महात्मा गांधी जयंतीनिमित्त...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |


Mahatma Gandhi_1 &nb

 

 

गांधीजींचे नीतिनियम काय होते? सध्याच्या काळात त्यांची शिकवणूक अमलात आणण्यासारखी आहे का? गांधीजींच्या लेखनामधून त्यांंचे विचार व श्रद्धा यांविषयी माहिती मिळते.

 


 


दि. २ ऑक्टोबर रोजी देशात महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. जगभरात हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेमध्ये व्यतीत केली. दक्षिण आफ्रिकेमधील वास्तव्यात ‘काळा आदमी’ असल्यामुळे सहन कराव्या लागलेल्या अन्यायांमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व त्यांनी विरोधाचा आवाज जनतेच्या वतीने उठविण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी अहिंसापूर्ण सत्याग्रहाचे तंत्र विकसित केले व त्याचा परिणामकारक वापर केला. १९१५ मध्ये गांधीजी भारतामध्ये परत आले. तेव्हाचे महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेसनेते गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना खर्‍या अर्थाने भारताचे राजकारण व राजकीय समस्या यांचा परिचय करून दिला. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गोपाळ कृष्ण गोखले त्यांच्या संयम, संतुलन व व्यवस्थेच्या आत राहून काम करण्यासाठी ओळखले जात. महात्मा गांधींनीही त्यांच्याप्रमाणेच उदार दृष्टिकोन स्वीकारला. भारतामध्येे परत आल्यावरही त्यांनी पूर्णवेळ देशसेवेस स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या राजकारणामधील कारकिर्दीमध्ये १९१७ मधील बिहारमधील ‘चंपारण सत्याग्रह’, १९१८ मध्ये गुजरातमधील ‘खेडा सत्याग्रह’, १९२१ची ‘असहकार चळवळ’ व त्याला जोडून केलेली ‘खिलाफत चळवळ’, १९३० मधील ‘मिठाचा सत्याग्रह’ आणि अखंड भारताच्या फाळणीनंतरच्या कालखंडातील दंगली थांबविण्यासाठी केलेले सत्याग्रह/उपोषण हे प्रमुख टप्पे आहेत.
 
 
यामधील ‘खिलाफत चळवळ’ हा गांधीजींच्या फसलेल्या प्रयोगांपैकी एक आहे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८ ते १९२२च्या कालखंडात, तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची (खलिफाची) सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली. खिलाफत म्हणजे खलिफाची धार्मिक व राजकीय सत्ता. तुर्कस्तानचा सुलतान (खलिफा) हा सर्व मुस्लीम जगताचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता. १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा होता. या युद्धात जर्मनीबरोबरच तुर्कस्तानचाही पराभव झाला. तुर्की साम्राज्याचे तुकडे पाडून दोस्त राष्ट्रांनी आपल्या ताब्यात घेतले. शेकडो वर्षे चालत आलेली खिलाफत बरखास्त होणार, अशी स्थिती निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात मुसलमानांसह सर्व भारतीयांनी ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहावे व लढावे, असे आवाहन ब्रिटिशांनी केले होते. इंग्लंडही विजयी दोस्त राष्ट्रांपैकी एक होते. मुस्लीम जगतामधील धार्मिक महत्त्व असलेली खिलाफत नष्ट होत आहे, हे पाहून भारतीय मुसलमान रुष्ट झाले. गांधीजींनी खिलाफत चळवळीला त्यांचा आधार देऊ केला व काँग्रेसच्या ‘असहकार चळवळी’चा खिलाफत चळवळ अविभाज्य भाग बनली. यावेळी हिंदू-मुस्लीम एकतेचे वातावरण उत्पन्न झाले होते. हिंदू भारताला मिळणार्‍या स्वातंत्र्याचा विचार करीत होते व मुस्लीम भारताबाहेरील खिलाफतीच्या कल्याणाची चिंता करीत होते. पुढे १९२४ साली तुर्कीचा सुलतान पदच्युत झाला व त्याजागी सुलतान ‘खलिफा’ पदावर आरूढ झाला. तुर्कस्तानमध्ये निधर्मी प्रजासत्ताक राज्य आले व खलिफापद आणि खिलाफत नष्ट झाली. खिलाफत चळवळीच्या निमित्ताने मुस्लीम समाजाची शाश्वत मैत्री हिंदूंसाठी मिळविण्यात गांधीजी अयशस्वीच झाले. मुख्य राष्ट्रीय चळवळीपासून अंतर राखून असलेल्या मुस्लिमांना त्या मध्ये आणण्याचा गांधीजींचा प्रयत्न अयशस्वी झाला. भारताशी संबंधित राजकीय प्रश्नांकडेदेखील मुस्लीम धर्माच्या अनुषंगाने ते पाहू लागले. खिलाफतपूर्व कालखंडामध्ये अनेक वर्षे मुस्लीम समाजमनाची मशागत वेगळ्या विचारांनी झालेली होती. हिंदू समाज व मुस्लीम समाज यांमध्ये मूलभूत शत्रुत्व आहे व प्रातिनिधिक लोकशाही मिळाली तरी हिंदूंची लोकसंख्या जास्त असल्यामुळे ते मुस्लिमांच्या हिताचे नाही. यासाठी या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता राहणेच आवश्यक आहे, असे हे विचार होते. खिलाफत चळवळीनंतर भारतीय मुस्लीम समाज मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून अधिकच अलग राहू लागला. या अलगतावादी विचारांचे प्रकट रूप म्हणजेच भारत-पाकिस्तानची फाळणी होय.

गांधी जयंतीच्या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. जगभरामध्ये गांधीजींना ‘शांततेचा मसिहा’ म्हणून सन्मानाने संबोधले जाते. भारतीय लोक गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधतात. कारण, त्यांच्या ऋषितुल्य नेतृत्वाखाली इंग्लंडच्या साम्राज्यवादी पंजामधून भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले. परकीय लोकांनाही गांधीजींबद्दल केवढा आदर होता, हे ‘लंडन टाईम्स’ने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीद्वारे प्रकट होते. ‘भारताखेरीज कुठलाही देश आणि हिंदू धर्माखेरीज कोणताही धर्म गांधीजींना जन्म देऊ शकत नाही.’ गांधी कोण होते? त्यांची पाळेमुळे कोठे रुजलेली होती? गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या घराण्याचा इतिहास लिहिला आहे. ते लिहितात - “गांधी घराणे वैष्णव वाणी होते. माझे आजोबा काठियावाडमधील अनेक संस्थानांमध्ये दिवाणपदावर होते. वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर व नंतर राजकोट संस्थानांचे दिवाण होते.” गांधीजींचे जीवनकार्य काय होते? ते लिहितात - “मी, मागील ३० वर्षे काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे? ते म्हणजे आत्म साक्षात्कार, ईश्वरदर्शन, मोक्षप्राप्ती.’ गांधीजी कर्मावर विश्वास ठेवणारे होते. व्यर्थ वेळ दवडणे त्यांना मुळीच खपत नसे. प्रत्येत मिनीट सत्कारणी लावण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी चांभाराचे कामदेखील शिकून घेतले होते आणि स्वतः तयार केलेले जोडे एका मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले होते. मात्र, गांधीजींच्या कृतीने तो मित्र इतका भारावून गेला की, ते जोडे पायात घालण्याऐवजी त्याने स्वतःच्या मस्तकी लावून पूजेसाठी ठेवले.
 
 
भारतीय लोक गंभीरपणे गांधीजींची पुण्यतिथी पाळतात. गांधीजींचे अनुयायी या दिवशी प्रार्थनासभांचे आयोजन करतात, ‘सूतकताई’ची शिबिरे आयोजित करतात, खादीची वस्त्रे परिधान करतात व खादी टोप्यांचे वाटप हे सर्व विधिवत करतात. गांधीजींचे गुणगान करणारी भाषणे केली जातात. मात्र, गांधीजींचा वारसा सांगणार्‍यांच्या उक्ती व कृतीमध्येच खूप अंतर आहे. गांधीजींनी पापभिरूपणाने त्यांच्या मुलाबाळांना व रक्ताच्या नातेवाइकांना सत्ता व पैसा यांपासून दूर ठेवले होते. गांधीजींच्या पूर्वीच्या काही अनुयायांच्या वंशजांची आडनावे ‘गांधी’ असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा असा समज होतो की, हे महात्मा गांधीजींचेच वंशज आहेत. गांधीजींचे नीतिनियम काय होते? सध्याच्या काळात त्यांची शिकवणूक अमलात आणण्यासारखी आहे का? गांधीजींच्या लेखनामधून त्यांंचे विचार व श्रद्धा यांविषयी माहिती मिळते. ज्या धर्मात आपला जन्म झाला, त्या धर्मावर आपली आत्यंतिक श्रद्धा आहे, असे ते जाहीररीत्या प्रतिपादन करीत असत. जेव्हा त्यांना धर्मविषयक श्रद्धेबाबत विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले, “मी स्वतःला एक सनातनी हिंदू समजतो, कारण माझा वेद, उपनिषदे, पुराणे आणि हिंदू धर्मामधील इतर धार्मिक साहित्यावर विश्वास आहे.” ते देवावर विश्वास ठेवणारे, कर्माच्या अमरतेवर विश्वास ठेवणारे, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे, कर्माच्या नियमांवर आणि मोक्षावर विश्वास ठेवणारे हिंदू होते. ते आपल्या दैनंदिन जीवनात सत्य आणि अहिंसा यांचे पालन प्रयत्नपूर्वक करीत होते. गोसंरक्षण करण्याचा प्रयत्न करीत होते व वर्णाश्रमधर्माप्रमाणे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. हिंदू धर्मामध्ये वर्णन केलेली शास्त्रे, पुराणे व भगवंताचे अवतार आणि मानवाच्या पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास होता.

 

 


गांधीजी लिहितात - “हिंदू धर्मातील मूलभूत संकल्पना गोसंरक्षण आहे.
 

 

 

मात्र, माझ्याकरिता मानवी उत्क्रांतीमधील ती एक विस्मयकारक प्रक्रिया आहे. यामुळे माणूस आपल्या वंशाच्या सीमा ओलांडून गोवंशावर प्रेम करू लागला. माझ्या मते, गोवंश म्हणजे मानवजातीपेक्षा कमी प्रगत असणारे समग्र प्राणिजीवनच होय. गाईच्या निमित्ताने मानवाने प्राणिजगताशी नाते जोडले आहे. गाईची महत्ता एवढी का आहे, हे माझ्यासमोर अगदी स्पष्ट आहे. भारतामध्ये गाय मानवाची सर्वोत्तम साहाय्यक होती. ती मानवाला भरभरून देत असे. फक्त दूधच नव्हे, तर तिच्यामुळे शेतीदेखील शक्य होत असे. गाय म्हणजे दयाळूपणावरील साक्षात कविताच आहे.” 
 
 
गांधीजी लिहितात - “तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःभोवती मर्यादा आखून घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुळांपासून स्वतःला अलग करता कामा नये. पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावाखाली कळत, नकळत येऊन स्वतः देशातील रीतिरिवाज व परंपरा यावर तुमच्याकडून आघात होऊ नयेत. कारण, पाश्चिमात्य विचारसरणीमध्ये मूलभूत नैतिकतेकडे दुर्लक्ष झालेले आहे. ख्रिस्ताची शिकवणूक व आधुनिक पाश्चात्त्य सभ्यता यांची गल्लत करू नका. मी तुम्हाला विचारतो, हे मिशनरी कोण आहेत? यांच्यामुळे तुम्ही आपल्या मुळांपासून उखडले जाऊ नका.”

 

 


कॉलेज विद्यार्थ्यांवरील गांधीजींचा प्रभाव इतका ओसरला आहे की, त्यांना गांधीजींविषयी विचारले असता ते केवळ इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनाच ओळखतात असे दिसून येते. काही कॉलेज विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी हे राहुल गांधींचे पणजोबा असावेत, असा अंदाज व्यक्त केला. या गैरसमजामधून काँग्रेसला निवडणुका जिंकता आल्या असतील. पण, यामुळे सध्याच्या कॉलेज विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था दिसून येते. आपल्या समाजाने तरुण पिढीला स्वदेशातील महापुरुष व त्यांचे विचार यांची ओळख व्हावी, यासाठी काय प्रयत्न केले आहेत? गांधीजींची जयंती, त्यांच्यांविषयी अज्ञान असताना साजरी करण्यात काय अर्थ आहे?

 

 


हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाविषयी गांधीजी आत्यंतिक समर्पित होते. आपल्यात अंतिम इच्छेविषयी ते लिहितात - “माझ्या लेखनाचा माझ्या शवासोबतच अंत्यसंस्कार करावा. मी केलेल्या कृती चिरकाल राहतील. माझे लेख व उद्गार चिरकाल राहणार नाहीत. जरी आपले सर्व धर्मग्रंथ नष्ट झाले तरी उपनिषदामधील एक सूत्रदेखील हिंदू धर्माचे तत्त्व सांगण्यास समर्थ आहे. मात्र, त्या सूत्राप्रमाणे आचरण करणारे कोणी नसल्यास त्याचा प्रभाव राहणार नाही.” मॅडम सोनिया गांधी आणि राहुल गांधी, आपण महात्मा गांधींचे अनुयायी व वारसदार असल्याचा दावा करतात. महात्मा गांधी व सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काय समानता आहे? त्यांचा सत्य, अहिंसा, वैराग्यशील आयुष्य यांवर विश्वास आहे काय? जनतेनेच पारख करावी.
 

 

 

- मधू देवळेकर

(लेखक माजी आमदार आहेत.)

 

 
@@AUTHORINFO_V1@@