‘कॉमन मॅन’चा हिरो....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

amol palekar_1  


हिंदी भाषेच्या चौकटीत बंदिस्त न राहता, अनेक भाषांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच निर्माते, दिग्दर्शक म्हणजेच चतुरस्र कलावंत अमोल पालेकर.

प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर त्यांचा विश्वास असल्याने त्यांनी कधीच उपदेशाचे डोस पाजले नाहीत. त्यांच्या कामाच्या बाबतीत ते कायमच प्रामाणिक राहिले. स्त्री चित्रपटाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यांनी तिला कधीच अजागळ वगैरे दाखवले नाही. ‘तुम्ही अधिक सुज्ञ व्हा. विविध विचारधारांमुळे येणारी मतभिन्नता, निर्भय संवाद या बाजूंचा स्वीकार करा. एखाद्या मुद्द्याला सखोल विश्लेषणाशिवाय विरोध करू नका. असहमतीच्या मतांच्या व्यक्ततेविषयीही सहमती दर्शवा,’ अशी कळकळीची विनंती या अभिनेता-दिग्दर्शकाने काही वर्षांपूर्वी केली होती. सभ्य, सोज्वळ व प्रामाणिक अशी व्यक्तिरेखा साकारलेला एक हरहुन्नरी कलाकार यांच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला. सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून या कलावंताला प्रेक्षकवर्गाची प्रचंड पसंती मिळाली. हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांनी नाव तर कमावलेच; पण दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. एक उत्कृष्ट अभिनेता चांगला दिग्दर्शकही होऊ शकतो, असे त्यांना वाटते. दिग्दर्शक म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटदेखील खूप गाजले. धीरगंभीर विषय, आशयघन कथानक, सामान्य व्यक्तीची गोष्ट, हे त्यांच्या दिग्दर्शनाचे विशेष गुण. असे चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अमोल पालेकर.


अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९४४ मध्ये मुंबईत झाला. कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांना अमोल यांच्याशिवाय तीन मुली नीलम, रेखा आणि उन्नती. त्यांनी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ येथे फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतले. ‘पेंटर’ म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. अमोल पालेकर हे, चित्रकला आपले पहिले प्रेम असल्याचे सांगतात. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कारकिर्दीची सुरुवात त्यांनी चित्रकार म्हणूनच केली होती. “चित्रकलेचे शिक्षण घेऊन चित्रकार झालो, योगायोगाने अभिनेता झालो, गरजेमुळे निर्माता झालो आणि स्वत:च्या आवडीमुळे दिग्दर्शक झालो,” असे ते नेहमी म्हणतात. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या अमोल पालेकर यांनी काही काळ बँकेतदेखील नोकरी केली. पालेकर कुटुंबीयांचा दुरान्वये चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्टात कामाला होते, तर आई खासगी कंपनीत नोकरी करत होती. पदवी प्राप्त केल्यानंतर अमोल पालेकर यांनी आठ वर्षे ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी केली. सुरुवातीचे तीन चित्रपट ‘सिल्व्हर ज्युबली’ हिट झाल्यानंतर आपल्याला नोकरी सोडणे सोपे झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.


पालेकरांच्या गर्लफ्रेंडला नाटकांमध्ये रस होता. जेव्हा ती नाटकांचा सराव करायची, तेव्हा अमोल पालेकर तिची वाट पाहत बाहेर उभे राहायचे. याचदरम्यान सत्यदेव दुबेंची नजर त्यांच्यावर पडली. दुबेंनी त्यांना मराठी नाटक ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मध्ये पहिल्यांदा भूमिका दिली. या नाटकाला खूप पसंती मिळाल्याने दुबेंनी त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पुढच्या नाटकासाठी त्यांनी अमोल पालेकरांना कठोर प्रशिक्षण दिले आणि अशाप्रकारे त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.१९६७ पासून मराठी व हिंदी थिएटरमध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सहभाग नोंदवला. 1971 मध्ये मराठी चित्रपट ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यामधून ‘डेब्यू’ केला. त्यानंतर १९७२ मध्ये सत्यदेव दुबे यांच्यासोबत मराठीत थिएटर करायला सुरुवात केली. १९७४मध्ये दिग्दर्शक बसू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले. ‘मध्यमवर्गीय कॉमेडी’ म्हणून त्यांचे चित्रपट प्रचलित झाले. १९८६पर्यंत त्यांनी अभिनयाचे चार चाँद लावले. अभिनयानंतर निर्मिती क्षेत्राची धरलेली साथ त्यांनी अद्यापही सोडलेली नाही. चित्रपट स्वीकारण्याबाबत अतिशय चोखंदळ असल्याने १९७०च्या दशकात अमोल पालेकर बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. त्याकाळात बासू चॅटर्जी आणि अमोल पालेकर ही जोडी खूप गाजली. कॅमेर्‍याच्या मागेदेखील त्यांनी तेवढीच कमाल दर्शवली. ‘आकृत’, ‘थोडासा रूमानी हो जाए’, ‘दायरा’, ‘कैरी’, ‘पहेली’ इत्यादी चित्रपट आणि ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘मृगनयनी’ सांरख्या दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या दिग्दर्शनामध्ये त्यांनी आपले दिग्दर्शनातील कसब दाखवून दिले.


१९७०च्या नंतर राजेश खन्नाचे संस्थान खालसा झाले आणि ‘अमिताभ’ नावाचा वादळी झंझावात आला. त्याच्या रफटफ, ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिकांवर एक ‘आल्हाददायक’ उतारा सिनेरसिक शोधत असतानाच हृषीकेश मुखर्जींनी एक वेंधळा, बावळटपणाकडे झुकत असलेला लाजरा बुजरा नायक आणला आणि तो आला आणि त्यानं स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. ‘रजनीगंधा’ मधला, बस स्टॉपवर साध्या-सुध्या पेहरावातला, आपली प्रेयसी शोधणारा बावला नायक अमोल पालेकरांनी कमालीचा प्रभावीपणे साकारला. पुढे याच त्यांच्या साध्या सरळ इमेजला अनुसरून त्यांच्याकडे ‘गोलमाल’ हा सुपरहिट ‘ओरिजनल’ सिनेमा आला आणि रेस्ट इज हिस्टरी. ‘गोलमाल’मधील बनवाबनवीच्या दुहेरी भूमिकेचे आव्हान पालेकरांनी यशस्वीरीत्या पेलले. त्यांची आणि उत्पल दत्त यांची ‘केमिस्ट्री’ रसिकांच्या पसंतीस पडली. त्यावेळी ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’मध्ये त्यांना ‘गोलमाल’साठी अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीने नामांकन मिळाले. खळबळ तेव्हा उडाली, जेव्हा तो ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’ आमच्या अमोल पालेकरांनी खिशात घातला तेव्हा. हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळा नायक आपला चाहतावर्ग निर्माण करू पाहत होता. पण, हिंदी कमर्शियल सिनेमांत अमोल पालेकरांसारख्या संवेदनशील कलाकाराचे मन रमले नसावे. त्यांनी मोहरा वळवला तो प्रायोगिक सिनेमांकडे.

‘भूमिका’, ‘स्पंदन’, ‘आदमी और औरत’, ‘तरंग’, ‘खामोश’ या चित्रपटांत त्यांनी आव्हानात्मक भूमिका करून अमोल पालेकर हा फक्त ‘गुळगुळीत’ हिरो नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अमोल पालेकरांनी धक्का दिला तो ‘आक्रित’ची निर्मिती आणि त्यात सशक्त खलनायक साकारुन. या मराठी चित्रपटाने फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड’ मिळविले. येथून निर्माता, दिग्दर्शक म्हणून पालेकरांचा सुरेख प्रवास सुरू झाला. नट म्हणून व्यक्त व्हायचे बहुधा त्यांनी थांबविले. ‘आक्रित’, ‘थोडासा रूमानी हो जाये’, ‘दायरा’, ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘अनाहत’, ‘समांतर’ आणि ‘पहेली’ जो शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला घेऊन केलेला उत्कृष्ट चित्रपट हे जबरदस्त. ‘चितचोर’मध्ये अमोल पालेकर यांनी साकारलेलं पात्र म्हणजे तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस होता. टीव्हीवरसुद्धा त्यांनी भ्रमण केले ते ‘कच्ची धूप’ मधून. अमोल पालेकर अक्षरशः अष्टवधानी कलाकार आहेत. फक्त फारसे ते ‘चमकेशगिरी’ न करता आपले काम करत असतात म्हणून प्रकाशझोतात नाहीत. व्यक्तिशः त्यांची विचारसरणी डावी राहिली आहे. प्रस्थापितांविरोधात नेहमीच त्यांनी ठोस भूमिका घेतलीय. चित्रपटसृष्टीतला आपला कडक मराठमोळा माणूस म्हणून पालेकरांबद्दल अभिमान वाटतो. ‘गोलमाल’, ‘चितचोर’, ‘छोटी सी बात’, ‘बातो बातो मैं’ अशा त्यांच्या काही दर्जेदार चित्रपटांची नावे सांगता येतील. केवळ हिंदी भाषेच्या चौकटीत बंदिस्त न राहता त्यांनी मराठी, बंगाली, मल्याळम व कानडी भाषेमध्येही काम केलेले आहे.

प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे विषय त्यांनी चित्रपटाचे कथानक म्हणून स्वीकारले. ‘अनकही’, ‘थोडासा रूमानी हो जाये’, ‘बनगरवाडी’, ‘दायरा’, ‘आहट’, ‘कायरे’, ‘ध्यासपर्व’, ‘पहेली’, ‘क्वेस्ट’, ‘समांतर’, ‘अ‍ॅण्ड वन्स अगेन’, ‘धूसर’ हे त्यांचे गाजलेले काही विशेष चित्रपट. कलाकार तोच जो विविध भाषांमध्ये स्वतःची कला सिद्ध करेल. मराठी माणूस असूनही त्यांनी हिंदीबरोबरच मल्याळम, कानडी, बंगाली व इंग्रजी भाषांमध्येही त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. ‘मदर’ बंगाली, ‘कलंकिनी’ बंगाली, ‘चेना अचेना’ बंगाली, ‘कन्नेश्वरा रामा’ कानडी, ‘पेपर बोट्स’ कानडी आणि इंग्लिश, ‘ओलंगल’ मल्याळम या चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचे वेगळेपण आणि कार्यकौशल्य दाखवून दिले. 80च्या दशकातील सामान्य व्यक्तीची व्यक्तिरेखा ते जबरदस्त साकारायचे. त्यामुळे ते रसिकवर्गाला जवळचे वाटू लागले. त्यांचे साधे राहणीमान, रुबाबदार देहबोली, तडफदार व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या चित्रपटातील गाणी, संवाद हे लोकप्रिय आहेतच; पण ‘फॅशन आयकॉन’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. चित्रपटांबरोबरच नंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये त्यांचे नशीब आजमावून पाहिले. ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘पाऊलखुणा’, ‘करिना करिना’, ‘मृगनयनी’, ‘आ बैल मुझे मार’, ‘एक नयी उम्मीद- रोशनी’ या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला. चाहत्यांच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याची ही शक्कल त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करून साध्य केली. सुरुवातीपासूनच अमोल पालेकर प्रसिद्धीपासून दूर राहणारे आहेत. स्वाक्षरी देण्यासाठीदेखील ते नकार देत असत. यासाठी त्यांना छोट्या मुलीकडून ओरडादेखील मिळत असे. उत्कृष्ट अभिनेता म्हणून एक फिल्मफेअर आणि सहा राज्य पुरस्कार मिळविणारे उत्तम अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक म्हणजेच अमोल पालेकर. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला मनापासून सलाम!


- आशिष निनगुरकर
@@AUTHORINFO_V1@@