पश्चिम घाटामधून 'टाचणी'च्या तीन नव्या प्रजातींचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020   
Total Views |

dragonfly _1  H
टाचणांच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर

मुंबई (अक्षय मांडवकर) - जागतिक जैवविविधता हाॅटस्पाॅट असलेल्या पश्चिम घाटामधून 'टाचणी'च्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये या नव्या प्रजाती सापडल्या. यामधील एक प्रजाती जमिनीवरचे कांदळवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मायरिस्टिका स्वॅम्प्स'मध्ये सापडली आहे. त्यामुळे यासारख्या दुर्मीळ जंगल परिसंस्थेतील जैवविविधतेचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. 
 
 

'टाचणी' ही चतुर प्रजातींमधील एक प्रकार असली तरी, तिचा समावेश स्वतंत्र गटात होतो. या टाचणीमधील'प्रोटोस्टिक्टा' अर्थात 'रीडटेल' या प्रकारातील तीन नव्या प्रजातींचा उलगडा झाला आहे. बुधवारी या शोधाचे वृत्त 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले. शंतनू जोशी, के ए सुब्रमणियन, आर बाबू, दत्तप्रसाद सावंत आणि कृष्णमेघ कुंटे यांनी या प्रजाती शोधल्या आहेत. या नव्या प्रजातींचे नामकरण 'प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा', 'प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस', 'प्रोटोस्टिक्टा शोलाई' असे करण्यात आले आहे. 'प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा' ही टाचणी शेंदुरणे वन्यजीव अभयारण्य, कोलम, केरळ आणि कलक्कड मुण्डनथुराई व्याघ्र प्रकल्प, तमिळनाडू येथून शोधण्यात आली. पायावर असणाऱ्या चमकदार निळ्या रंगावरून या टाचणीला 'स्यानोफिमोरा' हे नाव देण्यात आले. 'प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस' ही टाचणी कथलेकन, शिमोगा, कर्नाटक येथील मायरिस्टिकाच्या जंगलातून शोधण्यात आली. 'प्रोटोस्टिक्टा शोलाई' ही टाचणी मेघमलाई वन्यजीव अभयारण्य, तमिळनाडू येथील शोला गवताळ प्रदेशात सापडली.
 


dragonfly _1  H
 
पश्चिम घाटामध्ये या संशोधनापूर्वी 'प्रोटोस्टिक्टा' कुळातील नऊ प्रदेशनिष्ठ टाचण्या आढळत होत्या. या संशोधनामुळे त्यांची संख्या आता १२ झाली आहे. गेल्या पाच वर्षात पश्चिम घाटातून एकूण पाच 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींचा शोध लावला गेला आहे. या संशोधन पत्रिकेत घाटात आढळणाऱ्या सर्व 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींविषयीची महत्त्वाची माहिती आणि रेखाटने देण्यात आली आहेत. तसेच 'प्रोटोस्टिक्टा मोर्टनी' आणि 'प्रोटोस्टिक्टा रूफोस्टिग्मा' या दोन दुर्मीळ टाचण्यांची नवी नोंद करण्यात आलेली आहे. हा शोध पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर घालणारा आहे. मात्र, पश्चिम घाट आणि हिमालय तसेच आग्नेय आशिया मधील 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींमध्ये असलेल्या दुव्याचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय पातळीवर काम करणे गरजेचे आहे, असे 'झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे शास्त्रज्ञ के ए सुब्रमणियन आणि आर बाबू यांनी सांगितले. 
 
 
 
या संशोधनाची सुरुवात कर्नाटकमध्ये काही सर्वेक्षण करत असताना झाली. मी 'मायरिस्टिका' पाणथळ जागेत चतुर पाहत असताना मला ही अतिशय छोटी टाचणी 'मायरिस्टिका' झाडांच्या जवळ उडताना आढळली. त्यानंतर ही टाचणी एक नवी प्रजात असल्याचे मला आढळून आले. 'झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या शास्त्रज्ञाबरोबर आम्ही अजून दोन प्रोटोस्टिक्टा प्रजातींचा शोध लावला - शंतनु जोशी, संशोधक, एनसीबीएस
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@