रथ, घोडे आणि आर्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

arya _1  H x W:


मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये पाश्चात्त्य संशोधकांनी एक मूलभूत गृहीतक मांडलेले आहे. ते म्हणजे, इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, असीरिया, सुमेरिया, वगैरे ठिकाणी सापडलेल्या अत्यंत प्रगत संस्कृतीचे अवशेष आणि हडप्पा, मोहेंजोदरो येथील नागरीकरणाचे अवशेष यांच्या दोघांच्या काळात सुमारे दीड ते पावणेदोन हजार वर्षांचे अंतर आहे. याचा अर्थ या दरम्यान भारताबाहेरच्या त्या प्रगत संस्कृतीच्या लोकांनी भारतात सिंधूच्या खोर्‍यात स्थलांतर केले आणि मगच या नगरांचा आणि परिसराचा विकास सुरू झाला. परंतु, या गृहीतकाला छेद देणारे संशोधन पुढे प्रकाशात आल्याने सिंधू खोर्‍यातल्या या नागरीकरणाचा काळसुद्धा अजून दोन सहस्रके मागे जातो. याला जोडून पाश्चात्त्य विद्वानांचे अजून एक गृहीतक म्हणजे सिंधू नागरीकरणात घोडे नाहीत. बघूया याने नेमके काय बिघडते आणि यात तरी कितपत तथ्य आहे ते....


घोडे आणि रथांचा प्रश्न


भारतीय पुरातत्त्वात हा घोड्यांचा आणि रथांचा प्रश्न नेमका काय आहे? पाश्चात्त्य विद्वानांचे या बाबतीत म्हणणे असे आहे की, सिंधू खोर्‍यातल्या उत्खननांमध्ये ज्या ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, त्यात घोडे आणि रथ यांचे पुरावे मिळत नाहीत. परंतु, वैदिक साहित्यात मात्र सगळीकडे घोडे आणि रथ यांची वर्णने अगदी सर्रास आढळतात. त्यामुळे वैदिक वाङ्मय हे सिंधू नागरीकरणाच्या आधीचे आहे, हे कशाच्या आधारावर मानायचे? असा त्यांचा यावरचा मूळ प्रश्न आहे. घोडा हा प्राणीच ज्यामध्ये मध्यवर्ती आहे, असा अश्वमेध यज्ञ असो किंवा आश्विनीकुमारांचे वाहन असलेले घोडे असोत किंवा मरुतांचे वाहन असलेले घोडे असोत किंवा अजून अशी अनेक वर्णने असोत ; घोडा हा प्राणी वैदिक साहित्यात सर्वत्र आढळतो. तीच गोष्ट रथांचीही. लढाईच्या वैदिक कथांमध्ये तर रथ दिसतोच. पण, जिथे लढाई नाही, अशा ‘उषा’ देवतेच्या स्तुतीसारख्या काव्यात्म वर्णनातही तिचा रथ दिसतो. रथाची गोल चाके, त्याच्या आर्‍या, त्याचा अक्ष इत्यादी गोष्टींची उपमा आकाशातल्या गोष्टी पृथ्वीच्या भोवती गोल फिरताना दिसतात, त्याचे काव्यमय वर्णन करताना वैदिक साहित्यात काही ठिकाणी वापरलेली दिसते. घोडे आणि रथ यांचे वैदिक साहित्याशी असे जवळचे नाते आहे. यापैकी कुठल्याच गोष्टीचे पुरावे सिंधू खोर्‍यात झालेल्या उत्खननांत मिळालेले नाहीत, अशी हाकाटी पाश्चात्त्य विद्वानांनी पिटायला सुरुवात केली. यावरून त्यांनी लावलेला तर्क म्हणजे, वैदिक साहित्याची निर्मिती ही सिंधू नागरीकरणाच्या नंतर पुढच्या काळात झालेली असणार. मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशात मूळ ठिकाण असल्यामुळे आर्यांकडे तिकडचे घोडे होतेच. त्यांनी आपल्यासोबत सिंधू खोर्‍यात घोडे आणि रथ नेले; अर्थात या तथाकथित स्थलांतरानंतर वेदांची रचना झालेली असावी. त्यामुळे स्वाभाविकपणे सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथांचे पुरावे मिळत नाहीत. पण, वेदांमध्ये मात्र त्यांची वर्णने जागोजागी दिसतात. या गृहीतकावर आधारित अशीच आर्यांची वर्णने या पाश्चात्त्य संशोधकांनी केलेली दिसतात. आर्य लोक हे गोरे, घार्‍या डोळ्यांचे, सरळ/धारदार नाकाचे असे होते. ते घोड्यावर बसूनच सगळीकडे जात. अशा स्वरूपाची जी वर्णने आपल्याला २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेली दिसत, त्याच्या मुळाशी हेच गृहीतक आहे.


arya_3  H x W:


भारतीय पुरातत्त्वात घोडे आणि रथ


सिंधू खोर्‍यात जितकी उत्खनने झाली, त्यांच्यात पक्क्या मातीच्या (Terracotta) बनलेल्या अनेक मुद्रा (seals), मूर्ती, खेळणी, मणी, भांडी, वगैरे वस्तू तर मिळालेल्या आहेतच. पण, त्यासोबत विविध प्राण्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. लोथल (सरगवाला, गुजरात), हडप्पा (पंजाब, पाकिस्तान) व मोहेंजोदरो (सिंध, पाकिस्तान) येथे घोड्याच्या आकाराची पक्क्या मातीची खेळणी उत्खननात अगदी सुरुवातीपासूनच उपलब्ध झाली आहेत. यांचा काळ इ.स.पूर्व सुमारे २४०० अथवा अजून प्राचीन असा निश्चित केला गेलेला आहे. त्या काळी लहान मुलांना जर अशी घोड्याच्या आकाराची खेळणी दिली जात असतील, तर याचा अर्थ घोडा हा प्राणी तत्कालीन लोकांमध्ये तितका रुळलेला होता. सुरकोटडा (कच्छ, गुजरात) येथे सन १९७४ पासून काही उत्खनने झालेली आहेत. तिथे तर पाश्चात्त्यांना अपेक्षित असे खर्‍याखुर्‍या घोड्याचे अवशेषच उपलब्ध झाले आहेत. त्यात घोड्याची अनेक हाडे आहेत, काही दातही आहेत. हे अवशेष इ.स.पूर्व सुमारे २१०० पासून ते इ.स.पूर्व १७०० पर्यंत यामधल्या विविध काळातले असल्याचे तपासणीअंती सिद्ध झालेले आहे. या तपासण्यांचे अहवाल सन १९९७ पासूनच उपलब्ध आहेत. सनौली/सिनौली (बाघपत, उत्तर प्रदेश) येथील उत्खननात अलीकडेच सन २०१८मध्ये काही विस्मयकारक गोष्टी मिळाल्या. त्यात तांब्याच्या तलवारी, शिरस्त्राणे, काही शवपेट्या आणि त्यामधील दफने जशी मिळाली, तसेच तिथे सोबतच तीन प्राचीन रथांचेही अवशेष मिळालेले आहेत. या रथांची चाके भरीव आहेत. हे रथ तांब्याच्या पत्र्याने मढवलेले आहेत. या सर्व वस्तू इ.स.पू. २२०० ते इ.स.पूर्व १९००या काळातील असल्याचे निष्कर्ष जगन्मान्य झाले आहेत. ज्या कालखंडात आर्यांनी भारताच्या बाहेरून भारतात स्थलांतर केल्याचे हे पाश्चात्त्य विद्वान सांगतात, त्या कालखंडाच्या आधीपासूनच सिंधू खोर्‍यात सगळीकडे घोडे आणि रथ अस्तित्वात आणि वापरात होते, हे अगदी स्पष्टपणे इथे सिद्ध होते. त्यामुळे इ.स.पूर्व १८००च्या नंतर या गोष्टी आर्यांनी आपल्यासोबत भारताबाहेरून येथे आणल्याच्या तर्काला कोणता आधार उरतो?


arya_1  H x W:


वाळूत डोके खुपसलेले शहामृग
 
सिंधू नागरीकरणात मिळालेल्या मातीच्या मुद्रांवर विविध प्राण्यांच्या छबी कोरलेल्या आढळतात. पण, त्यात घोड्याची छबी मात्र आजवर कुठे आढळलेली नाही. या निरीक्षणावरून त्या काळी घोडेच नव्हते, असा निष्कर्ष कसा काय निघू शकतो? मुद्रांवर घोडा नाही, म्हणून काय झाले? त्या मुद्रांवर असे अजून असंख्य प्राणी नाहीत. पुराव्याचा अभाव, हा त्या गोष्टीच्या अभावाचा पुरावा बनू शकत नाही. इथे मुद्रांच्याही पलीकडे जाऊन वर दिलेले सगळे पुरावे अजून वेगळे काय सांगतात? घोड्याचे पुरावे नाहीत, कुठे आहेत रथ, असे म्हणत नाके मुरडणार्‍या लोकांना अजून नेमके कसले पुरावे हवे आहेत? इथे हे असे अनेक पुरावे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्यदर्शन घडवत आहेत. हे उपलब्ध होऊनसुद्धा गेली किमान पाच-सहा दशके तरी उलटलेली आहेत. पण, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून आपले जुनेच गाणे जुन्याच तुणतुण्यावर वाजवत राहण्यातच या अभ्यासकांना समाधान मिळते. शहामृगाप्रमाणे वाळूत डोके खुपसल्यामुळेच बहुतेक इतके स्पष्ट पुरावे त्यांना दिसत नसावेत.

(क्रमश:)
 
- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
 

arya_1  H x W:
@@AUTHORINFO_V1@@