप बनवले आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे भन्नाट अ‍ॅप बनविणार्‍या शिवजीत घाटगे यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
 
 
शिवजीत घाटगे सध्या मुंबईत स्थायिक आहेत. जाहिरात क्षेत्राचा तब्बल दहा वर्षांचा अनुभव गाठीशी असताना शिवजीत घाटगे यांनी ठरविले होते की, आपण स्वतःचा एक मोठा व्यवसाय उभारायचा, आत्मनिर्भर व्हायचे. त्याच ध्येयानुसार त्यांची वाटचाल सुरू होती. शिवजीत अनेक छोट्या-मोठ्या घरगुती व्यवसायांचे जाहिरात सल्लागार म्हणून कार्यरत होते. मात्र, केवळ यावरच मर्यादित न राहता आपल्या मित्रांच्या सहकार्याने त्यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली. शिवजीत यांच्यातील योग्य वेळ, व्यावसायिक व भागीदार याबाबतच्या चिकित्सक वृत्तीतून ‘स्टेप सेट गो’चा उदय झाला. शिवजीत घाटगे, मिसाल तुराखिया, अभय पै यांनी मिळून हे अ‍ॅप बनवले आहे.
 
 
आपण रोज किती पावले चालतो, याची नोंद हे अ‍ॅप ठेवते. एक हजार पावले चालल्यावर त्याचे गुण मिळतात. विशिष्ट गुण मिळाले की, त्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू मिळते. आतापर्यंत जगभरातल्या ७० लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. मात्र, अनेक कारणांनी लोक चालण्याचा आळस करतात. लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांनी चालावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे हा या अ‍ॅपनिर्मितीचा उद्देश आहे, असे शिवजीत घाटगे सांगतात.
 
 
ही अ‍ॅप निर्मिती करण्यापूर्वी शिवजीत यांनी पाच संकल्पनांवर काम केले होते. कोरोनाकाळात ‘स्टेप सेट गो’ ही संकल्पना सर्वाधिक यशस्वी ठरली. सध्या शिवजीत या कंपनीचे एक सह-संस्थापक म्हणून या ब्रॅण्डच्या वित्त, विपणन आणि व्यवसाय विकासाची जबाबदारी पार पाडत आहेत. कारण, ही केवळ जबाबदारी नाही तर ते त्यांच्यातील मुख्य क्षमता आणि कौशल्य आहे. यामधूनच त्यांना प्रेरणा मिळते. ते म्हणतात की, “ही ईर्ष्या शिकण्याच्या इच्छेमधून निर्माण झाली आहे. जी मला अधिक सक्षम आणि निर्णायक उद्योजक बनण्यासाठी सक्षम करते.”
 
 
तंदुरुस्त आरोग्य राखण्यावरील प्रेम आणि निरोगी आयुष्य जगण्याच्या त्यांच्यातील भावनेतूनच ‘स्टेप सेट गो’ची संकल्पना आली होती. क्रिकेट, टेनिसपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळ खेळल्यामुळे शिवजीत यांनी योग्य फिटनेसचा आनंद लुटला आणि आजही ते निरोगी आरोग्यासाठी आग्रही असतात. वर्क-लाईफ बॅलन्सची खात्री करून ते दररोज चालणे, बाहेर काम करणे आणि निरोगी खाणे, तसेच योग्य विश्रांती घेण्यात आनंद मानतात. मागील काही दिवसांपासून ते युट्यूबच्या मदतीने गिटार वाजविण्याचा प्रयासदेखील करत आहेत. त्यांच्यातील जिज्ञासू व्यक्तिमत्त्वामुळे जोपर्यंत एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तोपर्यंत ते वाचन करतात. वेगवेगळ्या संदर्भांचा आढावा घेतात. आजच्या यशामागे ते कुटुंब आणि मित्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात, ज्यांच्या आधाराशिवाय आज हे यश मिळवू शकले नसते.
 
 
इतर उद्योजकांच्या तुलनेत शिवजीत आपल्या व्यावसायिक चढ-उताराचा विचार करतात, तेव्हा ते इतर मोठ्या व्यावसायिकांच्या प्रवासाविषयी कथांमधून प्रेरणा घेतात. त्यांच्या सक्षम नेतृत्वाने, ‘स्टेप सेट गो’ला २०१९ मध्ये प्रारंभापासूनच मोठ्या उंचीवर नेले आहे. हे भारतातील पहिले फिटनेस अ‍ॅप आहे, जे वापरकर्त्यांसमोर एक आरोग्यासोबतच एक अनोखा प्रस्ताव ठेवते. या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांना बक्षिसे दिली जातात. केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावरच या अ‍ॅपने मोठा टप्पा गाठला आहे. याचा परिणाम म्हणून आज ‘स्टेप सेट गो’ला जगभरातून ६० लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि ५० लाखांहून अधिक आकर्षक बक्षिसे आहेत.
 
 
 
अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर त्यावर आपण रोज किती पावले चालतो याची नोंद ठेवली जाते. एक हजार पावले झाल्यावर ‘एसएसजी कॉईन’ मिळतो. अशा प्रकारे काही ठरावीक कॉईन खात्यात जमा झाले की, आकर्षक भेटवस्तू मिळते. यात दुचाकी, आयफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात. आतापर्यंत तीन व्यक्तींना दुचाकी तर दहा व्यक्तींना आयफोन भेट मिळाले आहेत. आजपर्यंत जगभरातील ७० लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याची दखल घेत ‘आत्मनिर्भर भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये हेल्थ विभागात ‘स्टेप सेट गो’ अ‍ॅपला प्रथम क्रमांक मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या अ‍ॅपचा उल्लेख करून त्याच्या यशाबद्दल निर्मात्यांचे कौतुक केले आहे. शिवजीत घाटगे यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@