राजपुत्र पाहुणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

story_1  H x W:


त्या संध्याकाळी अँडी दॉनवन लॉजच्या खानावळीत जेवायला गेला, तेव्हा मालकीणबाई मिसेस स्कॉटनी त्याची एका खिन्नमुखी तरुणीशी मिस कॉनवेशी ओळख करून दिली. साधा सुती चॉकलेटी झगा परिधान केलेली कॉनवे तेव्हा जेवायला बसली होती. स्वतःतच मग्न होती. अँडी नम्रपणे स्वतःचे नाव पुटपुटला. तिने ऐकले. त्याच्याकडे क्षणभर पाहिले आणि पुनश्च जेवणाकडे वळाली. तिचे दुर्लक्ष झटकून टाकीत अँडी प्रसन्न हसला आणि जेवायला बसला. काही दिवसांनी सिगार फुंकीत जिन्यावरून जात असताना अँडी आणि कॉनवेची पुन्हा गाठ पडली. तिने काळा गाऊन परिधान केला होता. डोईवरची हॅटही काळी होती. हॅटखालून तिच्या सोनेरी केसांची छोटुकली पोनी टेल लोंबत होती.

“काय सुंदर हवा सुटली आहे,” स्मितहास्य करीत तो म्हणाला.

“आमच्यासाठी कसली सुंदर हवा,” ती खिन्नपणे उत्तरली. त्याला तिच्या काळ्या पोषाखावरून अंदाज आला. त्याचा गंभीर झालेला प्रश्नार्थक चेहरा पाहून एकदम ती मोकळी झाली. रडताना डोकं टेकण्यासाठी खांदा मिळाला की माणसाचं मन मोकळं होतं. दोघे खाली उतरून फाटकाजवळ आले नि बाकावर बसून बोलू लागले. इटलीत मोठी गढी आणि शेती असलेल्या कोणा फर्नांडो मॅझिनी नामे काऊंटशी तिचं येत्या वसंतात लग्न ठरलं होतं. “काऊंट तयारीसाठी इटलीला गेला होता आणि गेल्या आठवड्यात त्याचं अपघाती निधन झाल्याचं पत्र मिळालं होतं. त्याच दिवशी या ठिकाणी राहायला आले. आपला परिचय झाला तेव्हा मला नुकतीच ती बातमी कळाली होती. म्हणून मी तुझ्याशी नीट बोलले नाही. दुसर्‍या दिवशी बातमीची शहानिशा झाली. तस्मात मी मोर्निंगमध्ये (सुतकात) आहे.”

तिने गळ्यातल्या लॉकेटमधला काऊंटचा फोटो दाखवला. काऊंट महाराज रागीट चेहर्‍याचे दिसत होते. अँडीने काही क्षण फोटो पाहिला आणि परत दिला. दोघे आपापल्या रूमवर परतले. निरोप घेताना तिने त्याला रूममध्ये कॉफी घ्यायला बोलावले. कॉफी घेताना त्याने तिच्या टेबलवरचा काऊंटचा फ्रेम केलेला फोटो पाहिला. कॉनवेचं सूतक संपलं. तिने काळ्या गाऊनऐवजी साधे कपडे परिधान करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांची मैत्री हळूहळू घनदाट होत गेली. एका शनिवारी दोघे कोनी आयलंडवर सहलीला जाऊन आले. त्याच रात्री जेवताना त्यांनी मालकीणबाईला खूशखबर दिली की, दोघे लवकरच विवाहबद्ध होत आहेत. विवाह ठरल्याची बातमी सर्वत्र पसरली. लॉजमधल्या सर्वांनी अभिनंदन केलं.एका संध्याकाळी फाटकाजवळच्या त्या बाकावर दोघे बसले होते. आता अँडीचा चेहरा खिन्न दिसत होता. कॉनवे त्याला वारंवार विचारत होती.

“तू असा उदास का?” आधी तो बोलत नव्हता. खूप वेळानं तो बोलू लागला, “तुला मायकेल सुलीवन नावाची व्यक्ती ठाऊक आहे?”

“नाही बाई आणि त्याच्यामुळे तू उदास झाला असशील तर मला त्या व्यक्तीशी काही कर्तव्य नाही.”

“माईक हा न्यूयॉर्कमधला दादा आहे. सगळं शहर आणि पोलीस खातं त्याला घाबरतं. या शहरात माईक कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो. दैवयोगाने हा माईक माझा मित्र आहे. मला मिळालेली नोकरी त्यानेच मिळवून दिली आहे. माझ्या कामावर माझा बॉस आणि माईक दोघे खूश आहेत.”

“मग समस्या काय आहे?”

“आपल्या लग्नाला उपस्थित राहावं अशी मायकेलची इच्छा आहे आणि मला तो आपल्या लग्नात यायला नको आहे. तो आला तर काही तरी गडबड होईल.”

“अरे, पण का? तुझा तो जवळचा मित्र आहे ना?”

“माझ्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दे. तुझं काऊंटवर अगदी खरं प्रेम होतं का? तो इटलीला गेल्यावर खरोखरच त्याचं निधन झालं का? तुझी खात्री आहे?”

 
या प्रश्नावर कॉनवेच्या अश्रूंचा बांध फुटला.

“मला माफ कर, अँडी. मी तुझ्याशी खोटं बोलले. आता तुला सगळं खरं सांगते. काऊंट वगैरे कोणी नाही. या लॉजपासून जवळच्या दुकानात नोकरी लागली म्हणून मी या लॉजवर राहायला आले. त्या दिवशी दुपारी मी तुला लांबून पाहिलं होतं. तू मला आवडला होतास. पण, मी पक्की मुखदुर्बळ. मिसेस स्कॉटने ओळख करून दिली तेव्हा तुझ्याशी बोलायला घाबरले. लॉजमध्ये आले, तेव्हा माझ्याकडे दोनच पोषाख होते. दोन्ही अगदी साधे होते. दुकानातून पगार मिळायला अवधी होता. म्हणून मधल्या काळात गरिबी लपविण्यासाठी मी काळा झगा घालू लागले. दुसर्‍या दिवशी दुकानातून येताना एका फोटो स्टुडिओतून मी समोर दिसलेला फोटो पसंत केला. त्याच फोटोची छोटी प्रत घेऊन लॉकेटमध्ये ठेवली. तू मला भेटल्यावर तुला थाप मारली. तुला काही दिवस काळ्या झग्यात भेटत राहिले. पगार मिळाल्यावर नवे कपडे आणले. मग आपण कोनी आयलंडवर सहलीला गेलो. तू मला मागणी घातलीस. मी होकार दिला.”

“आता मी तुला एक गंमत सांगू? तू काऊंटचा म्हणून मला जो फोटो दाखवलास, तो माईकचा फोटो आहे.
हे ऐकून कॉनवेने चकित मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या कुशीत शिरून रडता रडता हसू लागली.


- विजय तरवडे
(‘काऊंट अ‍ॅण्ड द वेडिंग गेस्ट’ या कथेवर आधारित)
@@AUTHORINFO_V1@@