ज्ञानाची आस आणि संशोधनाची दूरदृष्टी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

interview_1  H

लंडनची फेलोशीप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती, हा मान मिळविणार्‍या डॉ. अभिधा धुमटकर या साठ्ये महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांचासुद्धा डॉ. धुमटकर यांचा दांडगा अभ्यास. तेव्हा, साठ्ये महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आदित्य खरे यांनी मुलाखतीतून उलगडलेली डॉ. अभिधा धुमटकर यांच्या जिद्दीची ही कहाणी...


आपल्या लहानपणीची अशी कोणती गोष्ट किंवा घटना होती, ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व घडलं, असं तुम्हाला वाटतं?


माझं व्यक्तिमत्त्व घडविण्यात माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे आणि माझी शाळा निवडण्यात माझ्या आई आणि वडिलांची प्रबळ इच्छाशक्ती आहे. ज्यावेळी माझ्या आई-बाबांना मी अंध आहे हे लक्षात आले, त्या क्षणापासून त्यांनी माझे आयुष्य घडविण्याचे जणू व्रत घेतले आणि त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला अंध शाळेत घातले नाही, तर सामान्य शाळेसाठी सतत प्रयत्न केले. जेव्हा आपण समाजात वावरतो, त्यावेळी आपला संपर्क सर्वांशी येतो आणि त्याचे प्रशिक्षण शाळेत मिळते. कधी काही शाळांनी मला रंगदेखील ओळखायला सांगितला आणि त्यावर नाकारले. अखेरीस, बोरिवलीच्या सुविद्या विद्यालयाने आणि नंतर विलेपार्ल्याच्या प्रार्थना समाज विद्यालयाने मला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. मला बाराखडी समजावी यासाठी माझ्या आईने विशेष प्रयत्न घेतले. मी वर्तुळ पोळपाटाला स्पर्श करून शिकले. पोळपाटावर लाटणे तिरके ठेवले की मग ‘ब’ अक्षराचा पोट फोडलेला भोपळा मला समजला. या सर्व संघर्षाने मला नवदृष्टी दिली. ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं.


आपण ‘इतिहास’ या विषयामध्ये पीएच.डी. केली आहे. ही इतिहासाची गोडी कशी निर्माण झाली?


मला इतिहासाची आवड माझे प्राध्यापक फ्रेडरिक सिक्वेरा सर यांमुळे निर्माण झाली. त्यांनी इतिहास केवळ पाठ करायला सांगितला नाही, तर त्यांनी इतिहासातील कार्यकारण मीमांसा शिकवली. ‘काय झाले’ याहूनही ‘कसे झाले’ याचा अभ्यास करता आला पाहिजे. याशिवाय मी जेव्हा शिकत होते, तेव्हा भांडवलशाही आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यामुळे तत्कालीन आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याचा अभ्यास मला आवडला. इतिहासाबद्दल दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे, इतिहास केवळ वाचून शिकण्याऐवजी इतिहास जिथे घडला तिथे जाऊन, स्वतः अनुभव घेऊन शिकायला हवा. उत्खनन केवळ वाचून समजणार नाही, तर ते समजून घेण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, इतिहासाच्या अभ्यासामध्ये भाषा आणि लिपी यांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे इतिहासात पीएच.डी. करायचे ठरवल्यावर माझा विषय होता ‘विज्ञानाचा महाराष्ट्रातील इतिहास.’ या अभ्यासाच्या वेळी बाळाजी प्रभाकर मोडक हे इतिहासकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.


आपले १० ते ११ भाषांवर प्रभुत्व आहे. ज्यामध्ये मराठी, संस्कृत, सिंधी, बंगाली, तसेच जर्मन, फ्रेंच, इटालियन या युरोपीय भाषा आणि पर्शियन, अरेबिक, उर्दू या भाषा येतात. इतक्या भाषांचा अभ्यास आपण कशा प्रकारे केलात आणि त्यांचा वापर आज कसा करता?


खरं तर मला भाषेची गोडी माझ्या वडिलांमुळे लागली. ते संस्कृतचे श्लोक माझ्याकडून म्हणून घ्यायचे. नंतर हीच आवड वाढत गेली. मराठी, हिंदी, संस्कृत तर शाळेत शिकले आणि त्या व्यतिरिक्त सर्व भाषा शिकले. कारण, इतिहास अनुभवायचा असेल तर भाषेची साथ अत्यावश्यक आहे. इतिहासाचे जे पुरावे असतात ते भाषांतर करून मग समजण्यापेक्षा, ते पुरावे तुम्हाला वाचता आले तर त्याचे महत्त्व अधिक असते. त्यामुळे मी युरोपीय भाषा, बंगाली त्या त्या भाषेची मुख्य संस्कृती केंद्र आहेत तिथून शिकले. मी शिकवताना रेकॉर्डिंग करून ठेवत असे आणि नंतर ऐकून त्याचा अभ्यास करत असे. अरेबिक आणि सिंधी मी मुंबई विद्यापीठात शिकले. अलीकडे, ‘लॉकडाऊन’मुळे मला पोर्तुगीज भाषा ऑनलाईन शिकता आली. मोडी भाषेला पुनरुज्जीवित करण्याची माझी इच्छा आहे. सध्या आमचा साठ्ये महाविद्यालयात मोडीचा अभ्यासक्रम १५० तासांचा आहे. इतका विस्तृत अभ्यासक्रम आम्ही संकलित केलेला आहे.


आजच्या तरुण पिढीतील एक चांगली, सकारात्मक गोष्ट आणि दुसरी सुधारणा आवश्यक असलेली अशी कोणती गोष्ट तुम्ही आवर्जून सांगाल?


तरुण पिढीची सगळ्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबर त्यांची जवळीक. त्याचा योग्य फायदा करून घेतल्यास खूप काही साध्य करता येईल आणि नकारात्मक गोष्ट अशी की, या पिढीला सगळ्याच गोष्टींची घाई असते; अर्थात त्यात त्यांचाही पूर्णतः दोष नाही. पण, संयम आणि वाट पाहण्याची तयारी तितकीच महत्त्वाची असते.


प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येतात. तुमच्या आयुष्यातला सर्वात खडतर प्रसंग कोणता होता? आणि तुम्ही त्या प्रसंगावर कशा प्रकारे मात केली?


असे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. परंतु, त्यातही सगळ्यात आठवणीत राहिलेला संघर्ष होता, नोकरी मिळविण्याचा. माझे इतिहासात एम.ए. झाल्यावर मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, अनेक ठिकाणी अपयश आले. प्राध्यापक होण्याचे स्वप्न मी नेहमीच बाळगून होते. काही महाविद्यालयांनी तर ऐनवेळी नोकरी नाकारल्याचे प्रसंग आले. डोळस व्यक्तींना उघड उघड पसंती दिली जाई. त्यामुळे थोडे निराशही वाटत असे. पण, नंतर माझ्या आईने मला संस्कृतच्या शिकवण्या घेण्याचे सुचवले. तिथून मग शिकवायला सुरुवात झाली. पुढे, चाटे कोचिंग क्लासमध्ये मी स्पॅनिश शिकवायला सुरुवात केली. मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात त्यांच्या अनेक शाखांना मी स्पॅनिश शिकवत होते. पुढे, मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव जागांची भरती बंधनकारक करण्यात आली. त्याच दरम्यान मग, साठ्ये महाविद्यालयात इतिहास शिकविण्याची सुवर्ण संधी मिळाली.


अलीकडेच तुम्हाला लंडन फेलोशीप मिळाली. तुम्ही लंडनला रिसर्चसाठी गेला होतात. लंडनची फेलोशीप मिळविण्यासाठी कोणती तयारी आपण केली? तिथे कोणत्या विषयाचा अभ्यास केला? आणि तुमचा लंडनचा एकूणच अनुभवाविषयी काय सांगाल?


मला ‘चार्लेस वालेस इंडिया ट्रस्ट फेलोशीप’ २१ मार्च, २०१९ मध्ये मिळाली. ही फेलोशीप दोन वर्षांसाठी मिळू शकते किंवा अध्ययनासाठी (Research) मिळू शकते. मी रिसर्चसाठी लंडनला गेले होते. माझा पीएच.डी.च्या वेळी शोधनिबंध ‘विज्ञानाचा महाराष्ट्रातील इतिहास’ हा होता. ज्यामध्ये बाळाजी प्रभाकर मोडक यांबद्दल मी लिहिले होते. त्या संबंधात काही ऐतिहासिक कागदपत्रे भारतात उपलब्ध नव्हती. परंतु, ती लंडनमधील ब्रिटिश ग्रंथालयात ‘इंडिया ऑफिस रेकॉर्ड’मध्ये जपून ठेवण्यात आली आहेत. त्या ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास मी तिथे जाऊन करू शकले. अनुभव नक्कीच अविस्मरणीय होता. तिथे मला कागदपत्रे वाचून दाखविण्यासाठी शेवटपर्यंत ‘रीडर’ (वाचन मदतनीस) मिळाला नव्हता. आम्ही मराठी मंडळाला संपर्क केला. माझ्या बहिणीने खूपच प्रयत्न केले. गुजराती मंडळाला ज्यावेळी आम्ही संपर्क केला, तेव्हा तिथे हिंदू स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क झाला. त्यामधील एका गुजराती विद्यार्थ्याने हिंदू विद्यार्थी युनियनच्या एका सभेमध्ये अपील केले. त्याने विद्यार्थ्यांना विनंती केली की, आपल्यापैकी कोणी अभिधा ताई यांचा गणेश बनू शकेल का? त्याला खूप प्रतिसाद मिळाला आणि माझा लंडनमधील अभ्यास खूप सुखकर झाला. अनेक भाषा येत असल्यामुळे माझा अनुभव खूप समृद्ध झाला, ‘केम्ब्रिज’ विद्यापीठाला भेट देता आली. लंडनमध्ये दिव्यांगांसाठी शौचालयाची खूप सुंदर सोय आहे. त्याची आपल्या देशात नक्कीच खूप गरज आहे.


मनोबल वाढविण्यासाठी किंवा आयुष्य सुंदर व्हावं, यासाठी तरुणांना थोडक्यात काय आवाहन कराल?


आव्हानांमध्ये संधी शोधता येणं खूप महत्त्वाचं आहे. ते जमल्यास अनेक आव्हानं पेलण्याची शक्ती मिळते, असे मला वाटते आणि हेच मी आजच्या तरुणांना सांगू इच्छिते.


भविष्यात लेखन-संशोधनाचे कोणते प्रकल्प आहेत? आपण लिहिलेलं एखादं पुस्तक वाचकांच्या भेटीला कधी येईल?


मी सध्या नॅशनल बुक ट्रस्टसाठी बाळाजी प्रभाकर मोडक यांचे चरित्र लिहित आहे. मुंबईमध्ये ऐतिहासिक महत्त्व असूनही पोर्तुगीज शिकवले जात नाही. ती भाषा मुंबईमध्ये शिकवता आली, तर त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पोर्तुगीज भाषेमध्ये पीएच.डी. करता यावी यासाठी प्रयत्न करत आहे. मी, एल.एल.बीच्या तिसर्‍या वर्षाला आहे, तेसुद्धा पूर्ण करायचे आहे.


आपला हा प्रवास पाहून सुचलेल्या चार ओळी आपल्याला सांगू इच्छितो.
दृष्टिवीन जग हे अडते,
परीकर्तृत्व आपुले पाहून,
मस्तक माझे नमते,
तव यशाची ऐकून गाथा,
नवदृष्टी मजला मिळते...

- अ‍ॅड. आदित्य खरे
@@AUTHORINFO_V1@@